Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 May 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०१ मे
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्राला सामाजिक
प्रबोधन, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विविध
क्षेत्रांतील नेतृत्वाचा प्रदीर्घ गौरवशाली इतिहास लाभला आहे, साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट ते उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा याद्वारे
राज्याने भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्राच्या
निरंतर विकासासाठी आणि इथल्या महान जनतेच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करतो” असंही
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र दिन राज्यात आज सर्वत्र
उत्साहात साजरा केला जात आहे. राज्याचा मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ मुंबईच्या दादरच्या
शिवाजी पार्क मैदानावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
प्रमुख उपस्थितीत सकाळी आठ वाजता संपन्न झाला. मुंबईच्या विधानभवनात विधान परिषद सभापती
राम शिंदे आणि उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं.
****
मुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त
महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई इथं आज पुष्पचक्र अर्पण करून
विनम्र अभिवादन केलं. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मराठी बांधव देशाच्या कुठल्याही राज्यात
असल्यास तिथल्या विकासात भर घालताना दिसतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने
मराठी शिकायला हवी, जे राज्यात वास्तव्यास
आहे ते मराठी शिकण्याचा प्रयत्न करतील आणि जे शिकले नाही, त्यांना सरकार म्हणून आम्ही मराठी
शिकवू पण भाषेच्या आधारावर हिंसा, वाद मान्य नाही असंही
फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत
जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. बीड इथं उपमुख्यमंत्री
तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, लातूर इथं शिवेंद्रसिंहराजे भोसले, परभणी इथं मेघना साकोरे-बोर्डीकर, हिंगोली इथं नरहरी झिरवाळ यांच्या
हस्ते ध्वजारोहण झालं. तर, हिंगोली जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नांदेड इथं अतुल
सावे तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं.
****
व्यापार, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागिदारी
वाढवून भारताच्या जागतिक सहभागाला बळकटी देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे. २०४७ साठी भारतीय मुत्सद्देगिरीमध्ये परिवर्तन" या संकल्पनेवर आधारित
नवी दिल्ली इथं आयोजित तीन दिवसीय परिषदेच्या कालच्या समारोप दिनी पंतप्रधान परिषदेला
संबोधित करताना बोलत होते. भारताच्या राष्ट्रीय हिताला परदेशात चालना देण्याबाबत मोदी
यांनी या परिषदेत मार्गदर्शन केलं. या परिषदेत योग, विचारमंथन, आणीबाणी सदृश परिस्थिती हाताळण्यासंदर्भात चर्चा, विविध भू-राजकीय घडामोडी, उदयोन्मुख तंत्रज्ञान, भारताची भूमिका आणि भविष्यासाठी सज्ज
मुत्सद्देगिरी यांवर चर्चा झाली.
****
मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती
मार्ग क्षमता वाढीअंतर्गत उभारलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण होत आहे. मिसिंग लिंक हा देशातला पहिला अधिक वेगवान
आणि सुरक्षित द्रुतगती मार्ग असेल. याद्वारे प्रवाशांना मुंबई ते पुणे हा प्रवास अधिक
जलद होऊन सुरक्षित आणि सुलभ सेवा मिळणार आहे.
****
बुद्ध पौर्णिमा आज साजरी होत आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. गौतम बुद्धांचा करुणा, अहिंसा, शांती आणि ज्ञानाचा शाश्वत
संदेश संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करत राहील, असं राष्ट्रपतींनी आपल्या सामाजिक माध्यंमावरील संदेशात
म्हटलं आहे. “भगवान बुद्धांचे विचार साकार करण्याबाबत आपली कटिबद्धता मजबूत असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.” भारतासह नेपाळ, भुतान, थायलंड, कोरिया, श्रीलंका अशा अनेक देशांमध्ये हा
दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
****
मोठ्या विरामानंतर राज्यात आजपासून
जनगणनेची प्रक्रिया सुरू होत आहे. १ ते १५ मे दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना se.census.gov.in या संकेतस्थळावर घरांची नोंदणी करता
येईल. राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा डांगे यांनी मुंबईत पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. ही नोंदणी केल्यावर ११ अंकी एसई आयडी मिळेल. या माहितीची पडताळणी
१६ मे ते १४ जून दरम्यान घरी येणाऱ्या प्रगणकांकडून केली जाईल. त्यांना हा एसई आयडी
द्यावा लागेल. ज्या नागरिकांनी स्वतः घरांची माहिती नोंदवलेली नाही त्यांची माहिती
हे प्रगणक नोंदवून घेतील. यंदाच्या जनगणनेत
पहिल्यांदाच कुटुंबात प्रामुख्यानं वितरीत होणाऱ्या धान्याची नोंद होणार आहे.
****
आजपासून आठ मे पर्यंत ‘थॅलेसेमिया
मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत “संकल्प सप्ताह”
राबवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
यांनी दिले आहेत. यातून थॅलेसेमिया प्रतिबंध, तपासणी तसंच जनजागृतीला अधिक गती
देण्यावर भर देण्यात येणार आहे.
****
राज्यात बीडसह अकरा जिल्ह्यांत मोफत
डायलिसीस सेवेचा विस्तार आज केला जाणार आहे. नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणीसह सात जिल्ह्यांमधल्या शासकीय
रुग्णालयांमध्ये एम.आर.आय. सुविधा आजपासून सुरू होणार आहे.
****
No comments:
Post a Comment