Saturday, 4 November 2017

04.11.2017_8.40_8.45_AM_URDU.mp3


AIR NEWS AURANGABAD BULLETIN 04.11.2017_06.50

AIR NEWS AURANGABAD 04.11.2017 06.50AM




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 November 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

******

·    कृषी मालाची दोन लाख रुपयांपर्यंत व्यापाऱ्यांना केलेली रोख विक्री, आयकर अधिनियमातून मुक्त असल्याचं, आयकर विभागाकडून स्पष्ट

·    दूरशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे तंत्र शिक्षण देता येऊ शकत नाही - सर्वोच्च न्यायालय

·    प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत १०० निवडक शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्याची शिक्षण मंत्र्यांची घोषणा

·    यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर

·    शेतमालाला हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत - राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

आणि

·    भारतीय महिला हॉकी संघाची आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

****

कृषी मालाची दोन लाख रुपयांपर्यंत व्यापाऱ्यांना केलेली रोख विक्री आयकर अधिनियमातून मुक्त असल्याचं, आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे. विभागाकडून जारी एका पत्रकानुसार दोन लाख रुपयांपेक्षा कमी कृषी मालाच्या रोख विक्रीवर शेतकरी किंवा व्यापाऱ्यांना कर भरावा लागणार नाही, तसंच, त्यांना पॅन किंवा अर्ज क्रमांक १६ भरून देण्याचीही आवश्यकता नसल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे.

****

आधार कायद्याची घटनात्मक वैधता तसंच आधार क्रमांक बँक खातं आणि मोबाईल क्रमांकाशी संलग्नीकरणाला आव्हान देणाऱ्या चार याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय अंतरिम आदेश देणार नसून, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्वतंत्र पीठासमोर आधारसंबंधी दाखल सर्व याचिकांवर सुनावणी होणार आहे.



विमुद्रीकरणानंतर रद्द झालेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठीच्या १४ याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल निकाली काढल्या. पाच न्यायाधीशांचं एक घटनापीठ या संदर्भात निर्णय घेईल, असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं. दरम्यान, घटनापीठासमोर सुनावणी पूर्ण होईपर्यंत रद्द झालेल्या नोटा बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार नसल्याचं, सरकारनं, न्यायालयात सांगितलं आहे.

****

दूरशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे तंत्र शिक्षण देता येऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी अशा शिक्षणाला ओडिशा उच्च न्यायालयानं परवानगी दिली होती. मात्र दूरशिक्षणाद्वारे मिळवलेली अशी पदवी, नियमित वर्गात शिकून मिळवलेल्या पदवीच्या समकक्ष मानता येणार नाही, असा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दोन वर्षांपूर्वीच दिला होता. हा निकाल ग्राह्य धरत, दूरशिक्षण कार्यक्रमाद्वारे अभियांत्रिकीसारख्या तंत्रशिक्षणाचे अभ्यासक्रम चालवू नयेत, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

****

नगरपरिषदांनी महत्त्वाच्या नागरी सेवा या सेवा हमी कायद्याच्या कक्षेत आणून डिजिटल स्वरुपात देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल नगरविकास विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर बोलत होते. राज्यातल्या ३४ नगरपरिषदांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते. शासनाचे विविध प्रकल्प राबवताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

*****

‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’उपक्रमांतर्गत राज्यातल्या १०० निवडक शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवणार असल्याची घोषणा, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. माध्यमिक शिक्षणात मुलींच्या गळतीचं प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत खाली आणणं तसंच शैक्षणिक कामगिरीत महाराष्ट्राला देशात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आणण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवणार असल्याचं, ते म्हणाले. पुढील काळात राज्यातल्या सर्वच शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवण्यासाठी राज्यभरात हा कार्यक्रम राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या विचाराधीन असल्याचंही तावडे यांनी सांगितलं.

****

साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे. ११ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कृष्णा सोबती यांना यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांची जिंदगीनामा, समयसंग्राम, तीन पहर, मित्रों मरजानी, ऐ लडकी, दार से बिछुडी, आदी साहित्यकृती प्रसिद्ध आहेत.

****

पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आहारभत्ता जवळपास दुपटीने वाढवण्यात आला आहे. येत्या एक डिसेंबर २०१७ पासून हा वाढीव लाभ मिळणार आहे.

****

राज्यावर कर्ज असतांना आणि कर्जमाफीसाठी पैसा नसताना सरकार जाहिरातबाजी करत असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. विशेष प्रसिद्धी मोहिमे अंतर्गत प्रसिद्धीवर २७ कोटी रुपये खर्च करण्याच्या शासन निर्णयावर त्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली.

****

शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करणारा अध्यादेश सरकारनं तातडीने काढावा, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलं. वीज बिलाची थकबाकी दुष्काळाच्या काळातली आहे, त्यामुळे थकबाकीपोटी कृषी पंप वीज जोडणी तोडण्याचा आदेशही सरकारनं मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी या निवेदनातही केली आहे.

****

राज्यातल्या पहिल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचं आज अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, लोकार्पण होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातल्या या पहिल्या प्रकल्पातून आगामी तीन महिन्यात दोन मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक परिसरात उभारण्यात आलेल्या २१० फूट उंचीचा ध्वजस्तंभ आणि स्वातंत्र्य संग्राम स्मारकाचं लोकार्पण राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत आज होणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी हा कार्यक्रम होणार आहे.

****

भारतीय महिला हॉकी संघानं जपानमधल्या काकामिगाहारा इथं सुरु असलेल्या आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारतानं यजमान जपान संघाचा चार दोन असा पराभव केला. उद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना चीनसोबत होणार आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दुसरा टी-ट्वेंटी सामना आज होणार आहे. संध्याकाळी सात वाजता राजकोट इथं या सामन्याला सुरुवात होईल. गेल्या बुधवारी दिल्ली इथं झालेला पहिला सामना भारतानं जिंकून तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.

****

शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांची ५४८ वी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं अडीच हजार भाविकांचा जत्था पाकिस्तानात नानकदेव यांचं जन्मस्थान नानकाना साहिबकडे रवाना झाला आहे. नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाऱ्यातही गुरु नानक जयंतीनिमित्त शबद, कीर्तन, आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.   

****

जालना जिल्ह्यातल्या मंठा-तळणी मार्गावर काल रात्री जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागेवर मृत्यू झाला तर जीपमधील सातजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त जीप मजुरांना घेऊन मुंबईकडे जात असतांना हा अपघात घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी ५० हजार रुपये लाच घेणाऱ्या प्रभारी सहायक निबंधकास काल रंगेहाथ अटक करण्यात आली. साहेबराव सोनटक्के असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

****

लातूर जिल्हा नियोजन विकास समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातल्या पाच बसस्थानकांवर सुरक्षेसाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसंच खासदार डॉ सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत, प्रत्येक गावात अधिकृत स्मशानभूमी बांधण्यासह विविध निर्णय घेण्यात आले.

*******

Friday, 3 November 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.11.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 November 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

आधार कायद्याची घटनात्मक वैधता तसंच आधार क्रमांक बँक खातं आणि मोबाईल क्रमांकाशी संलग्नीकरणाला आव्हान देणाऱ्या चार याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय कोणताही अंतरिम आदेश देणार नसून, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्वतंत्र पीठासमोर आधारसंबंधी दाखल सर्व याचिकांवर सुनावणी होणार आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर असल्याचं बँकांनी तर, मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्याची शेवटची तारीख सहा फेब्रुवारी २०१८ असल्याचंही दूरसंचार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना सांगावं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****

विमुद्रीकरणानंतर रद्द झालेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठीच्या १४ याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज निकाली काढल्या. पाच न्यायाधीशांचं एक घटनापीठ या संदर्भात निर्णय घेईल, असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं. जे लोक विहित मुदतीत आपल्याकडच्या नोटा जमा करू शकले नाहीत, त्यांच्या वैयक्तिक याचिकांवरही हे घटनापीठ सुनावणी घेईल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. एक हजार आणि पाचशे रुपये मूल्याच्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाची वैधता पडताळून पाहण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी १६ डिसेंबरला एक घटनापीठाला दिले होते.

****

दूरशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे तंत्र शिक्षण देता येऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायलयानं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी अशा शिक्षणाला ओडिशा उच्च न्यायालयानं परवानगी दिली होती. मात्र दूरशिक्षणाद्वारे मिळवलेली अशी पदवी, नियमित वर्गात शिकून मिळवलेल्या पदवीच्या समकक्ष मानता येणार नाही, असा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दोन वर्षांपूर्वी दिला होता. हा निकाल ग्राह्य धरत, शैक्षणिक संस्थांनी दूरशिक्षण कार्यक्रमाद्वारे अभियांत्रिकीसारख्या तंत्रशिक्षणाचे अभ्यासक्रम चालवू नयेत, असं सर्वोच्च न्यायालयानं बजावलं आहे.

****

आयसीआरटीसीच्या पोर्टलवरून तिकीट आरक्षणाची मर्यादा प्रतिमहिना सहावरून, बारा करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी संबंधित व्यक्तीचे आरक्षण खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणं आवश्यक आहे. २६ ऑक्टोबरपासून हा बदल करण्यात आला आहे. 

****

साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे. हिंदी भाषेच्या कल्पित वाङमय आणि निबंध लेखिका असलेल्या कृष्णा सोबती यांना यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

****

शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांची ५४८ वी जयंती उद्या साजरी होत आहे. या निमित्तानं अडीच हजार भाविकांचा जत्था पाकिस्तानात नानकदेव यांचं जन्मस्थान नानकाना साहिबकडे रवाना झाला आहे. नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाऱ्यातही गुरु नानक जयंतीनिमित्त शबद, कीर्तन, आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.  

****

‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’उपक्रमांतर्गत राज्यातल्या १०० निवडक शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबवणार असल्याची घोषणा, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ते आज मुंबईत बोलत होते. माध्यमिक शिक्षणात मुलींच्या गळतीचं प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी तसंच शैक्षणिक कामगिरीत महाराष्ट्राला देशात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आणण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवणार असल्याचं, ते म्हणाले. पुढील काळात राज्यातल्या सर्वच शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवण्यासाठी राज्यभरात हा कार्यक्रम राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या विचाराधीन असल्याचंही तावडे यांनी सांगितलं.

****

आरोग्य क्षेत्रात विविध सेवा पुरवण्यासाठी प्रशिक्षीत कुशल मनुष्यबळ निर्माण होण्याकरता कुटुंब कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राच्यावतीनं ‘आरोग्याची निगा आणि कौशल्य प्रशिक्षण’ अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातल्या युवकांना रोजगाराची संधी निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

थेट लाभ योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या सर्व खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना ई-पॉस मशीनद्वारेच रासायनिक खतांची विक्री करण्याचे निर्देश जिल्हा परिषद कृषी विभागानं दिले आहेत. यासाठी ६३१ कृषीकेंद्र चालकांना ई-पॉस मशीन मोफत देण्यात आल्या आहेत. या प्रणालीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई चा इशारा कृषी विकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी दिला आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक परिसरात उभारण्यात आलेल्या २१० फूट उंचीच्या ध्वजस्तंभ आणि स्वातंत्र्य संग्राम स्मारकाचं लोकार्पण राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत उद्या होणार आहे. उद्या संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी हा कार्यक्रम होणार आहे.

****

AIR News Bulletin, Aurangabad 03.11.2017....17.25

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 03.11.2017_13.00

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 03.11.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 November 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ०३ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.

*****

सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमात अन्न प्रक्रिया उद्योगाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे, नवी दिल्ली इथं आयोजित जगभरातल्या खाद्य पदार्थ उद्योगातले गुंतवणुकदार आणि उद्योजकांचा सर्वात मोठा मेळावा - वर्ल्ड फुड इंडियाचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते विज्ञान भवनात झालं, त्यावेळी ते बोलत होते. पीक व्यवस्थापन, अन्न प्रक्रिया आणि साठवण, शीतगृह आणि त्यांची वाहतूक या क्षेत्रात भारतात मोठी संधी उपलब्ध असल्याचं ते म्हणाले. खासगी क्षेत्राच्या सहभागामुळे अनेक उद्योगात वाढ झाली असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. यावेळी पंतप्रधानांनी निवेश बंधु पोर्टलचं अनावरण केलं. या माध्यमातून देशातल्या अन्न प्रक्रिया उद्योगात असलेल्या गुंतवणुकीच्या संधींविषयी माहिती मिळणार आहे. हा मेळावा भारतीय अन्न प्रक्रिया उद्योगाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन आणेल, असा विश्वास केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी यावेळी व्यक्त केला. खाद्य पदार्थ उद्योगाचं स्थित्यंतर घडवणं आणि भारताला गुंतवणुकीसाठी पसंतीचा देश बनवून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायची मोहीम यशस्वी करणं हा या मेळाव्याचा उद्देश आहे. उद्धाटनानंतर पंतप्रधानांनी या मेळाव्यातल्या विविध स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली. ३० देशांमधल्या २०० कंपन्या आणि दोन हजारावर प्रतिनिधी या खाद्य महोत्सवात सहभागी झाले आहेत.

****

पाकिस्तानातल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रसंघाकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेत चीननं पुन्हा अडथळा आणल्याबद्दल भारतानं नाराजी व्यक्त केली आहे. अझरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी लागणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहमतीमध्ये एकच देश अडसर ठरत असल्याचं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. क्षुद्र हेतूंसाठी दहशतवादाला थारा देणं संकुचित दृष्टीचं आहे आणि त्याचा विपरित परिणामही होऊ शकतो, असं भारतानं यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत अतिरिक्त कामांपासून अंगणवाडी सेविकांना वगळण्याचा १६ ऑक्टोबर रोजी घेतलेला शासन निर्णय मागे घेण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी महिला आणि बालकल्याण विभागाला दिले आहेत. महिला आणि बालकल्याण विभागानं आदिवासी कल्याण विभागाशी सल्लामसलत न करता हा शासन निर्णय जारी केला होता. आदिवासी क्षेत्रातल्या गर्भवती तसंच स्तन्यदा मातांना पोषण आहार देण्याची कामं अंगणवाडी सेविकांना देऊ नये, असं या शासन निर्णयात म्हटलं होतं.  

****

ग्रामदूत योजनेसाठी बीड जिल्ह्यातल्या आठ गावांचा समावेश करण्यात आला आहे. परळी, अंबाजोगाई, केज आणि धारूर या चार तालुक्यातल्या निवडक आठ गावांचा यात समावेश आहे. या गावांना प्रतिवर्षी सुमारे एक ते दीड कोटी रुपये विकासासाठी मिळणार आहेत. ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आले असून, विकास आराखडा तयार केल्यानंतर या विकास कामांना प्रारंभ होणार आहे.

****

हिंगोली जिल्हा कृषी विभागानं २१ लाख रुपयांचे कीटकनाशक जप्त केलं आहे. या किटकनाशकाची अधिकृतता संशयास्पद असल्यानं, ही कारवाई करण्यात आली. गेल्या महिन्यात कीटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा होऊन अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

****

अहमदनगरच्या थिंक ग्लोबल फाउंडेशन या संस्थेतर्फे दिला जाणारा सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. फाउंडेशन चे अध्यक्ष किरण काळे यांनी आज अहमदनगर इथं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. डिसेंबर महिन्यात या पुरस्काराचं वितरण केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जपानमधल्या काकामिगाहारा इथं सुरु असलेल्या आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत आज उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारतासमोर जपानचं आव्हान असणार आहे. काल झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात भारतानं कझाकीस्तानचा सात एक असा पराभव केला होता.

****

भारतीय बॅडमिंटनपटू के श्रीकांतनं जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या वर्षात श्रीकांतनं आतापर्यंत डेन्मार्क, ऑस्ट्रेलियन, इंडोनेशिया आणि फ्रेंच खुल्या बॅटमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावल्यामुळे जागतिक मानांकनात तो पहिल्या पाच मध्ये समाविष्ट झाला आहे.

****

ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत आज भारताच्या प्रकाश नांजप्पानं ५० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. याच स्पर्धेत भारताच्या अमनप्रीत सिंगनं रौप्य, तर जितू रायनं कांस्य पदक पटकावलं. १० मीटर एयर पिस्टल प्रकारातली तिन्ही पदकंही भारतानं परवा जिंकली आहेत.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...