Friday, 3 November 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 03.11.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 November 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ०३ नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

*****

सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमात अन्न प्रक्रिया उद्योगाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे, नवी दिल्ली इथं आयोजित जगभरातल्या खाद्य पदार्थ उद्योगातले गुंतवणुकदार आणि उद्योजकांचा सर्वात मोठा मेळावा - वर्ल्ड फुड इंडियाचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते विज्ञान भवनात झालं, त्यावेळी ते बोलत होते. पीक व्यवस्थापन, अन्न प्रक्रिया आणि साठवण, शीतगृह आणि त्यांची वाहतूक या क्षेत्रात भारतात मोठी संधी उपलब्ध असल्याचं ते म्हणाले. खासगी क्षेत्राच्या सहभागामुळे अनेक उद्योगात वाढ झाली असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. यावेळी पंतप्रधानांनी निवेश बंधु पोर्टलचं अनावरण केलं. या माध्यमातून देशातल्या अन्न प्रक्रिया उद्योगात असलेल्या गुंतवणुकीच्या संधींविषयी माहिती मिळणार आहे. हा मेळावा भारतीय अन्न प्रक्रिया उद्योगाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन आणेल, असा विश्वास केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी यावेळी व्यक्त केला. खाद्य पदार्थ उद्योगाचं स्थित्यंतर घडवणं आणि भारताला गुंतवणुकीसाठी पसंतीचा देश बनवून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायची मोहीम यशस्वी करणं हा या मेळाव्याचा उद्देश आहे. उद्धाटनानंतर पंतप्रधानांनी या मेळाव्यातल्या विविध स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली. ३० देशांमधल्या २०० कंपन्या आणि दोन हजारावर प्रतिनिधी या खाद्य महोत्सवात सहभागी झाले आहेत.

****

पाकिस्तानातल्या जैश मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रसंघाकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेत चीननं पुन्हा अडथळा आणल्याबद्दल भारतानं नाराजी व्यक्त केली आहे. अझरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी लागणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहमतीमध्ये एकच देश अडसर ठरत असल्याचं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. क्षुद्र हेतूंसाठी दहशतवादाला थारा देणं संकुचित दृष्टीचं आहे आणि त्याचा विपरित परिणामही होऊ शकतो, असं भारतानं यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत अतिरिक्त कामांपासून अंगणवाडी सेविकांना वगळण्याचा १६ ऑक्टोबर रोजी घेतलेला शासन निर्णय मागे घेण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी महिला आणि बालकल्याण विभागाला दिले आहेत. महिला आणि बालकल्याण विभागानं आदिवासी कल्याण विभागाशी सल्लामसलत न करता हा शासन निर्णय जारी केला होता. आदिवासी क्षेत्रातल्या गर्भवती तसंच स्तन्यदा मातांना पोषण आहार देण्याची कामं अंगणवाडी सेविकांना देऊ नये, असं या शासन निर्णयात म्हटलं होतं.  

****

ग्रामदूत योजनेसाठी बीड जिल्ह्यातल्या आठ गावांचा समावेश करण्यात आला आहे. परळी, अंबाजोगाई, केज आणि धारूर या चार तालुक्यातल्या निवडक आठ गावांचा यात समावेश आहे. या गावांना प्रतिवर्षी सुमारे एक ते दीड कोटी रुपये विकासासाठी मिळणार आहेत. ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आले असून, विकास आराखडा तयार केल्यानंतर या विकास कामांना प्रारंभ होणार आहे.

****

हिंगोली जिल्हा कृषी विभागानं २१ लाख रुपयांचे कीटकनाशक जप्त केलं आहे. या किटकनाशकाची अधिकृतता संशयास्पद असल्यानं, ही कारवाई करण्यात आली. गेल्या महिन्यात कीटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा होऊन अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

****

अहमदनगरच्या थिंक ग्लोबल फाउंडेशन या संस्थेतर्फे दिला जाणारा सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. फाउंडेशन चे अध्यक्ष किरण काळे यांनी आज अहमदनगर इथं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. डिसेंबर महिन्यात या पुरस्काराचं वितरण केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जपानमधल्या काकामिगाहारा इथं सुरु असलेल्या आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत आज उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारतासमोर जपानचं आव्हान असणार आहे. काल झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्याभारतानं कझाकीस्तानचा सात एक असा पराभव केला होता.

****

भारतीय बॅडमिंटनपटू के श्रीकांतनं जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या वर्षात श्रीकांतनं आतापर्यंत डेन्मार्क, ऑस्ट्रेलियन, इंडोनेशिया आणि फ्रेंच खुल्या बॅटमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावल्यामुळे जागतिक मानांकनात तो पहिल्या पाच मध्ये समाविष्ट झाला आहे.

****

ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत आज भारताच्या प्रकाश नांजप्पानं ५० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. याच स्पर्धेत भारताच्या अमनप्रीत सिंगनं रौप्य, तर जितू रायनं कांस्य पदक पटकावलं. १० मीटर एयर पिस्टल प्रकारातली तिन्ही पदकंही भारतानं परवा जिंकली आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...