Wednesday, 29 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.11.2017 06.50AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
****
** आंदोलनांदरम्यानच्या घटनांची जबाबदारी, आणि हिंसाचारांच्या घटनांमधल्या पिडीतांना नुकसान भरपाई देण्यासाठी, सर्व राज्यांमध्ये न्यायालयं स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश
** येत्या ११ डिसेंबरपासून नागपूर इथं राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन
** राज्यात वनशेती उपअभियान राबवण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
** ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार समारोप
** स्वतंत्र मराठवाड्याला काँग्रेसचा विरोध असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण
आणि
** नांदेड- लातूर रस्त्यावरच्या अपघातात सात ठार, चौदा जखमी
****
****
आंदोलनांदरम्यान होणारा हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. अशा विध्वंसक घटनांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी, तसंच हिंसाचारांच्या घटनांमधल्या पिडीतांना नुकसान भरपाई देण्यासाठी, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये न्यायालयं स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. याचबरोबर अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर खटला भरण्यासाठी तसंच त्यांच्यावर नागरी दायित्व निश्चित करण्याचे काम संबंधित उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार एक किंवा त्याहून अधिक जिल्हा न्यायाधिशांकडे सोपवण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. आंदोलना दरम्यान नुकसान झाल्यास संबंधित संघटना किंवा राजकीय पक्षाच्या प्रमुखाविरूद्ध अथवा सार्वजनिक किंवा खाजगी नुकसानीस जबाबदार असलेल्यांविरूद्ध गुन्हेगारी कारवाई करण्यासही न्यायालयानं अनुकुलता दर्शवली आहे.
**
येत्या ११ डिसेंबर पासून नागपूर इथं राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार असल्याची माहिती विधीमंडळ कार्य मंत्री गिरीष बापट यांनी काल मुंबईत दिली. २२ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालेल, या अधिवेशनात १३ नवीन विधेयकं आणि ११ अध्यादेश सादर केले जातील, असं ते म्हणाले.
**
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत राज्यात वनशेती उपअभियान राबवायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतीतल्या उत्पादनासह वृक्ष लागवड वाढवणं हा या योजनेचा उद्देश आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पिकांचं नुकसान टाळण्यासाठी कृषी पंपांना दिलेल्या बारा तासांच्या थ्री फेज वीज पुरवठ्यापोटी महावितरणला अनुदान द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. विविध वस्तू आणि सेवांप्रमाणे माहिती तंत्रज्ञान विषयक सर्व बाबींची खरेदीही केंद्र शासनानं विकसित केलेल्या गव्हर्नमेंट- इ - मार्केटप्लेस - जीईएम या वेबपोर्टलच्या माध्यमातून करायलाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली. शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबवलेल्या विविध योजनांची दखल सरकारनं घेतली असून, त्यांच्यात निकोप स्पर्धा वाढवण्यासाठी उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार द्यायचा निर्णयही कालच्या बैठकीत झाला.
****
गोवा पणजीत काल ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार समारोप झाला. या महोत्सवात फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या ‘वन ट्वेन्टी बीटस पर मिनिट’ या चित्रपटानं सुवर्णमयूर पटकावला. चीनचे दिग्दर्शक वुईवून कू यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा, फ्रेंच अभिनेता नेहूल पर्झ बिस्कार्त याला उत्कृष्ट अभिनेत्याचा तर केरळच्या पार्वती टी. के. हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘टेक ऑफ’ या चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला तर ‘डार्क स्खूल’ या चित्रपटासाठी बोलिव्हियन दिग्दर्शक किरो रुसो यांना रुपेरी मयूर पुरस्कार देण्यात आला. चिनचे विवियन क्यू यांना अँगल्स वियर व्हाईट या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. मनोज कदम यांच्या ‘क्षितिज’ या मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरचित्रवाणी आणि दृकश्राव्य संवाद परीषद -आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याशिवाय कॅनडाच्या अटोम इग्वोयन यांना इफ्फी २०१७ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यासह चित्रपट सृष्टीतले नामवंत मान्यवर यावेळी उपस्थित होते.
***
स्वतंत्र मराठवाड्याला काँग्रेसचा विरोध असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाच्या पूर्व तयारीसाठी औरंगाबाद इथं विभागीय पातळीवर काल बैठक झाली, या बैठकीनंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे हीच आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आघाडी सरकारच्या काळात ज्या लोकांना योजनांचा लाभ मिळाला त्यांच्या जाहीराती आणि फोटो दाखवून हे सरकार श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केली.
****
राज्य सरकारतर्फे दिला जाणारा ‘तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार यंदा जेष्ठ कलावंतर मधुकर नेराळे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल या पुरस्काराची घोषणा केली. तमाशा क्षेत्रात दीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकाराला दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
****
लातूर जिल्ह्यात काल पहाटे झालेल्या रस्ते अपघातात सात जण जागीच ठार तर १४ जण जखमी झाले आहेत. लातूर- नांदेड महामार्गावर टायर फुटल्यानं कोळपा गावानजीक रस्त्यालगत उभ्या असलेल्या टृकवर पंढरपूरहून नांदेडकडे जाणारी एक जीप भरधाव वेगानं येऊन आदळली, त्याचवेळी ही जीप नांदेडकडून येणाऱ्या अन्य एका जीपला धडकून त्यांची समोरासमोर टक्कर झाली. एका टेंपोला ओलांडून पुढे जायच्या प्रयत्नात मोटारीच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा विचित्र अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
**
सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
****
स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथं महापौर शिला भवरे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण समितीच्या वतीनं औरंगाबाद इथं परिसंवाद घेण्यात आला. युवकांचे भवितव्य या विषयावर आयोजित या परिसंवादात अनेक तरुण तरुणींनी आपले विचार मांडले.
****
न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी डाव्या लोकशाही आघाडीनं केली आहे. काल औरंगाबाद इथं सुभाष लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रपतींना विभागीय आयुक्तांमार्फत तर सरन्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामार्फत निवेदन पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
***
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या मसला या गावात येणारी बस रस्त्यांवरच्या खड्यांमुळं बंद करण्यात आल्यामुळे काल या गावातल्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात तहसीलदाराच्या दालनात शाळा भरवली. या बसनं गावातले विद्यार्थी शिक्षणासाठी गंगाखेड इथं ये जा करतात. तहसीलदार आसाराम छडीदार यांनी आगार प्रमुखांना बस सुरू करण्याचे तसंच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचे आदेश दिले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना येत्या ७ डिसेंबरपासून कृषी पंपांसाठी रात्रपाळीत केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यात बदल केला जाणार असून आता दिवसाही काही तास कृषी पंपांसाठी वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऐन हिवाळ्यात रात्रपाळीतल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती.
*****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातल्या दोषी आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
*****

No comments: