Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींना आज शिक्षा
सुनावण्यात येणार आहे. गेल्या शनिवारी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं तीन्ही आरोपींना
दोषी ठरवल्यानंतर कालपासून शिक्षेवर युक्तीवाद सुरु झाला. आज युक्तीवाद संपल्यानंतर
शिक्षा सुनावण्यात येणार आहे. यामुळे अहमदनगर जिल्हा न्यायालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त
ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातला आरोपी नितीन भैलुमे याचे वकील प्रकाश आहेर यांना अज्ञातांकडून
जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आहेर यांनी काल दोषींना कमीत कमी शिक्षा देण्याची
मागणी केल्यामुळे त्यांना ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी त्यांनी संगमनेर पोलिस ठाण्यात
तक्रार दाखल केली आहे.
****
काँग्रेस पक्षानं पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचं मान्य केलं असल्याचं पाटीदार
आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी सांगितलं आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या निवडणूक
जाहीरनाम्यात पाटीदार समाजाला आरक्षण देणार असल्याचा मुद्दा समाविष्ट करणार असल्याचंही
त्यांनी आज अहमदाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. गुजरात विधानसभा निवडणुकीत
काँग्रेस पक्ष सत्तेवर आला, तर ते पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचं विधेयक आणणार असल्याचं
पटेल यांनी सांगितलं.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन पुढच्या महिन्यात सुरु होईल, असं संसदीय व्यवहार मंत्री
अनंत कुमार यांनी सांगितलं आहे. भारतीय जनता पक्ष संसदीय कार्यवाहीसाठी कटीबद्ध असल्याचं
ते म्हणाले. हिवाळी अधिवेशन घेण्यास उशीर होत असल्याबद्दल टीका करणाऱ्या काँग्रेस पक्षासंबंधी
बोलताना कुमार यांनी, युपीए सरकारच्या काळातही दोन वेळा हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये
झालं असल्याचं सांगितलं.
****
वस्तू आणि सेवा करातल्या
दरांमधल्या कपातीचे लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशातल्या काही
ग्राहकोपयोगी कंपन्यानी त्यांच्या विविध उत्पादनांवरचे दर कमी केले आहेत. आय टी सी, डाबर, एच यु एल आणि मॅरिको या कंपन्यांनी
ही घोषणा केली आहे. याशिवाय इतर काही
श्रेणीतल्या वस्तूंचे दर कमी करण्याचे संकेतही या कंपन्यांनी दिले आहेत. केंद्र
सरकारनं जीएसटी दर कमी केल्यानंतर त्याचा लाभ ग्राहकांना मिळावा यासाठी केलेल्या
आवाहनानंतर कंपन्यांनी हे पाऊल उचललं आहे.
****
कुक्कुटपालन केंद्रांमध्ये होणारा प्रतिजैविकांचा वारेमाप वापर आणि निर्माण
होणाऱ्या कचऱ्याची अयोग्य रीतीनं लावलेली विल्हेवाट याविषयी राष्ट्रीय हरित
लवादानं केंद्र सरकार आणि संबंधितांना नोटीस जारी केली आहे. याविषयीच्या एका
याचिकेची दखल घेऊन लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांनी केंद्रीय वन
आणि पर्यावरण मंत्रालय, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था
आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस पाठवली आहे. सर्व संबंधितांनी तीन
आठवड्यांच्या आत यावर उत्तर द्यावं असा
आदेशही लवादानं दिला आहे. यासंदर्भातली पुढची सुनावणी नऊ जानेवारी २०१८ रोजी होणार
आहे.
****
अकोला – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वाशिम जिल्ह्यातल्या मेडशी इथं लेंडीनदीच्या
पुलावरुन सफरचंदानं भरलेला ट्रक कोसळून झालेल्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला,
तर वाहक किरकोळ जखमी झाला. आज पहाटे हा अपघात झाला. जखमींना अकोला इथल्या जिल्हा सामान्य
रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथं आज काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष सरकारच्या
विरोधात गाजर वाटून आंदोलन केलं. सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीची फक्त घोषणा केली,
मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी केली नसल्याचं सांगून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारचा
निषेध केला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात विद्युतीकरण प्रभावीपणे राबवण्यासाठी येत्या शनिवारी खासदार
चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विद्युतीकरणाची बैठक होणार आहे. जिल्ह्यातलं
विद्युतीकरण आणि त्याचं विस्तारीकरण याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे. वीज
ग्राहक आणि नागरिकांच्या विद्युतीकरणासंबंधी तक्रारी, अडचणी किंवा समस्या असल्यास त्यांनी
बैठकीस उपस्थित राहण्याचं आवाहन खासदार खैरे यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्हा परिषदेनं स्वच्छतेच्या विषयावर काल विशेष सभा बोलावली होती. अशा प्रकारची
सभा घेणारी लातूर ही राज्यातली पहिली जिल्हा परिषद आहे. ही सभा सुरु होण्यापूर्वी काँग्रेस
पक्षाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं. सभेत कोणत्याही विषयाआधी
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज
देशमुख यांनी केली. या मागणीला उपाध्यक्षांनी विरोध केल्यानं देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या
सदस्यांनी सभात्याग केला.
****
हाँगकाँग मधल्या कोलोन्ग इथं आयोजित हॉंगकाँग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत आज
भारतीय खेळाडूंचे वेगवेगळ्या गटात आठ सामने होणार आहेत. महिला एकेरीत पी.व्ही.
सिंधूचा सामना हाँगकाँगच्या ल्यूंग यूएटशी होईल तर सायना नेहवालचा सामना
डेन्मार्कच्या मेटे पोल्सीनशी होणार आहे.
*****
No comments:
Post a Comment