आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२३ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज नवी दिल्ली इथं सायबर स्पेसवरील जागतिक परिषदेचं उद्घाटन केलं. ‘सायबर सर्वांसाठी
: शाश्वत विकासाकरता सुरक्षित आणि समावेशक सायबरस्पेस’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना
आहे. सायबरस्पेसचा जास्तीत जास्त उपयोग करण्याविषयीचे मुद्दे आणि आव्हानांवर आंतरराष्ट्रीय
नेते, धोरणकर्ते, उद्योगातील तज्ञ, विचारगट आणि सायबर तज्ञ या परिषदेत
आपले विचार मांडणार आहेत. जागतिक सायबर धोरणात समावेशकता आणि मानवी हक्कांचं महत्व
यास या परिषदेत चालना देण्यात येणार आहे.
****
दादरच्या चैत्यभूमीला
तीर्थस्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे राज्यशासनानं अर्थसंकल्पात चैत्यभूमीसाठी निधीची तरतूद
करावी असं केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते
काल मंत्रालयात वार्ताहरांशी बोलत होते. हा निधी येणाऱ्या भाविकांच्या सोयी
सुविधांसाठी उपयुक्त ठरेल असं ते म्हणाले. याआधी
आठवले यांनी येत्या सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर येणाऱ्या लोकांसाठी
करण्यात येणाऱ्या रेल्वे, बस, आरोग्य, सुरक्षा आदी सोयी सुविधांबाबतचा अधिकारी
आणि कर्मचार्यांकडून आढावा घेतला.
****
प्लास्टिक बाटली
बंदीच्या नियमानुसार प्लास्टिक बाटली उत्पादक कंपन्यांनी विक्री केलेल्या बाटल्या बाजारातून
पुन्हा संकलित करून त्याचा पुनर्वापर करण्यासंबंधीचे प्रकल्प तयार करावेत, असं
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. प्लास्टिक
बाटल्यांची निर्मिती आणि पुनर्वापर यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शासनाची
अभ्यास समिती प्लास्टिक बाटल्यांना पर्याय आणण्यासंदर्भात लवकरच अहवाल सादर करणार असून
उद्योगांवर विपरीत परिणाम न होऊ देता पर्यावरणाचा समतोल राखता यावा, यासंदर्भात
ही समिती उपाय सुचवणार असल्याचं कदम यांनी सांगितलं.
****
अवैध कीटकनाशकांच्या
विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी कृषी आयुक्तालयानं राज्यभर भरारी पथकांच्या माध्यमातून
कारवाई केली असून साधारण दोन कोटी २३ लाख रुपये किमतीच्या कीटकनाशकांचा अवैध साठा जप्त
करण्यात आला आहे. अकोला, सांगली, जळगावसह राज्यातल्या विविध भागांमध्ये
केलेल्या कारवाईनंतर विनापरवाना तसंच कालबाह्य कीटकनाशकं, रासायनिक
खते विक्री करणाऱ्या दुकानांवर आणि उत्पादन कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
*******
No comments:
Post a Comment