Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 30 November 2017
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
आर्थिक वृद्धी दराचा आकडा दहा टक्क्यांपर्यंत आणणं हे
एक आव्हान असून, जागतिक अर्थव्यवस्थेवर तो अवलंबून असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण
जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं हिंदुस्थान टाईम्स नेतृत्व परिषदेत बोलत
होते. सरकारच्या नैतिक धोरणांमुळे जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्थेला महत्वाचं स्थान
प्राप्त झालं असल्याचं ते म्हणाले. कराचा दर पाच टक्के असणारा भारत हा एकमेव देश असून,
त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना कराच्या कक्षेत आणता येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
अमेरिकेच्या एनाहेम इथं झालेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद
स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं सुवर्ण पदक पटकावलं. १९९५ नंतर देशाला प्रथमच वेटलिफ्टिंगमध्ये
सुवर्ण पदक मिळालं आहे. या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मीराबाई चानूचं
अभिनंदन केलं आहे. संपूर्ण देशाला तिचा अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात
म्हटलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनीही मीराबाईचं अभिनंदन
केलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला आणि बडगाम
जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या दोन वेगेवगळ्या चकमकीत
पाच दहशतवादी ठार झाले.
बडगाम जिल्ह्यातल्या पखेरपुरा भागात दहशतवादी लपले असल्याची
माहिती मिळाल्यानंतर जवानांनी आज सकाळी शोधमोहीम सुरु केली. त्यावेळी झालेल्या चकमकीत
चार दहशतवादी ठार झाले.
तर दुसरीकडे बारामुल्ला जिल्ह्यातल्या सगीपुरा
जंगलात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. याठिकाणी दुपारपर्यंत चकमक सुरू होती.
****
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ - सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष
प्रसून जोशी, पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादासंबंधी माहिती देण्यासाठी आज
संसदीय समितीसमोर हजर राहिले. या चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्याची मागणी राजस्थानचे
दोन खासदार सी.पी.जोशी आणि ओम बिरला यांनी समितीला केली होती. सेन्सॉर बोर्डानं फक्त
चित्रपटाच्या प्रोमोलाच मान्यता दिली असून, तज्ज्ञांना दाखवल्यानंतरच प्रमाणपत्र देण्याचा
निर्णय होईल, असं जोशी यांनी समितीला सांगितलं.
****
ईद-ए-मिलादचा सण उद्या साजरा होणार असून, राज्यपाल सी.विद्यासागर
राव यांनी राज्यातल्या जनतेला ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा
जन्मदिवस असलेला ईद-ए-मिलाद हा सण प्रेषितांच्या प्रेम, दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण
करुन देतो. हा पवित्र सण परस्पर बंधुभाव आणि सौहार्द वृद्धिंगत करो, असं राज्यपालांनी
आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
एचआयव्ही एड्स प्रतिबंधासाठी लोकचळवळीतून
एकत्रित काम करणं गरजेचं असल्याचं मत आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केलं.
एक डिसेंबर हा दिवस
जागतिक एड्स दिन म्हणून पाळण्यात येतो, त्यानिमित्त मुंबई
इथं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेच्यावतीनं आयोजित राज्यस्तरीय
कार्यक्रमात ते आज बोलत होते. एचआयव्ही एड्स बाधितांसाठी राज्यातल्या ३४ जिल्ह्यांत
५९५ एकात्मिक समुपदेशन आणि तपासणी केंद्रं असून, त्याठिकाणी समुपदेशन आणि मोफत औषधं
दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, जागतिक एड्स दिनानिमित्त
आज औरंगाबाद शहरात जनजागरण रॅली काढण्यात आली. क्रांती चौकातून निघालेल्या या रॅलीला
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीच्या अधिष्ठाता कानन येळीकर यांच्या
हस्ते सुरुवात झाली. रॅलीचा समारोप मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर करण्यात
आला.
परभणी इथंही महानगरपालिका आयुक्त
राहुल रेखावार यांनी जनजागरण रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी महविद्यालयीन विद्यार्थी
मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
‘उडान’ या योजनेत समाविष्ट असलेली नांदेड
- मुंबई - नांदेड विमानसेवा ‘ट्रू जेट’ या विमान कंपनीनं सुरू केली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, तसंच सामान्य प्रशासन विभागानं ही
माहिती दिली. नांदेड इथून सकाळी दहा वाजून
३५ मिनीटांनी विमान उड्डाण घेईल आणि दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी मुंबईला उतरेल, तर परतीच्या प्रवासात हे विमान
मुंबई इथून दुपारी बारा वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि नांदेड इथं दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.
****
औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या
वतीनं आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी काँग्रेस
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जालना मार्ग अडवून धरत केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी
केली. बोंड अळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत, सरसकट कर्जमाफी,
शेतीमालाला हमीभाव, दुधाला ३० रुपये प्रतिलिटर भाव, वीज शुल्क माफी अशा मागण्या करण्यात
आल्या. जवळपास पंधरा मिनिटं रस्ता अडवण्यात आल्यानं वाहतूक खोळंबली होती.
****
No comments:
Post a Comment