Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2017
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथं शाळकरी मुलीवर बलात्कार आणि
हत्या प्रकरणातल्या तिन्ही दोषी आरोपींना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा
सुनावली आहे. आज सकाळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जीतेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि
नितीन भैलुमे अशी या तिघा आरोपींची नावं असून, तिघांचा गुन्हा गेल्या अठरा तारखेला
सिद्ध झाला होता. गेल्या वर्षी १३ जुलै रोजी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभर मोर्चे आणि
निदर्शनं झाली होती.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
सहा डिसेंबरला आठ विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. नागपूर
- मुंबई, मुंबई - अजनी, मुंबई - सेवाग्राम, तसंच सोलापूर - मुंबई मार्गावर या गाड्या
धावतील. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संबंधित रेल्वे स्थानक अधीक्षकांशी संपर्क साधावा,
असं आवाहन करण्यात आलं आहे.
**** माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संसदीय समितीनं, पद्मावती या चित्रपटाचे
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना आपल्यासमोर
हजर होण्यास सांगितलं आहे. या चित्रपटात ऐतिहासिक बाबींशी छेडछाड केलेली असल्याचा आरोप
झाल्यामुळे उद्भवलेल्या वादाबाबत, आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना या समितीसमोर बोलावण्यात
आल्याची माहिती, या समितीचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना
दिली. या समितीची बैठक उद्या होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाबद्दलचा वाद थांबल्याशिवाय
हा चित्रपट बिहारमध्ये दाखवण्यात येणार नसल्याचं मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी म्हटलं
आहे. गुजरात, राजस्थानसह इतरही अनेक राज्यांनी या तुर्तास चित्रपटाचं प्रदर्शन न करण्याचा
निर्णय यापूर्वीच घेतला आहे.
****
उच्च रक्तदाबावर नियंत्रण तसंच त्यापासून बचाव, यासाठी केंद्रसरकारनं
उच्च रक्तदाब व्यवस्थापन, हा उपक्रम सुरू केला आहे. रक्तदाब नियंत्रणात सुधारणा करणं,
आहारातला मिठाचा वापर कमी करणं आणि कृत्रिम मेदयुक्त घटकांचं आहारातून उच्चाटन करणं,
या त्रिसूत्रीच्या माध्यमातून या रोगाशी संबंधित मृत्यू आणि अपंगत्वाचं प्रमाण कमी
करणं, हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. पंजाब, केरळ, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातल्या पंचवीस
जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक स्वरुपात राबवण्यात येणार आहे.
****
राज्य विधीमंडळाचं शीतकालीन सत्र येत्या अकरा ते बावीस डिसेंबर
या कालावधीत नागपूर इथे होणार आहे.या अधिवेशनात तेरा विधेयकं आणि अकरा अध्यादेश, तसंच
विधान परिषदेत प्रलंबित असलेली पाच विधेयकं सभागृहाच्या पटलावर ठेवली जाणार असल्याची
माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली. विरोधी पक्षांनी अधिवेशनाचा कालावधी
वाढवण्याची मागणी केली असून, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक
वीस डिसेंबरला घेण्यात येईल, असंही बापट यांनी सांगितलं.
****
राज्यसरकारनं उद्योगांसंदर्भात गेल्या तीन वर्षात घेतलेल्या विविध
निर्णय आणि धोरणांचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून
देण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार,
राज्यात इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत पाच हजार त्रेपन्न कोटी रुपये तर माहिती तंत्रज्ञान
आणि सहाय्यभूत सेवा धोरणांतर्गत आठशे एकोणतीस कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
****
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातल्या अंजग इथली आठशे त्रेसष्ठ
एकर जागा औद्योगिक विकासासाठी मिळणार आहे. शेती महामंडळाची ही जागा पश्चिम औद्योगिक
क्षेत्रासाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला होता, त्यानुसार उद्योग विभागानं
चौतीस कोटी अठरा लाख रुपये शेती महामंडळाला वर्ग केले आहेत, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास
राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागाला
या औद्योगिक वसाहतीचा मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा आहे.
****
कांद्याला योग्य भाव मिळावा, आणि कांदा खरेदीसाठी स्पर्धा निर्माण
व्हावी यासाठी खास बाब म्हणून राज्यात मागेल त्याला खरेदीदाराचा परवाना अर्थात डायरेक्ट
मार्केटिंग लायसन्स देण्यात यावं, असे निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले
आहेत. ते काल मंत्रालयात यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते. देशाच्या एकूण कांदानिर्यातीच्या
सत्तर ते ऐंशी टक्के निर्यात महाराष्ट्रातून, विशेषत: नाशिक परिसरातून होते, असं नमूद
करत, अडते आणि व्यापाऱ्यांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी मागेल त्याला खरेदीदाराचे
परवाने देण्याचं धोरण नाशिकमध्ये लागू करण्याचे
निर्देश त्यांनी दिले. *****
No comments:
Post a Comment