आकाशवाणी
औरंगाबाद.
संक्षिप्त
बातमीपत्र
३०
नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू काश्मीरमधल्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये
सध्या चकमक सुरु आहे. जवानांच्या शोधमोहीमेदरम्यान ही चकमक सुरु झाल्याचं पोलिस उपमहानिरीक्षक
गुलाम हसन भट्ट यांनी सांगितलं. या चकमकीत आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.
****
पंतप्रधान
ग्रामीण आवास योजनेनं दहा लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट वेळेच्या आधीच पूर्ण केलं आहे.
गेल्या २० नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रा इथून या योजनेचा शुभारंभ
केला होता. ग्रामीण विकास मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सरकारनं ३१ मार्च २०१९
पर्यंत एक कोटी घरं बांधण्याचं उद्दिष्ट निर्धीरित केलं असून पुढच्या वर्षीच्या ३१
मार्च पर्यंत ५१ लाख घरं बांधण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह, मध्य
प्रदेश, ओडिशा, राजस्थान, आदी राज्यात या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्याचं
याबाबतच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं २०१८ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या
परीक्षांचं वेळापत्रक काल जाहीर केलं. इयत्ता बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते
वीस मार्च दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा एक मार्च ते चोवीस मार्च या कालावधीत
होणार आहे. हे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबरला आठ विशेष
रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. नागपूर - मुंबई, मुंबई -
अजनी, मुंबई - सेवाग्राम, तसंच सोलापूर - मुंबई मार्गावर या गाड्या धावतील. अधिक माहितीसाठी
इच्छुकांनी संबंधित रेल्वे स्थानक अधीक्षकांशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं
आहे.
****
विभागीय
महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांना आजपासून जालना इथं प्रारंभ होत आहे. राज्याचे
पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री तसंच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री
बबनराव लोणीकर
यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे. सुमारे
१५०० खेळाडू
यात सहभाग घेणार आहेत.
*****
No comments:
Post a Comment