Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 22 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२
नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
*******
- राज्यानं खरेदी केलेल्या तुरीची, डाळ बनवून स्वस्त धान्य दुकानातून विक्री करण्यास सरकारची मान्यता, प्रधानमंत्री मातृवंदना योजना राज्यात राबवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
- राज्यातल्या पाच विद्यापीठांच्या बृहत आराखड्यांना अंतिम मंजुरी
- कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी तिन्ही दोषी आरोपींच्या शिक्षेवर युक्तीवाद सुरु
आणि
- कृषी संजीवनी योजनेचा फेर आढावा घेण्याची विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी
****
राज्य
मंत्रीमंडळाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत
राज्याच्या निधीतून खरेदी केलेल्या तुरीपासून डाळ तयार करुन ती स्वस्त धान्य
दुकानातून विकायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. ५५ रूपये
प्रतिकिलो दरानं ही डाळ उपलब्ध होईल. वीज वितरण प्रणालीच्या
आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या पायाभूत
आराखडा दोन या योजनेला राज्य सरकारनं मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय
घेतला. या निर्णयामुळे ग्राहकांना योग्य प्रमाणात खात्रीशीर
वीजपुरवठा करणं शक्य होणार आहे. सर्व वर्गवारीतल्या
ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार त्यांना नवीन विद्युत जोडण्या देण्यासाठी २०१३ ते
२०१७ या कालावधीत पायाभूत आराखडा प्रकल्प दोन म्हणजे इन्फ्रा टू ही योजना राबवल्या
जात आहे. सध्या या प्रकल्पाचं नव्वद टक्के काम पूर्ण झालं
आहे.
केंद्र सरकारनं माता आणि
बालमृत्यू रोखण्यासाठी सुरू केलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना राज्यात
राबवण्यासही मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मंजुरी दिली. या योजनेसाठी राज्य शासन
४०टक्क्यांचा आर्थिक भार उचलणार आहे. गर्भवती आणि स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्या
आरोग्यात सुधारणा केल्यास जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचंही आरोग्य सुधारतं, त्यासोबतच प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर
महिलांना आपल्या बुडणाऱ्या रोजगाराची चिंता पडू नये म्हणून केंद्र सरकारनं ही
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना गेल्या १ जानेवारीपासून देशभरात सुरू केली आहे.
यंत्रमाग
उद्योगाला चालना देण्यासाठी साध्या यंत्रमाग धारकांनी बँका किंवा वित्तीय
संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरात पाच टक्के सवलत द्यायचा निर्णय काल
मंत्रिमंडळानं घेतला. या निर्णयाचा
लाभ राज्यातल्या ८५ टक्के यंत्रमाग धारकांना होणार असून त्यासाठी दोन कोटी
एकाहत्तर लाख रुपयांची तरतूद करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात हाती घेतलेल्या कामांचं सोशल ऑडिट म्हणजे
सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी स्वतंत्र सामाजिक अंकेक्षण सोसायटीची स्थापना करायला
मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
चालू शैक्षणिक वर्षाच्या
पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्कासाठी देण्यात येणाऱ्या
५० टक्के रकमेपैकी ६० टक्के रक्कम आणि निर्वाहभत्त्याची सर्व रक्कम
विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यासही मंत्रिमंडळानं काल
मान्यता दिली.
केंद्र
आणि राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती किंवा फ्री शिप योजनेअंतर्गत २०१६-१७ पर्यंत शैक्षणिक संस्था, महाविद्यालयाला द्यावयाच्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम संबंधितांना ऑफलाईन
द्यायचा तसंच आणि निर्वाह भत्त्यांची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक
खात्यावर जमा करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
****
राज्यातल्या पाच
विद्यापीठांच्या बृहत आराखड्यांना अंतिम मंजुरी देण्यात आल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
सांगितलं. मुंबईत काल महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि
विकास आयोगाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यामध्ये
औरंगाबादचं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पुण्याचं सावित्रीबाई फुले
विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, गडचिरोलीचं गोंडवाना विद्यापीठ, कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ
यांचा समावेश आहे. या विद्यापीठांनी
मांडलेल्या बृहत आराखड्यांमध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था, अभ्यासक्रम, विद्याशाखा आणि विषय यांचा
समावेश आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी जिल्हा आणि सत्र
न्यायालयानं तिन्ही आरोपींना दोषी ठरवल्यानंतर काल त्यांना सुनावण्यात येणाऱ्या
शिक्षेवर युक्तीवाद सुरु झाला. हा युक्तिवाद आजही सुरु राहणार आहे. आरोपी नितीन
भैलुमे यानं आपण निर्दोष असून, या गुन्ह्याशी कसलाही संबंध
नसल्याचं न्यायालयात सांगितलं. आरोपी जितेंद्र शिंदे याच्या
वकीलानंही आरोपीला कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. गेल्या शनिवारी न्यायालयानं या आरोपींना दोषी
ठरवलं होतं.
****
कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात
आलेल्या कृषी संजीवनी योजनेचा फेर आढावा घेण्याची मागणी विधानपरिषदेतले विरोधी
पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. काल मुंबईत मुंडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना या संदर्भात एक निवेदन दिलं. या योजनेच्या नावाखाली
शेतकऱ्यांकडून सहा हजार ५०० कोटी रूपयांची बेकायदेशीर वसुली सरकार करत
असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.
****
लातूर इथल्या केंद्रीय राखीव पोलिस दल प्रशिक्षण
केंद्रातल्या प्रशिक्षणार्थींच्या गोळीबार सरावासाठी शिरुर अनंतपाळ तालुक्यातल्या
हलकी या गावातली ३७ हेक्टर जमीन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय काल जिल्हा
विकास समन्वयन आणि सनियंत्रण समितीनं घेतला असल्याचं खासदार डॉक्टर सुनिल गायकवाड
यांनी वार्ताहरांना सांगितलं. याचबरोबर प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे
बायोगॅस निर्माण करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
****
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या
वतीनं देण्यात येणारा पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार ज्येष्ठ जलतज्ञ
माधवराव चितळे यांना संस्थेचे ज्येष्ठ सभासद भुजंगराव कुलकर्णी यांच्या हस्ते काल
औरंगाबाद इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात
आला. पुरस्कार
वितरणानंतर मराठवाड्याच्या भविष्यकालीन विकासाच्या वाटा या विषयावर बोलतांना चितळे
यांनी, फलोत्पादन आणि दुग्ध विकास वाढवायला मराठवाडा प्रदेश
अनुकूल असल्याचं सांगितलं.
****
लातूर
जिल्ह्यातल्या विलासनगर इथल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी
साखर कारखान्यानं चालू गळीत हंगामासाठी ऊसाची पहिली उचल प्रति मेट्रीक टन २२००
रुपये अशी जाहीर केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष दिलीप
देशमुख यांनी ही माहिती दिली.
****
नांदेड-लिंबगाव-चुडावा-पूर्णा दरम्यान रेल्वे रुळाच्या देखभाल आणि
दुरुस्तीच्या कामासाठी येत्या २५ नोव्हेंबरपासून ३ डिसेंबर दरम्यान आठ दिवसांचा
लाईन ब्लॉक दोन टप्यात घेण्यात येणार आहे. यातला पहिला टप्पा
मध्यरात्रीनंतर बारा वाजून ४० मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून १० मिनिटांपर्यंत असणार
आहे तर दुसरा टप्पा सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी दोन वाजून २०
मिनिटांपर्यंत राहील. या दरम्यानच्या काही रेल्वे गाड्या
अंशतः रद्द करण्यात येत आहेत, तर काही उशिरानं धावणार आहेत.
****
प्रवाशांच्या
सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं नगरसोल ते तिरुपती या विशेष रेल्वे गाडीच्या २६
फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
****
औरंगाबाद शहरानजिकच्या जटवाडा परिसरातल्या आहेर
इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या मुख्याध्यापकासह ५ शिक्षकांना काल निलंबित
करण्यात आलं. विभागीय आयुक्त
पुरुषोत्तम भापकर यांनी १५ नोव्हेंबर रोजी या शाळेची पाहणी केली होती, त्यावेळी हे सर्वजण विनापरवानगी गैरहजर असल्याचं आढळून आल्यानं ही कारवाई
करण्यात आली.
****
औरंगाबाद इथल्या संग्रामनगर भुयारी मार्गासाठी राज्य
रस्ते विकास महमंडळानं नांदेडच्या दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना
अकरा कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचं विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी यांनी
सांगितलं. भुयारी मार्गाच्या कामासंदर्भात भापकर यांनी काल
औरंगाबाद इथं आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
****
परभणी इथं १९९४ साली दोन
अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी दहा आरोपींपैकी सहा आरोपींना जिल्हा
सत्र न्यायालयानं ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं
काल कायम ठेवली आहे. या सहा आरोपीत
शिवसेना नेते कल्याण रेंगे यांचा समावेश आहे.
****
राष्ट्रीय
महामार्गासाठीच्या भूसंपादनात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्याची रक्कम संबंधित
व्यक्तिच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेतांना बीड इथल्या
भूसंपादन कार्यालायातला कारकून जगन्नाथ घाडगे याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या
पथकानं अटक केली. जगन्नाथ
यानं एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
****
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव
इथल्या मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहातल्या गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजार
रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. विद्यार्थ्यांचं भोजन पुरवठा देयक
मंजूर करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
*******
No comments:
Post a Comment