Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३०
नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि
****
** कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी तिन्ही दोषी आरोपींना
फाशीची शिक्षा
** या निकालामुळे समाजातल्या अपप्रवृत्तींना जरब बसण्याबरोबरच
न्यायपालिकेवरचा विश्वास वाढला असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
** इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
आणि
** औरंगाबाद महापालिकेच्या कर्मचारी भरती प्रक्रियेत आढळलेल्या
दोषी आठ अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
***
****
अहमदनगर
जिल्ह्यातल्या कोपर्डी इथं शाळकरी मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या तिन्ही दोषी
आरोपींना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. जीतेंद्र शिंदे,
संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे अशी या तिघा आरोपींची नावं असून, तिघांचा गुन्हा गेल्या
अठरा तारखेला सिद्ध झाला होता. गेल्या वर्षी १३ जुलै रोजी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभर
मोर्चे आणि निदर्शनं झाली होती.
या
निकालाबाबत प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, समाजातल्या अपप्रवृत्तींना
जरब बसण्याबरोबरच न्यायपालिकेवरचा विश्वास या निकालामुळे वाढला असल्याचं म्हटलं आहे.
या शिक्षेमुळे महिला अत्याचाराच्या घटनांना पायबंद बसेल, अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी
तपास यंत्रणा तसंच सरकारी वकिलांचं अभिनंदन केलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब
दानवे यांनी प्रतिक्रिया नोंदवताना, भविष्यात असे गुन्हे घडू नयेत यासाठी, या निर्णयामुळे
योग्य संदेश गेला असल्याचं मत व्यक्त केलं.
राज्य
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याबाबत भावना व्यक्त करताना, कोपर्डीचा
खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून राज्य सरकारने पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना
जलद न्याय मिळवून दिला, असं म्हटलं आहे. ही शिक्षा उच्च न्यायालयामध्येही कायम राहावी,
यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी, हा निकाल न्यायव्यवस्थेवरचा
विश्वास दृढ करणारा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. निर्भया प्रकरणानंतर काँग्रेस
सरकारने कायद्यात सुधारणा केली त्यामुळे कोपर्डी प्रकरणाची सुनावणीही जलद झाली आणि
आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
विधान
परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, हा निकाल पीडितेच्या कुटुंबीयांना काही
अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
****
राज्य
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर येत्या १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मोर्चा काढून अधिवेशनाचं कामकाज रोखून धरणार आहे. राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध
नोंदवण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करणार
असल्याचं, पक्षसूत्रांकडून सांगण्यात आलं.
विधीमंडळाचं
हिवाळी अधिवेशन येत्या अकरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीत नागपूर इथे होणार
आहे. या अधिवेशनात तेरा विधेयकं आणि अकरा अध्यादेश, तसंच विधान परिषदेत प्रलंबित असलेली
पाच विधेयकं सभागृहाच्या पटलावर ठेवली जाणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश
बापट यांनी दिली.
****
जनलोकपालसह
शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे येत्या २३
मार्च रोजी शहीद दिनापासून नवी दिल्लीत आंदोलन सुरू करणार आहेत. यासंदर्भात अहमदनगर
जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथं झालेल्या एका बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. जनलोकपाल,
शेतकऱ्यांचे प्रश्न तसंच निवडणूक सुधारासाठी हे आंदोलन सुरू करत असल्याचं, अण्णा हजारे
यांनी सांगितलं.
****
राज्यात उडीद, मूग, सोयाबीन खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या
१६५ खरेदी केंद्रांवर चाळण आणि ग्रेडींग मशीनची व्यवस्था तत्काळ उपलब्ध करून देण्याचे
निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत यासंदर्भात आयोजित
बैठकीत बोलत होते. शेतमाल खरेदीनंतर शेतकऱ्यांना त्या रकमेचा धनादेश न देता
आरटीजीएस पध्दतीनं तत्काळ त्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्याची सूचनाही देशमुख यांनी
केली.
****
राज्यात पाली भाषा अकादमी सुरु करण्याबाबत प्रस्ताव तयार
करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले आहेत. ते काल मुंबई
इथं मंत्रालयात या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पाली
भाषेतल्या विपूल साहित्याची लोकांना माहिती व्हावी, तसंच या भाषेच्या विकासासाठी अशा
प्रकारची अकादमी स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करावा, यासाठी समिती गठित करावी, अशा
सूचनाही बडोले यांनी दिल्या.
****
राज्यातल्या दहा भू - विकास बँकांच्या मालमत्ता विक्रीची
प्रक्रिया तत्काळ राबवण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मालमत्ता विक्रीतून जमा होणाऱ्या रकमेतून कर्मचाऱ्यांचं
थकीत वेतन आणि निवृत्तीचे लाभ प्राधान्यानं अदा करावेत, असे निर्देशही या बैठकीत देण्यात
आले. भूविकास बँकांनी घेतलेल्या विविध कर्जांची परतफेड करण्यासाठी राज्य शासनाने त्यांना
मदत म्हणून एक हजार ८९७ कोटी रुपये दिले होते. मात्र गेल्या दोन वर्षात ही रक्कम वसूल
होवू शकलेली नाही.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं २०१८ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या
परीक्षांचं वेळापत्रक काल जाहीर केलं. इयत्ता बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते
वीस मार्च दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा एक मार्च ते चोवीस मार्च या कालावधीत
होणार आहे. हे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
नवबौद्ध
तसंच अनुसूचित जातींच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासनाच्या ‘स्वाधार‘
योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना
भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून ही योजना चालवली
जाते.
****
औरंगाबाद
महापालिकेत लाड समितीच्या शिफारशीनुसार झालेल्या १८८ कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत
आठ अधिकारी दोषी आढळले असून, संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाकडून
मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत. २०१० ते २०१५ या काळात महापालिकेत ही भरती झाली
होती. या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आल्यानं, सनदी अधिकारी तुकाराम
मुंढे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुंढे यांनी याबाबतचा
अहवाल विधीमंडळाकडे सादर केल्यानंतर कारवाईचे निर्देश देण्यात आले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या
५७ आदिवासी शाळांच्या गुणवत्तेचा दर्जा घसरल्यानं या शाळा बंद करण्याचे आदेश प्राथमिक
शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकाऱ्यांना दिले आहेत. या शाळांमधल्या १४१ शिक्षकांचं समायोजन जवळील शाळांमध्ये
करण्यात येणार आहे.
****
परभणी
जिल्ह्यात काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं, जिल्ह्यात
पालम तसंच गंगाखेड इथं तहसील कार्यालयावर मोर्चा काढून, प्रशासनाला निवेदन सादर करण्यात
आलं. राज्यात कोल्हापूरसह इतरही अनेक ठिकाणी पक्षाच्या वतीनं काल हल्लाबोल आंदोलन करण्यात
आलं.
****
बीड
जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील मादळमोही इथं शेतात बसवलेल्या डीपीला विद्युत जोडणी करून
देण्यासाठी आठ हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी महावितरणचा सहाय्यक अभियंता संतोष
राठोड आणि त्याच्या साथीदाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेने गुन्हा
नोंदवला आहे. या दोघांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार विभागास प्राप्त
झाली होती.
****
औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या
रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले
आहेत. ते काल जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांची परिस्थिती
गंभीर असल्यानं, वीजबिल वसुलीबाबत सक्ती न करता, टप्पाटप्पाने वीजबील भरण्याची सवलत
द्यावी, असंही खैरे यांनी म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जिल्हा निवडणूक विभागामार्फत
शालेय स्तरावर सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली, या स्पर्धेत जिल्ह्यातल्या १४९ शाळांचे
विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये विजेते ठरलेले ३०४ विद्यार्थी येत्या चार डिसेंबरला
जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होतील. उपजिल्हा निवडणूक आधिकारी गोविंद रणवीरकर यांनी
ही माहिती दिली.
****
नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागरुक राहून, कचऱ्याची विभागणी करण्यास
स्वत:पासून सुरुवात करावी, असं आवाहन परभणीचे महापालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी
केलं आहे. येत्या जानेवारी महिन्यात राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या
अनुषंगानं, ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वच्छता ॲपद्वारे आतापर्यंत सतराशे
तक्रारी प्राप्त झाल्या असून, या ॲपद्वारे आलेल्या तक्रारीचं बारा तासाच्या आत निवारण
करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
लातूर
शहरासह जिल्ह्यात वाहतूक नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश
लातूर जिल्हा सडक सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुनील गायकवाड यांनी दिले आहेत.
काल लातूर इथं जिल्हा सडक सुरक्षा समितीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. पोलिस प्रशासन
आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयानं बेशिस्त वाहतुकीस पायबंद घालून वाहतूक सुरळीत करावी
आणि गुन्ह्याचं स्वरूप बघून वाहन परवाना रद्द करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****
No comments:
Post a Comment