Thursday, 30 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.11.2017 13.00.


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 November 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  30 नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

                                      ****

भ्रष्टाचार मुक्त विकास प्रणाली सरकारची प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं हिंदुस्थान टाईम्स नेतृत्व परिषदेत बोलत होते. विमुद्रीकरणामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाल्याचं, तसंच वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे कर व्यवस्थेत पारदर्शकता आल्याचं ते म्हणाले. माध्यमांनी स्वच्छ भारत अभियान आणि सरकारच्या विविध योजनांचा प्रसार करावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम पारंपारिक आणि सामाजिक माध्यमांचा वापर करुन कमी वेळात जास्त जनतेपर्यंत पोहोचण्याचं उत्तम उदाहरण असल्याचं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी म्हटलं आहे. हैदराबाद इथं जागतिक उद्योजकता संमेलनात 'पारंपारिक आणि सामाजिक माध्यमांचा वापर' या विषयावरच्या चर्चासत्रात ते आज बोलत होते. सामाजिक माध्यमांचा प्रेक्षकांवर प्रचंड प्रभाव पडत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमातून आवाहन केल्यानंतर सेल्फी विथ डॉटर, अतुल्य भारत यासारखे उपक्रम सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय झाल्याचं ते म्हणाले.

****

बाजारात कांद्याच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी सरकारनं साठवण मर्यादेचा कालावधी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला आहे. केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कांद्याची विक्री करण्याचे निर्देश दिल्ली सरकारला दिले आहेत. तर, महाराष्ट्र आणि इतर राज्यांनी कमी दरात कांदा खरेदी करुन नंतर तो विकावा, असं त्यांना सांगितलं आहे. नाशिक, सोलापूर, अलवार आणि इंदूरमधे अजूनही २८ ते ३५ रुपये किलो दरानं कांदा उपलब्ध आहे. शिवाय कांदा आयात करण्याची प्रक्रिया सरकारनं सुरु केली असून, कांद्याच्या दरवाढीवर मात करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश नाफेड आणि इतर यंत्रणांना दिले आहेत, असं पासवान यांनी सांगितलं.

****

देशात उच्च शिक्षण देणार्या सहा प्रमुख शैक्षणिक संस्थांना त्यांच्या संशोधनाविषयक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि जागतिक पातळीवर ठसा उमटवण्यासाठी उच्च शिक्षण निधी पुरवठा संस्थेनं दोन हजार ६६ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, मद्रास, खरगपुर आणि कानपुर इथल्या आय आय टी आणि सुरतकाल इथल्या एन आय आय या संस्थाचा समावेश आहे. या संस्थाना केंद्रसरकारकडून मिळणार्या नियमित अनुदानाव्यतिरिक्त हा निधी दिला जाणार आहे. हा निधी उभारण्यासाठी निधिपुरवठा संस्था बाजारातून रक्कम उभी करणार असून व्याजमुक्त कर्जाच्या स्वरुपात तो या शिक्षणसंस्थांना पुरवला जाणार आहे.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी कर रचनेअंतर्गत गुळाचा सध्याचा अकृषक उत्पादन - नॉन अग्रीकल्चर प्रोड्युस हा दर्जा वगळून कृषि उत्पादन असाच करण्यात यावा, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. गुळावर जीएसटी लावल्यानं शेतकऱ्यांना कमी दर मिळणार असून, ग्राहकांनाही जादा दरानं गुळ घ्यावा लागू शकतो, असं खोत यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

विविध संस्था आणि सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सोसायट्यांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत असून, त्यासाठी राज्यात राबवण्यात येत असलेलं अटल महापणन विकास अभियान अत्यंत उपयुक्त असल्याचं प्रतिपादन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. जालना इथं आयोजित अटल महापणन विकास अभियान कार्यशाळेत ते बोलत होते. या अभियानात प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेऊन संस्था, सोसायट्यांचे सदस्य तसंच शेतकऱ्यांना विविध तज्ज्ञ व्यक्तीमार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

****

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची लातूर विभागातल्या जिल्ह्यात होत असलेल्या अंमलबजावणी बाबतचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक गतिमान पद्धतीनं काम करून शेवटच्या घटकापर्यंतच्या लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचण्याचे निर्देश, त्यांनी यावेळी दिले

****

राज्य सरकारनं दिलेल्या कर्ज माफी योजनेतली दुसरी यादी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाली असून, आणखी नऊ हजार ९६३ शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ५३ कोटी रुपयांची रक्कम जिल्हा बँकेच्या खात्यात वर्ग झाली आहे. कर्ज माफीच्या पहिल्या यादीत ८३७ शेतकऱ्यांना तीन कोटी ६० लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली होती.

****

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातल्या आणखी ७५३ शेतकऱ्यांनी तयारी दर्शवली असून, त्यांचं खरेदी खतही तयार करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातून हा मार्ग जाणार असून, आत्तापर्यंत २४० हेकटर क्षेत्राचं भूसंपादन करण्यात आले असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितलं.

****

No comments: