Thursday, 23 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.11.2017 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 November 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ सकाळी .५० मि.

*******

  • १५ व्या वित्त आयोगाच्या आणि देशातल्या ११५ मागास जिल्ह्यांमध्ये महिला शक्ती केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता
  • कांद्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १२ हजार टन कांदा खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
  • सोयाबीनला पुढच्या महिन्यात चांगला भाव मिळेल असा राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना विश्वास
  • कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींना येत्या २९ नोव्हेंबरला शिक्षा सुनावणार

आणि

  • आगामी काळात मराठवाड्यातले सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांची ग्वाही

****

१५ व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या आयोगाचे सदस्य, आणि इतर रचनेबाबतची अधिसूचना नंतर जारी होईल असं जेटली म्हणाले. देशभरातील कर महसुलाचे स्त्रोत आणि राज्यामध्ये त्याचं फेरवाटप या विषयी हा आयोग शिफारशी करील.

देशातल्या ११५ मागास जिल्ह्यांमधे महिला शक्ती केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग्रामीण भागात महिलांना कौशल्य विकास, रोजगार आणि संगणक साक्षरता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं ही केंद्रं सुरू केली जाणार आहेत. यासाठी ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून देशभरात ९५० केंद्रे सुरू केली जाणार आहेत.

****

कांद्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहावेत आणि बाजारात कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेड आणि लघु कृषी उद्योग परिषदेला १२ हजार टन कांदा खरेदी करण्याचे अधिकार दिले आहेत. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी काल दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. देशाबाहेर जाणारा कांदा रोखण्याकरता कांद्याचं किमान निर्यात मूल्य निश्चित करायला वाणिज्य मंत्रालयाला सांगितलं असल्याचंही पासवान म्हणाले.

****

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला वेळ लागत असला तरी, पात्र शेतकऱ्यांना लाभ नक्की मिळेल, असं आश्वासन, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी काल दिलं. औरंगाबाद इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळग्रस्त १३ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या अन्न सुरक्षा योजनेचा आढावा घेऊन, ती योजना टप्प्या-टप्प्यानं बंद करण्याचे संकेतही बापट यांनी यावेळी दिले.

****

सोयाबीनला पुढच्या महिन्यात चांगला भाव मिळेल असा विश्वास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं मराठवाडा जनता विकास परिषदेच्यावतीनं आयोजित कार्यक्रमात कृषी मूल्य आयोग आणि शेतकरी या विषयावर ते काल बोलत होते. सोयाबीनच्या पेंडीची किंमत वाढल्यामुळे हमीभाव वाढत असून जानेवारीपर्यंत ३२०० रूपयांपर्यंत भाव वाढेल असं ते म्हणाले.

****

मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पुणे, सातारा, मालेगाव तसंच रिसोड परिसराला काल दुपारी मुसळधार पावसानं झोड़पून काढलं.

मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच तालुक्यात काल जोरदार अवकाळी पाऊस पडला. देवणी तालुक्यातल्या कवठाळा गावात पावसासह तुरळक गारा पडल्या तर सय्यदपूर इथं वीज पडून एकाचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातल्या अनेक भागात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला.

औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं वेचणीला आलेला कापूस ओला झाला असून मळणीसाठी ठेवलेला मका तसंच सोयाबीनच्या गंजीत पाणी शिरून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

उस्मानाबाद शहर आणि परिसरातही काल सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस झाला.

दरम्यान, येत्या चोवीस तासात राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींना येत्या २९ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दोषींनी अमानुष कृत्य केलेलं असल्यानं त्यांना फाशीची शिक्षाच योग्य राहील, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काल न्यायालयात केला. त्यापूर्वी काल दोषी संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी युक्तिवाद करताना, भवाळ विरोधात ठोस पुरावा नाही त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्याची मागणी केली.

****

आगामी काळात मराठवाड्यातले सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील, यामुळे रस्त्याचं पूर्ण चित्र बदलणार असल्याची ग्वाही राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथल्या कै.वसंतराव नाईक सांस्कृतीक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. मराठवाडा सुजलाम सुफलाम करणं हे आमचं काम असून, ते योग्य रितीने पार पडेल असं आश्वासन देत स्वच्छतेच्या कार्यात नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही मुंडे यांनी यावेळी केलं.

****

हिंगोली तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून रोहित्राची मागणी पूर्ण न झाल्यामुळं शेतकऱ्यांनी काल हिंगोली इथल्या महावितरण कार्यालयातल्या अधिक्षक अभियंत्याला घेराव घातला. संतप्त शेतकऱ्यांनी तीन महिन्यांपासून गावं अंधारात असून शेतीचा विद्युत पुरवठा खंडित आहे याबाबत जाब विचारला. शेतकऱ्यांच्या आक्रमक जमावामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

****

राज्यातल्या ३२ हजार किलोमीटरवरच्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचे काम, येत्या १५ डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचं बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. बीड इथं रस्ते विकास महामंडळाच्या कामाचा आढावा घेतांना ते काल बोलत होते. पाऊस लांबल्यामुळं रस्त्यावरचे खड्डे भरण्यास उशीर झाला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

नांदेड इथल्या आढावा बैठकीत बोलतांना पाटील यांनी विभागातले रस्ते, पुल, आणि  इमारतींची कामं विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

****

इंटरनेटमुळे अनेक विषयांची माहिती सहज मिळत असली तरी, सर्वांनी पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण करणं गरजेचं आहे, असं मत नांदेडचे आमदार हेमंत पाटील न्यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नांदेड ग्रंथोत्सव-२०१७चं उद्घाट, करताना बोलत होते. या ग्रंथोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

 गोव्यात सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव  - इफ्फी-२०१७ मध्ये काल इंडियन पॅनोरमा अंतर्गत पिंपळहा मराठी चित्रपट दाखवण्यात आला. इफ्फीत हा चित्रपट दाखवण्यात आल्याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी आनंद व्यक्त केला. महोत्सव आणि चित्रपटाबद्दल ते म्हणाले -

 इफ्फीत, इंडियन पॅनोरमा मध्ये मी माझी फिल्म घेउन आलोय पिंपळ, मला तुम्हा सर्वांना सांगायला खुप आनंद होईल की हि माझी सातव्यांदा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया पॅनोरमा मध्ये निवड झालेली आहे. पिंपळ हा आपल्या रुटस् बद्दल बोलणारा सिनेमा आहे. प्रत्येकाच्या घरात घडू शकणारी गोष्ट, तुमची माझी गोष्ट आहे ही पिंपळ ची. थँक यु व्हेरी मच !

****

नांदेड - लिंबगाव - चुडावा - पूर्णा दरम्यान घेण्यात येणारा आठ दिवसांचा लाईन ब्लॉक काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व गाड्या निर्धारित वेळेत धावतील, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन तलाठ्यांना काल लाच घेताना अटक करण्यात आली. पैठण तालुक्यातल्या ढाकेफळ इथला तलाठी, गणेश बहुरे आणि त्याला सहाय्य करणारा, त्याचा चालक प्रवीण शिल्लेदार यांना १८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. शेतकरी अणि त्याची पत्नी यांच्या नावानं वाटणीपत्र तयार करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

गंगापूर तालुक्यातल्या सिंदी सिरजगाव इथला तलाठी, संजय काळे याला सात बारा उताऱ्यात फेरफार नोंद घेण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी, अटक करण्यात आली.

*******

No comments: