Regional Marathi Text Bulletin,Aurangabad
Date-25 November 2017
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
बालकांमधील खुरटेपणा, कुपोषण, जन्मावेळी
असलेले कमी वजन आणि अशक्तपणा यासांरख्या समस्यांवर मात करण्यासाठी निश्चित असा कार्यक्रम
आखून त्यावर काम करणे आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते
कुपोषण आणि संबंधित समस्यांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली इथं बोलावलेल्या बैठकीत
ते बोलत होते. पोषणाशी संबंधित असलेल्या राज्यांच्या आणि केंद्राच्या सर्व योजना एकत्रित
करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
लोकशाही शासनव्यवस्थेमध्ये नागरिकांना
धमक्या देणं आणि त्यांना शारीरिक ईजा पोहचवण्यासाठी बक्षिसांची घोषणा करणे स्वीकारार्ह
नसल्याचं, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत एका
कार्यक्रमात बोलत होते. मात्र, कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल असा
इशारा त्यांनी यावेळी दिला. काही चित्रपटांच्या बाबतीत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
करत निदर्शनं होत आहेत. मात्र, काही लोक निदर्शनं करताना मर्यादा बाळगत नसल्याचं ते
म्हणाले. चित्रपटाला धर्मासोबत जोडणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
सहकारी संघटनेला प्रोत्साहन देण्यासाठी
केंद्र सरकारनं अलिकडच्या काळात काही पावलं उचलली असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ
सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज आंतरराज्य परिषदेच्या स्थायी समितीच्या बाराव्या
बैठकीत ते बोलत होते. काही समस्यांवर एकमतानं विचारविनिमय होत असल्याबद्दल त्यांनी
समाधान व्यक्त केलं. केंद्राकडून राज्यांना मिळणारा निधी, वस्तू आणि सेवा कर, स्थानिक
स्वराज्य संस्थांना कार्याचं हस्तांतरण, जिल्हा नियोजन, जातीय सलोखा, स्थलांतर आणि
फौजदारी न्याय प्रणाली आदी बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
राज्यातल्या १५ लाख ४२ हजार शेतकऱ्यांच्या
खात्यावर कर्जमाफीचे सहा हजार ५०० कोटी रुपये आजच भरले असल्याची घोषणा, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोल्हापूर इथं एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. यापुढे
१० लाख शेतकऱ्यांची यादी करुन अशाच पध्दतीनं कर्जमाफीचं काम येत्या १० ते १५ दिवसांत
पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी करण्यात
आलेली कर्जमाफी ‘आधार कार्ड’च्या माध्यमातून पारदर्शीपणे करण्यावर भर दिला असल्याचंही
ते म्हणाले.
दरम्यान, सांगली इथं पद्मभूषण क्रांतीवीर
डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यामधला इथेनॉल प्रकल्प
आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
****
शैक्षणिक
स्पर्धेला तोंड देण्यासाठी शिक्षण विभागातर्फे राज्यात लवकरच १०० आंतरराष्ट्रीय शाळा
सुरू करण्यात येणार असून, पुढच्या वर्षी नंदूरबार इथं पहिली शाळा सुरू करण्यात येईल,
अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. नाशिक इथं आज शताब्दी वर्ष
पूर्ण करणाऱ्या शिक्षण संस्थांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते
बोलत होते. सरकार राज्यातल्या मोठ्या शिक्षण संस्थांना माध्यमिक शालांत परीक्षांसाठी
स्वायत्तता देण्याचा विचार करत असल्याचं ते म्हणाले. शिक्षकांच्या पदांसाठी मध्यवर्ती भरती प्रक्रिया राबवताना शिक्षण संस्थांना
देखील मुलाखत घेण्याचे माफक अधिकार देण्यात येतील असं सांगून तावडे यांनी, शिक्षकांवरील
अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून उद्या देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा
३८वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण
विभागानं बालरक्षकांच्या माध्यामातून साडेतीन हजार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात
आणण्यासाठी केलेलं कार्य, इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी असल्याचं प्रतिपादन राज्याच्या
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केलं आहे. जालना आज इथं जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित बालरक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सहविचार सभेत ते बोलत होते.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ई लर्निंग
शिक्षण पद्धतीवर भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना
दिल्या. दरम्यान, दोन दिवासांच्या जालना दौऱ्यावर असलेले नंदकुमार यांनी आज सकाळी जालना
- सिंदखेडराजा मार्गावर रस्ते कामासाठी स्थलांतरित झालेल्या जळगाव इथल्या मजूर कुटुंबांची
भेट घेऊन संवाद साधला.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान नागपूर
इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या
मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या शतकी खेळीच्या बळावर दोन बाद २६२ धावा झाल्या.
विजयनं १२८ धावा केल्या. पुजारा १२१ आणि विराट कोहली ५४ धावांवर खेळत आहेत. भारत १०७
धावांनी आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment