Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
*******
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठानं राज्याचे पशूसंवर्धन आणि दुग्धोत्पादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी
रद्दबातल ठरवली आहे. खोतकर यांनी जालना मतदार संघातून २०१४ साली विधानसभेची निवडणूक
लढवली होती. मात्र त्यांनी या निवडणुकीसाठीचं नामनिर्देशन पत्र वेळ उलटून गेल्यानंतर
दाखल केल्याची तक्रार, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी एका याचिकेद्वारे खंडपीठात
केली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान, न्यायालयानं खोतकर यांची आमदार
पदी झालेली निवडणूक रद्द करण्याचे निर्देश दिले. या निवडणुकीत खोतकर अवघ्या २९६ मतांनी
विजयी झाले होते.
****
संसदेचं हिवाळी
अधिवेशन १५ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी आज
नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. हे अधिवेशन पाच जानेवारी पर्यंत चालणार असून, २५ आणि
२६ डिसेंबर रोजी नाताळ निमित्त अधिवेशनाला सुट्टी राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे संसदेचं अधिवेशन उशीरा घेण्यात येत असल्याचं कुमार यांनी
सांगितलं.
****
फसवणूक आणि अनैतिक पद्धतीनं काम करणाऱ्या रुग्णालयांवर धडक कारवाई करण्यासाठी
राज्य सरकारांनी वैद्यकीय आस्थापना कायद्याची अंमलबजावणी करावी असं केंद्र सरकारनं
म्हटलं आहे. गुरुग्राम इथल्या फोर्टीस रुग्णालयानं वैद्यकीय उपचारांसाठी अवाजवी
रक्कम उकळल्याच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या खाजगी रुग्णालयांना नोटीस बजावून
त्यांच्यावर कारवाई करावी असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात
केंद्रीय आरोग्य सचिव प्रिती सुदान यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या
पत्रात, रुग्णालयांतली गैरकृत्यं आणि
उपचारांसाठीच्या अवाजवी खर्चासंदर्भात वाढलेल्या तक्रारींकडे लक्ष वेधलं. अशा
घटनांची पुनरावृत्ती टाळायला हवी तसंच वाजवी दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून
द्यायला हव्यात असं सुदान यांनी म्हटलं आहे.
****
वनेतर क्षेत्रात बांबूच्या लागवडीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं भारतीय
वन विधेयक २०१७ सुधारणा अध्यादेश जारी केला आहे. या सुधारणा अध्यादेशानुसार वनेतर
क्षेत्रात लागवड केलेल्या बांबूला वृक्ष या संज्ञेतून वगळण्यात आलं आहे. यामुळे व्यावसायिक हेतूनं बांबूची
वाहतूक करण्यासाठी आता ‘ट्रान्झिट पास’ ची गरज भासणार नाही. भारतीय वन कायदा १९२७ नुसार
बांबूचा समावेश वनोपज लाकूड या गटात करण्यात आला होता. या तरतुदीमुळे वनेतर क्षेत्रात
बांबूची लागवड करतांना शेतकऱ्यांना बंधनांना सामोरं जावं लागत होतं.
****
उत्तर प्रदेशातल्या चित्रकूट जिल्ह्यात माणिकपूर रेल्वे स्थानकानजीक वास्को द गामा
- पाटणा एक्सप्रेसचे १३ डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू
झाला, तर आठ जण जखमी झाले. दुर्घटनाग्रस्त रेल्वेमधल्या प्रवाशांना विशेष गाडीनं पाटणा
इथं पोहोचवण्याची व्यवस्था केल्याचं उत्तर मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं. रेल्वे विभागानं मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख
रुपये आणि जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
****
गोव्यात पणजी इथं सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सवानं युनेस्कोच्या गांधी पदकासाठी यंदा नऊ चित्रपट नामनिर्देशित केले
आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरचित्रवाणी आणि दृकश्राव्य संवाद परिषदेच्या या प्रतिष्ठित
पुरस्कारासाठी निवडलेल्या या नऊ चित्रपटांमधे
क्षितिज - अ होरायझन, मानुसंगदा, पूर्णा, रेल्वे चिल्ड्रन, आणि टेक ऑफ, या पाच
भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान, या महोत्सवात इंडियन पॅनोरामा विभागात आज
प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू आणि दिपक गावडे दिग्दर्शित इडक हे दोन मराठी चित्रपट
दाखवले जाणार आहेत.
****
जालना शहरातील नवीन जालना आणि जुन्या जालन्याला एकत्र जोडणाऱ्या कुंडलिका नदीवरच्या
लोखंडी पुलाच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात राज्यशासनानं एक कोटी रुपयांचा निधी
मंजूर केला आहे. नगरविकास खात्यामार्फत याबाबतच
पत्र नगरपालिकेला प्राप्त झालं आहे. मागच्या महिन्यात विकास परिषद आणि सिमेंट रस्त्यांच्या
लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना इथं आले असता, सुमारे सव्वाशे वर्ष
जुन्या या ब्रिटिशकालीन पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार
रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकड़े केली होती. लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध
केली जाणार आहे.
****
हाँगकाँग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा
उपान्त्यपूर्व फेरीचा सामना आज जपानच्या अकाने यामागुची विरुद्ध होणार आहे. सायना नेहवाल
आणि एच एस प्रणयचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान नागपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या
आज पहिल्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या २७ षटकात दोन बाद ४७ धावा
झाल्या होत्या. इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला.
*******
No comments:
Post a Comment