Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date-29 November 2017
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
कोपर्डी अत्याचार प्रकरणातल्या तीन
आरोपींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे समाजातल्या अपप्रवृत्तींना जरब बसण्याबरोबरच
न्यायपालिकेवरचा विश्वास वाढला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिली आहे. या शिक्षेमुळे महिलांवरच्या अत्याचारांना पायबंद बसेल, अशी आशा व्यक्त करून
मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणा आणि सरकारी वकिलांचं अभिनंदन केलं आहे.
या निर्णयामुळे पीडीतेला न्याय मिळाला
असून, या कठोर शिक्षेमुळे भविष्यात असे गुन्हे घडू नयेत यासाठी योग्य संदेश गेला आहे,
अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त
केली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा
विजया रहाटकर यांनी याबाबत भावना व्यक्त करताना, कोपर्डीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात
चालवून राज्य सरकारने पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना जलद न्याय मिळवून दिला,
असं म्हटलं आहे. ही शिक्षा उच्च न्यायालयामध्येही कायम राहावी, यासाठी राज्य सरकार
पूर्ण प्रयत्न करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे
अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी, हा निकाल न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दृढ करणारा
आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. निर्भया प्रकरणानंतर काँग्रेस सरकारने कायद्यात
सुधारणा केली त्यामुळे कोपर्डी प्रकरणाची सुनावणीही जलद झाली आणि आरोपींना फाशीची शिक्षा
सुनावण्यात आली, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर
येत्या १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्चा काढून अधिवेशनाचं कामकाज
रोखून धरणार आहे. राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार
शरद पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करणार असल्याचं, पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, पक्षानं आज कोल्हापूर इथं हल्लाबोल मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं निवेदन
उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं.
****
जनलोकपालसह शेतकऱ्यांच्या विविध
समस्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे येत्या २३ मार्च रोजी शहीद दिनापासून
नवी दिल्लीत आंदोलन सुरू करणार आहेत. यासंदर्भात अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथं
झालेल्या एका बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न तसंच
निवडणूक सुधारासाठी हे आंदोलन सुरू करत असल्याचं, हजारे यांनी सांगितलं.
****
साडे तीन कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा
केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी काल सात जणांना अटक केली. यामध्ये एका बँकेच्या चार
कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांनी बँकेच्या कर्जप्रक्रियेसंबंधीच्या सॉफ्टवेअरमध्ये
छेडछाड करून, पंचावन्न लोकांना साडेतीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरीत केली, असा
आरोप या बँकेनं दाखल केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. मार्च ते जुलै २०१६ या कालावधीत
हा घोटाळा झाला आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळानं २०१८ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक
आज जाहीर केलं. इयत्ता बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते वीस मार्च दरम्यान तर
इयत्ता दहावीची परीक्षा एक मार्च ते चोवीस मार्च या कालावधीत होणार आहे. हे वेळापत्रक
मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
नवबौद्ध तसंच अनुसूचित जातींच्या
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासनाच्या ‘स्वाधार’ योजनेसाठी अर्ज करण्याची
मुदत येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना भोजन, निवास
आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून ही योजना चालवली जाते.
****
जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर
उद्या परभणीमध्ये जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. परभणीच्या जिल्हा रुग्णालयाच्या
वतीनं आयोजित या फेरीला उद्या सकाळी नऊ वाजता जिल्हा रुग्णालयापासून सुरुवात होईल.
या फेरीत नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन परभणीच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी
केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी
उसाचा पहिला हप्ता पुढच्या आठ दिवसांत न दिल्यास कारखाने बंद पाडू असा इशारा स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. उसाला रास्त आणि किफायतशीर भाव
अधिक ४०० रुपये दर द्यावा, अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे. ते काल एका सभेत बोलत
होते. उसाचा साखर उतारा कमी दाखवूनही कारखानदार उताऱ्याची चोरी करत आहेत. यापुढील काळात
साखर कारखानदारांची संपत्ती जाहीर करावी, अन्यथा आयकर विभागाच्या कार्यालयांवर मोर्चा
काढण्याचा इशाराही खासदार शेट्टी यांनी दिला.
****
No comments:
Post a Comment