Monday, 27 November 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 27.11.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin,Aurangabad

Date-27 November 2017

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

*****

विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी, तर विरोधी पक्षांचे उमेदवार दिलीप माने यांनी आज मुंबईत विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माने हे सोलापूरचे माजी आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी येत्या सात डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

****

संविधान दिन काल साजरा झाला. उद्योग मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. काल शासकीय सुट्टी असल्यानं आज हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. जालना जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं.

दरम्यान, सरकारनं संविधान दिवस २६ नोव्हेंबर २०१७ ऐवजी २७ नोव्हेंबर २०१७ रोजी साजरा करण्याचा आदेश काढल्याच्या निषेधार्थ नांदेड इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांना सादर केलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असं हमीभाव धोरण जाहीर करावं, कापसाला पाचशे रुपये प्रति क्विंटल बोनस द्यावा, आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात भोकरदन इथल्या उपविभागीय कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

येत्या दोन वर्षात राज्यात ४० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण होतील, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. खड्डेमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण ३४ जिल्ह्यांचा दौरा करणार असून, उत्कृष्ट काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

समृद्ध जीवन मधल्या गुंतवणुकदारांनी आज दुपारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. जिल्ह्यातल्या गुंतवणुकदारांचे सुमारे २०० कोटी रुपये यात अडकले असल्यामुळे समृद्ध जीवनच्या संचालकांची मालमत्ता विकून गुंतवणुकदारांना त्यांची रक्कम परत द्यावी, अशी मागणी गुंतवणूकदारांकडून करण्यात आली आहे. 

****

जालना नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं संयुक्त मोहीम राबवत आज शहरातल्या धार्मिक स्थळांचं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. शहरातल्या १०९ ठिकाणचं अतिक्रमण या मोहिमेत हटवण्यात येणार आहे.

****

देशभरातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजयी झालेल्या दोन लाख महिला प्रतिनिधींची क्षमता आणि कौशल्य वाढवण्यासाठी केंद्र सरकार त्यांना प्रशिक्षण देणार आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी आज नवी दिल्ली इथं स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या महिलांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ही माहिती दिली. या महिला प्रतिनिधींना कायदेशीर बाबी, कर्ज, रस्ते आणि नाल्यांची निर्मिती, सामाजिक विकास, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रात प्रशिक्षण देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी तसंच आगामी एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. कसोटीसाठीच्या संघात बदल नसला, तरी एकदिवसीय मालिकेसाठी मात्र विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करेल.

श्रीलंकेविरुद्धची एक दिवसीय मालिका दहा डिसेंबरपासून तर तिसरी कसोटी दोन डिसेंबरपासून सुरू होणार आहे. आज संपलेली नागपूर कसोटी एक डाव आणि २३९ धावांनी जिंकून भारत कसोटी मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे. सामनावीर ठरलेला कर्णधार विराट कोहलीचं पाचवं द्विशतक आणि रविचंद्रन अश्विनचे ५४ व्या कसोटी सामन्यात तीनशे बळी, हे या कसोटी सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं.

****

दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड पूर्णा दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्ती कामासाठी उद्या २८ तारखेपासून येत्या सहा डिसेंबरपर्यंत दररोज अडीच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजून ५० मिनिटांपासून दुपारी दोन वाजून वीस मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल, यामुळे नांदेड औरंगाबाद गाडी येत्या एक डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे, तर काचीगुडा मनमाड एक्सप्रेससह काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. ३० नोव्हेंबर आणि चार डिसेंबर रोजी मात्र सर्व गाड्या नियमित धावतील.

****

No comments: