Wednesday, 22 November 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.11.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 November 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असणारं सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसची आज भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एम के आय या जेट विमानावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली. सुमारे अडीच टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात चाचणी घेण्यात आली. आजवर उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या माध्यमांतून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, भारतानं पहिल्यांदाच जेट विमानाचा अशा प्रक्षेपण वाहनासारखा वापर करुन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणारं हे क्षेपणास्त्र दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करण्याबरोबरच जमिनीखालील बंकर्सही उद्धस्त करु शकतं. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी या यशाबद्दल संरक्षण संशोधन विकास संस्था - डीआरडीओ आणि ब्राम्होसच्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

****

बाजारात मध्यम किंमतीवर कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेड आणि लघु शेती व्यवसाय संस्था - एस एफ ए सी ला १२ हजार टन कांद्याची खरेदी करण्याची अधिकृत मान्यता दिली आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. नाफेड दहा टन आणि एस एफ ए सी दोन टन कांदा खरेदी करेल, तसंच कांदा बाहेरच्या देशातून आयात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.     

****

गोव्यात सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ मध्ये आज ‘खिडकी’ हा मराठी चित्रपट, ईंडियन पॅनोरामा अंतर्गत ‘माहितीपट’ या विभागात दाखवण्यात आला. महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आल्याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन कानवडे यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले -

नमस्कार. माझी फिल्म खिडकी या वर्षी इंडियन पॅनोरमात आहे. ही नॉन फिचर फिल्म सेक्शनमध्ये सलेक्ट झालेली आहे. आणि इफ्फी पॅनोरमामध्ये सलेक्ट होणं म्हणजेच एक मोठी गोष्ट आहे. ज्याच्यासाठी मी गेले काही वर्ष मी ट्राय करत होतो.आणि फायनली आता हे झालंय त्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. आणि याच्यासाठी मी खूष आहे की ज्यांनी मला मदत केलीय आणि ज्यांच्यामुळे ही फिल्म कंप्लीट झाली. आणि इथपर्यंत आली. त्यामुळे मी या सगळ्यांचे आभार मानतो.

****

गुजरातमधल्या पाटीदार सामाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेस पक्षानं पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचं मान्य केलं असल्याचं हार्दिक पटेल यांनी आज अहमदाबाद इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींना येत्या २९ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दोषींनी अमानुष कृत्य केलेलं असल्यानं त्यांना फाशीची शिक्षाच योग्य राहील, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज न्यायालयात केला. त्यापूर्वी आज दोषी संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी युक्तिवाद करताना, भवाळ विरोधात ठोस पुरावा नाही त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्याची मागणी केली.

****

जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या आष्टी इथं राष्ट्रीय रुरबन अभियानाअंतर्गत कृषी माल उद्योग प्रक्रिया समूह वसाहत उभारणार असल्याचं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं. जालना इथं आज श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या योजनेअंतर्गत आष्टीसह जिल्ह्यातल्या १६ गावांच्या विकासासाठी १८५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, या माध्यमातून गावांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यात येत असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.      

****

हाँगकाँग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत. मात्र पुरुष एकेरीत पी कश्यप आणि सौरभ वर्माचा पहिल्या फेरीत पराभव झाला. सायनानं आज झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या मेटे पॉल्सनचा २१-१९, २३-२१ असा पराभव केला, तर सिंधूनं हाँगकाँगच्या लियुंग युएटचा २१-१८, २१-१० असा पराभव केला. महिला दुहेरीतही अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी या जोडीचाही पहिल्या फेरीत पराभव झाला.

****

नांदेड विभागातल्या प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड ते तिरुपती विशेष रेल्वे गाडीच्या २६ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी नांदेडहून दर मंगळवारी संध्याकाळी पावणे सातला निघते, तर तिरुपतीहून दर बुधवारी दुपारी पावणे चारला निघते. फेब्रुवारीपर्यंत या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नांदेड - लिंबगाव - चुडावा - पूर्णा दरम्यान घेण्यात येणारा आठ दिवसांचा ब्लॉक काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व गाड्या निर्धारित वेळेत धावतील, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...