Sunday, 26 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.11.2017 05.25PM

Regional Marathi Text Bulletin,Aurangabad
Date-26 November 2017
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
*******
दहशतवादाविरूद्धच्या लढाईत सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक असून प्रत्येक नागरिकानं जागरूक राहून सुरक्षादलांसाठी डोळे आणि कान बनून काम केलं, तर देशाच्या सुरक्षेला कधीच धोका पोहचणार नाही, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 26/11 हल्ल्यातल्या  हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी आज मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या हल्ल्यामुळे लक्षात आलेल्या, सुरक्षा यंत्रणांमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासनानं परिणामकारक उपाय केले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
दिल्लीत प्रगती मैदानात सुरु असलेल्या सदोतिसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात, महाराष्ट्राच्या “स्टार्टअप आणि स्टँडअप महाराष्ट्र” या दालनाला सर्वोत्कृष्ट सजावट आणि सादरीकरणाचा पुरस्कार घोषित झाला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी.आर.चौधरी यांच्या हस्ते उद्या हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीनं राज्यातल्या उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचं दर्शन घडवणारं हे दालन साकारण्यात आलं आहे.
****
अहमदनगर इथल्या नितीन आगे हत्या प्रकरणी पुन्हा तपास केला जाईल आणि याआधीच्या तपासात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात सरकार कडक कारवाई करेल, असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज म्हटलं आहे. या प्रकरणातल्या आरोपीची न्यायालयानं मुक्तता केल्यानंतर बडोले यांनी ही माहिती दिली. अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा गावच्या नितीन आगे या दहाव्या इयत्तेतल्या विद्यार्थ्याची गेल्या २९ एप्रिलला हत्या करण्यात आली होती.
****
राज्यातल्या वैद्यकीय पर्यटनासंदर्भात एक वेबसाईट सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. येत्या महिन्याभरात सुरू होणार असलेल्या या संकेतस्थळावर, राज्यात उपलब्ध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि त्यासाठी येणारा खर्च, तसंच परदेशी रुग्णांना आवश्यक असलेली व्हिसा आणि इतर कागदपत्रांबद्दलची माहिती देण्यात येणार आहे.
****
जालना जिल्ह्यात सुमारे अडीच लाख हेक्टरवरचं कपाशी पीक बोंड अळीमुळे बाधित झालं आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घनसावंगी, परतूर आणि मंठा तालुक्यात बोंडअळीने प्रभावित झालेल्या क्षेत्राची पहाणी केली असता, कपाशी बोंडाच्या २० पैकी २० नमुन्यामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियमांतर्गत बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यासह बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांकडून फॉर्म ‘जी’ नमुन्यात तक्रार अर्ज भरून घ्यावेत. तसंच कृषी विभागाच्या समित्यांनी बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून कृषी आयुक्तालयाला अहवाल  पाठवावा, अशा सूचना लोणीकर यांनी केल्या.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्या परिषदेच्या निवडणुकीसाठी परवा झालेल्या मतदानाची आज मतमोजणी सुरू आहे. अधिसभेवर सध्या उत्कर्ष पॅनलचे दहा उमेदवार निवडून आले असून, यामध्ये व्यवस्थापन गटातल्या चार तर प्राचार्य गटातल्या सहा उमेदवारांचा समावेश आहे. प्राचार्य गटातून विद्यापीठ विकास मंचचे चार तर व्यवस्थापन गटातून दोन अपक्ष उमेदवारही अधिसभेवर निवडून आले आहेत. मतमोजणी अद्याप सुरू आहे.
****
जालना इथं संविधान दिनानिमित्त संविधान गौरव महारॅली काढण्यात आली. नूतन वसाहत भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून संविधान चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी वर्णी महापूजेनं महोत्सवाला प्रारंभ झाला, येत्या तीन डिसेंबरला होम हवन आणि महापूजेनं महोत्सवाची सांगता होईल. त्याच दिवशी रात्री देवीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
****
हाँगकाँग खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधुला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात चिनी तैपाईच्या ताइ जू यिंगनं सिंधूचा २१-१८, २१-१८ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.
****
कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक तसंच रोहित शर्मा, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं नागपूर कसोटीत तिसऱ्या दिवशी सहा बाद ६१० धावांवर डाव घोषीत केला. चेतेश्वर पुजारा १४३ तर विराट कोहली २१३ धावांवर बाद झाले. रोहित शर्मा १०२ धावांवर नाबाद राहिला. आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेच्या एक बाद एकवीस धावा झाल्या होत्या. सामन्यात भारत ३८४ धावांनी आघाडीवर आहे.
*******


No comments: