Tuesday, 28 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.11.2017 06.50AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
ठळक बातम्या
****
** सामजिक योजनांच्या लाभासाठी आधार क्रमांक संलग्न करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार
** विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रसाद लाड, तर विरोधी पक्षांकडून दिलीप माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल
** औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा दूध खरेदी दरात प्रति लिटरमागे एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय
** गोव्यातल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप;
आणि
** नागपूर क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेवर एक डाव आणि २३९ धावांनी विजय
****
सविस्तर बातम्या
****
सामजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक संलग्न करण्यासंबधीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यासंबंधी केंद्र सरकार विचार करत असल्याचं, सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. सध्या ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. त्याचबरोबर भ्रमणध्वनी क्रमांक आधारला जोडण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत आहे. आधार योजनेला अंतरिम स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती याचिकेत याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यावर अशी स्थगिती द्यावी की नाही, हे घटनापीठच निश्चित करेल, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
****
विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी, तर विरोधी पक्षांचे उमेदवार दिलीप माने यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. माने हे सोलापूरचे माजी आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी येत्या सात डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
****
गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -इफ्फीचा आज समारोप होत आहे. यावेळी जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना हिंदी सिनेसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल जीवनगौरव आणि पर्सनलिटी ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्यापरिषद निवडणुकीत, आमदार सतीश चव्हाण यांच्या विद्यापीठ उत्कर्ष पॅनलनं ३७ पैकी २७ जागांवर विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं तर विद्यापीठ विकास मंचला सात जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत ३ अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत. मतमोजणीमधल्या आक्षेपांमुळे पाच जागांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
****
औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं दूध खरेदी दरात प्रति लिटरमागे एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या संचालक मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं संघाचे आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता २२ रुपये प्रतिलीटर असा दर मिळणार आहे. येत्या १ डिसेंबर पासून या नवीन दरानं दूध खरेदी सुरु होईल आणि वाढीव दराचा कोणताही बोजा ग्राहकावर पडणार नाही असं त्यांनी सांगितलं .
****
दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड- पूर्णा दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी उद्या २८ तारखेपासून येत्या सहा डिसेंबरपर्यंत दररोज अडीच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजून ५० मिनिटांपासून दुपारी दोन वाजून वीस मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल.
****
राज्यात बिघडत चाललेलं समाजमन आणि त्यातून एकमेकांकडे संशयानं पाहण्याची वाढलेली वृत्ती याबाबत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी खंत व्यक्त केली. बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई इथं आयोजित ३३ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह सोहळ्याच्या समारोप प्रसंगी काल ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवला तसंच त्यांच्या राजकारणात माणुसकीचं दर्शनही होतं, असं ते ते म्हणाले. यावेळी विद्याताई रुद्राक्ष यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, प्राचार्य भगवान देशमुख यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, पंडीत राम बोरगावकर यांना यशवंतराव चव्हाण संगीत पुरस्कार तर प्रताप आवाड यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
*****
सरकारनं संविधान दिवस २६ नोव्हेंबर ऐवजी २७ नोव्हेंबर २०१७ रोजी साजरा करण्याचा आदेश काढल्याच्या निषेधार्थ काल नांदेड इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
दरम्यान, काल विविध ठिकाणी संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. राज्याचे उद्योग मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. जालना तसंच बीड जिल्हाधिकारी कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. औरंगाबाद इथंही जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन काल काल संविधनाच्या उद्दिशेकेचं वाचन करून साजरा करयात आला.
****
औरंगाबाद इथं काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांना दिलं.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात भोकरदन इथल्या उपविभागीय कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
जालना शहरातल्या धार्मिक स्थळांचं अतिक्रमण हटवण्यास काल सुरुवात झाली. शहरातल्या १०९ ठिकाणचं अतिक्रमण या मोहिमेत हटवण्यात येणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात, कापूस पिकावर सेंद्रीय बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे उत्पादनात सुमारे ७० टक्के घट झाल्याचं तालुका कृषी अधिकारी नागोराव अंबुलगेकर यांनी सांगितलं. पालम इथं कापसाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. बोंड अळीच्या नुकसानीबद्दलच्या तक्रारी शेतकऱ्यांनी येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत तालुका कृषी कार्यालयात तक्रार करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
नागपूर इथं खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल भारतानं एक डाव आणि २३९ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत एक – शून्य अशी आघाडी घेतली. भारतानं कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आपला पहिला डाव ६१० धावांवर घोषित केला होता, या आव्हानाचा पाठलाग करताना, श्रीलंकेचा संघ काल १६६ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात पाचवं द्विशतक झळकावणारा कर्णधार विराट कोहली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला, तर कसोटीत आठ बळी घेणारा रविचंद्रन अश्विन ५४ व्या कसोटीत ३०० बळींचा टप्पा पूर्ण करणारा जगभरातला पहिला गोलंदाज ठरला आहे.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी तसंच आगामी एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ काल जाहीर झाला. कसोटीसाठीच्या संघात बदल नसला, तरी एकदिवसीय मालिकेसाठी मात्र कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करेल. तिसरा कसोटी सामना दोन डिसेंबरपासून दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानावर, तर एक दिवसीय मालिका दहा डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
****
प्लास्टीक मुक्त शहर करण्यासाठी हिंगोली नगरपरिषदेनं काल स्वछता अभियान राबवत पहिल्याच दिवशी २ हजार ११० किलो प्लास्टीक जमा केलं. मुख्याधिकारी रामदास पाटील, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या उपस्थितीत जवळपास ४०० जण या मोहिमेत सामिल झाले होते.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा-निलंगा रस्त्यावर लामजाना या गावाजवळ ट्रक आणि कार यांच्यात समोरा समोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. तर,
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातल्या सासमकर आर्ट स्टुडीओत रसायनाचा स्फोट होऊन, एक कामगार ठार झाला, तर या स्टुडीओचे मालक राजेश सासमकर गंभीर जखमी झाले.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष, अशोक एकंबेकर यांचं काल एकंबा इथं तळ्यात पडून निधन झालं. गेल्या१५ वर्षांपासून ते उदगीर इथल्या किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून ही कार्यरत होते.
*****

No comments: