आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२२ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
****
चालू आर्थिक वर्षात वस्तू
आणि सेवा कर - जीएसटी बद्दल विवरण भरण्यासंबंधीच्या
गरजांवर विचार करण्यासाठी सरकारनं वस्तु आणि सेवा कर नेटवर्कचे अध्यक्ष अजय भूषण पांण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली
दहा सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती जीसटीचे नियम,
कायदे आणि कर विवरणाच्या आराखड्यासह विविध बदलांवर उपाय सुचवणार असून
पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत आपला अहवाल देणार आहे.
****
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांच उत्पन्न
दुप्पट करण्याचं सरकारचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मत्स्यपालनाचा व्यवसाय महत्वाची भूमिका बजावणार
असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटल आहे. काल नवी दिल्लीत जागतिक मत्स्यपालन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन
करताना ते बोलत होते. भारत मासळी उत्पादनात दुसऱ्या स्थानावर
आणि झींगा माशांच्या उत्पादनात पहिल्या स्थानावर असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशात दीड कोटी लोक या व्यवसायात असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या केज नगरपंचायतीच्या
आजी आणि माजी नगराध्यक्षांसह सहा जणांविरूद्ध काम न करता सात लाख ३६ हजार रूपयांचा
निधी हडप करून जनतेची आणि शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. यात मुख्याधिकारी आणि अभियंत्यांचाही
समावेश आहे. सिमेंट नाली आणि सिमेंट रस्त्याचं बांधकाम करण्यासाठी
गेल्या २०१५ च्या डिंसेबर महिन्यात झालेल्या बैठकीत सात लाख ८० हजार १११ रूपयांचा निधी
मंजूर करण्यात आला होता, मात्र बांधकाम अभियंता सुभाष रोकडे यांनी
या कामाची खोटी दस्तऐवज जोडून मोजमाप पुस्तिकेत त्याची नोंद केली.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याच कळताच हे सहा जण फरार झाले
असून, केज पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
****
सध्याच्या सोशल मिडियाच्या
युगात ग्रंथ वाचनाविषयी जनजागृती होणं ही काळाची गरज असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक
आसाराम लोमटे यांनी व्यक्त केलं आहे. काल परभणी इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या
दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. ज्ञानानं
समृध्द होण्यासाठी ग्रंथ खूप महत्वाची भूमिका बजावत असतात म्हणून ग्रंथ वाचन ही आजच्या
काळाची गरज असल्याचंही त्यांनी पुढे नमूद केलं.
*******
No comments:
Post a Comment