Tuesday, 28 November 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.11.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date-28 November 2017

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत राज्यात वनशेती उपअभियान राबवायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतीतल्या उत्पादनासह वृक्षलागवड वाढवणं हा या योजनेचा उद्देश आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पिकांचं नुकसान टाळण्यासाठी कृषी पंपांना दिलेल्या बारा तासांच्या थ्री फेज वीजपुरवठ्यापोटी महावितरणला अनुदान देण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबवलेल्या विविध योजनांची दखल सरकारनं घेतली असून, त्यांच्यात निकोप स्पर्धा वाढवण्यासाठी उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. महाराष्ट्र उद्वाहन, सरकते जिने आणि चलित पथ अधिनियम-२०१७ हे नवीन विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याचा, तसंच माहिती-तंत्रज्ञान विषयक खरेदी आता जीईएम पोर्टलमार्फत करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला.

****

विमुद्रीकरणानंतर बँक खात्यात मोठ्या प्रमाणावर रोकड जमा करूनही विवरणपत्र दाखल न केलेल्या एक लाख १६ हजार व्यक्ती आणि कंपन्यांना प्राप्तिकर विभागानं नोटीस पाठवली आहे. ३० दिवसांच्या आत त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रमुख सुशील चंद्रा यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद मेट्रो रेल्वे सेवा देशाला समर्पित केली. मियापूर स्थानकावर पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवून मेट्रो सेवेचा शुभारंभ केला. यानंतर त्यांनी मियापूर ते कुकटपल्ली असा मेट्रोनं प्रवास केला. उद्यापासून मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, राज्यपाल ई एस एल नरसिंहा यावेळी उपस्थित होते.

****

ऊर्जा तज्ज्ञांनी कोणताही पूर्वग्रह न बाळगता भविष्यातलं व्यापक ऊर्जा धोरण तयार करण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. भारतात जागातली एकूण सहा टक्के ऊर्जा वापरली जाते, हे प्रमाण पुढच्या पधंरा ते वीस वर्षात २५ टक्के होऊ शकतं, असं ते म्हणाले. ऊर्जा धोरण तयार करण्याची प्रक्रिया गतिमान व्हायला पाहिजे, असं ते म्हणाले.

****

पोलिस कारवाईत जप्त केलेल्या तब्बल १० लाख ३६ हजार रुपये किंमतीच्या गुटखा आणि पानमसाल्याची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी धुळे जिल्ह्यातल्या चाळीसगाव पोलिस स्थानकातला सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र शिरसाठ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरीष्ठांना याची माहिती मिळू नये म्हणून शिरसाठ यानं अन्न आणि औषध विभागाकडून आलेलं पत्र देखील परस्पर घेतलं असल्याचं उघडकीस आलं आहे.

****

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात एका जीनिंगला आग लागून मोठं नुकसान झालं. आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही आग लागली. अग्निशामक दलाचे सहा बंब, आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. या आगीत कापसाच्या चार हजार गाठी खाक झाल्या असून, अंदाजे २० कोटी रूपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज़ व्यक्त केला जात आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

****

सरसकट शेतकरी कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यात वसमत तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.

****

कृषी उत्पन्न वाढीसाठी गृह विज्ञान तज्ज्ञांना अधिक वेगानं काम करावं लागेलं, असं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक डॉ. व्ही. पी. चहल यांनी म्हटलं आहे. जालना इथल्या खरपुडी कृषी विज्ञान केंद्रात आयोजित, तीन दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन सत्रात ते बोलत होते. नीति आयोगाद्वारे देशभरातल्या कृषी विज्ञान केंद्रांचं मूल्यमापन केलं जात असून, खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचं काम उत्तम असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं.

****

दमणहून जालना इथं अवैधरीत्या विक्रीसाठी येणारी पाच लाख १६ हजार रुपये किंमतीची बनावट दारू, जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज जालना-औरंगाबाद मार्गावर जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी दोन चारचाकी गाड्यांसह दमण आणि गुजरात इथल्या दोघांना ताब्यात घेतलं आहे.

****

महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथं महापौर शिला भवरे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण समितीच्या वतीनं आज औरंगाबाद इथं परिसंवाद घेण्यात आला. युवकांचे भवितव्य या विषयावर आयोजित या परिसंवादात अनेक तरुण तरुणींनी आपले विचार मांडले.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...