Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 21 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१
नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
*******
- मराठवाड्यातल्या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची कामं कालबद्ध पद्धतीनं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
- देशातल्या १८० शेतकरी संघटनांचा राजधानी दिल्लीत मोर्चा.
- ४८ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाला पणजीत शानदार प्रारंभ .
- पुणे जिल्ह्यात क्रेनची वायर तुटून झालेल्या अपघातात ८ कामगारांचा मृत्यु.
आणि
- भारत - श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित.
****
मराठवाड्याच्या विकासासंदर्भात
औरंगाबाद इथं गेल्या
वर्षी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांच्या
स्थितीचा आणि प्रगतीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत आढावा घेतला.
मराठवाड्यातले
रखडलेले अनेक सिंचन प्रकल्प गतिमान झाले असून उर्वरीत कामं कालबद्ध पद्धतीनं पूर्ण
करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी जलसंपदा विभागाला
दिले. मंत्रीमंडळ
बैठकीतल्या निर्णयानुसार निम्न दुधना तसंच नांदूर मधमेश्वर प्रकल्पास सुधारीत
प्रशासकीय मान्यता देऊन गेल्या वर्षभरात या प्रकल्पांवर जवळपास ६८६ कोटी रुपये
खर्च करण्यात आले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद आणि
परभणी इथं नवीन कौटुंबीक न्यायालयं लवकरच सुरु होणार आहेत. औरंगाबाद इथल्या गोपीनाथ
मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेला तीन कोटी रूपयांचा निधीही लवकरच देण्यात येईल,
असं ते म्हणाले. मराठवाडा वॉटर ग्रीड
योजना, जालना रेशीमकोष बाजारपेठ, औरंगाबाद इथलं जलसंधारण आयुक्तालय
आदी विविध कामांचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
****
देशातल्या सुमारे १८० शेतकरी संघटनांनी
काल राजधानी दिल्लीत मोर्चा काढला. विविध राज्यातले शेतकरी नेते मोर्चात सहभागी झाले
होते. अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीनं संसद भवनासमोर शेतकरी मुक्ति संसद आयोजित
केली होती. शेतकऱ्यांच्या कर्जाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक स्वतंत्र प्रणाली
तयार करावी, शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा आणि एकूण लागवडीच्या किमान ५० टक्के लाभ
शेतकऱ्यांना मिळावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
४८व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव-इफ्फीला
काल गोव्यात पणजी इथं शानदार प्रारंभ झाला. सिनेअभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते महोत्सवाचं
उद्घाटन करण्यात आलं. माहिती आणि प्रसारण
मंत्री स्मृती इराणी, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह चित्रपट क्षेत्रातले
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना इराणी यांनी भारत समारंभ, उत्सव
तसंच युवा ऊर्जेचा देश असून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या ऊर्जेचं प्रतिनिधीत्व
करत असल्याचं सांगितलं. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ८० देशांचे जवळपास २०० चित्रपट
दाखवण्यात येणार आहेत.
****
पद्मावती या हिंदी चित्रपटामधले काही कथित वादग्रस्त दृश्य
काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. केंद्रीय
चित्रपट प्रमाणिकरण मंडळानं या चित्रपटाला अद्याप प्रमाणपत्र प्रदान केलेलं नाही. त्याचबरोबर
सर्वोच्च न्यायालय कोणत्याही घटनात्मक संस्थेला तिचं काम थांबवण्याचा आदेश देऊ शकत
नाही, असं न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं आहे. याचिकेतल्या
काही मागण्या फेटाळून लावताना, खंडपीठानं न्यायालयीन सुनावणीचा उद्देश हा समाजात कोणत्याही
प्रकारचं वैमनस्य निर्माण करणं नसल्याचं स्पष्ट केलं.
या चित्रपटात राणी पद्मावतीचं चारीत्र्य हनन केल्याचा
आरोप याचिकाकर्त्यानं केला होता.
****
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या
निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला. चार डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता
येणार आहेत. नवी दिल्ली इथं काल झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर
ही माहिती देण्यात आली. ११ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, १६
डिसेंबरला मतदान तर १९ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
****
ग्रामीण भागाच्या विकासासाठी
आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रीय रुरबन अभियान प्रभावीपणे राबवण्याचे
निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. औरंगाबाद, बीड आणि जालना इथल्या शामाप्रसाद मुखर्जी
रुरबन अभियानासंदर्भात मुंडे यांनी काल मंत्रालयात आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. बीड जिल्ह्यात
या अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.
****
माजी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रियरंजन
दासमुन्शी यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. २००८ साली त्यांना
अर्धांगवायुचा झटका आला होता, तेव्हापासून ते कोमा मध्ये होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद,
पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्री स्मृती इराणी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी
दासमुन्शी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे
बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातल्या तावशी ते डाळज
दरम्यान अकोले गावात, निरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी बोगद्यातून वर
येत असताना क्रेनची वायर तुटून झालेल्या अपघातात ८ कामगारांचा मृत्यु झाला. काल संध्याकाळी
६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
****
तंत्र विद्यानिकेतन-पॉलिटेक्निक तृतीय वर्षाच्या परीक्षेत
व्हॉट्स ॲप द्वारे नकल करण्याचा प्रकार काल औरंगाबादमध्ये उघडकीस आला. स्थापत्य शाखेचा
काँक्रीट तंत्रज्ञानाचा पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात व्हॉट्स ॲप वरुन
तो फुटला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीसांनी कारवाई करत महाविद्यालयाबाहेर मोटारीमध्ये
बसून व्हॉट्सॲपद्वारे उत्तरं पाठवणाऱ्या तीन जणांना अटक केली.
****
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथं ऊसाला पहिली उचल तीन हजार
रुपये देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी एनएसएल शुगर इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना घेराव
घातला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या बिलोलीच्या नगारध्यक्षा मैथिली कुलकर्णी
आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजितकुमार डोके यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या
अपहार प्रकरणी त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांची
बदली करण्यात यावी या आणि अन्य मागण्यांसाठी काल बिलोली इथं सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात
आला. २०१२-१३ मध्ये झालेल्या या अपहारात अन्य ५ जणांचाही समावेश होता.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या कर्जमाफीस पात्र सहा हजार १५५ शेतकऱ्यांना मंजुर
झालेली ५० कोटी रुपये इतकी रक्कम राष्ट्रीयकृत बँकांना प्राप्त झाली आहे. कर्जमाफीस
पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांची अंतिम पडताळणी प्रशासनामार्फत सुरू असून, पडताळणीचं
काम पूर्ण होताच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल, असं जिल्हा
उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काल
शिवसेनेच्या वतीनं कोकणवाडी परिसरात आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावरच्या
खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत, तसंच
परिवहन महामंडळानंही रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जिल्ह्यात अनेक फेऱ्या
रद्द केल्या असल्याचं शिवसेनेनं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यावेळी
जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शिवसेना महानगर प्रमुख
प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर आदींची उपस्थिती होती.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलकाता इथं
झालेला पहिला कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित राहीला. भारतानं श्रीलंकेसमोर सामना जिंकण्यासाठी
२३१ धावाचं लक्ष्य ठेवलं होतं, मात्र निर्धारित वेळेत श्रीलंकेनं २६ षटकं तीन चेंडूत
सात बाद ७५ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारनं चार, मोहम्मद शमीनं दोन, तर उमेश यादवनं
एक गडी बाद केला. तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना येत्या २४ नोव्हेंबरपासून
नागपूर इथं सुरु होणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीयकृत बॅंकानी सौरउर्जेच्या
क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना मुद्रा योजनेचा लाभ द्यावा असं आवाहन लातूरचे खासदार डॉक्टर
सुनील गायकवाड यांनी केलं आहे. राज्य सरकारच्या महाऊर्जा विभागाच्या वतीनं आयोजित सौर
उर्जा साधनं, उपक्रम आणि योजनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचा समारोप खासदार डॉ गायकवाड यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत
होते. ज्या बॅंका कर्ज देण्यास तयार होणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा
इशाराही गायकवाड यांनी दिला.
*******
No comments:
Post a Comment