Monday, 27 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.11.2017 06.50AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
** डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्या परिषदेच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलला १७ तर विद्यापीठ विकास मंचला ४ जागा
** आशियाई मॅरेथॉन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गोपी थोनाकलनला सुवर्णपदक
आणि
** हाँगकाँग खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधुला रौप्यपदक
****
****
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ६८ व्या संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा आणि विधानसभेच्या वेगवेगळ्या निवडणुका घेतल्या की कोट्यवधी रुपये खर्च होतो आणि देशावर त्याचा आर्थिक भार पडतो, त्यामुळे या दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेण्याची चर्चा व्हायला हवी, असं ते म्हणाले.
****
घटना नागरिकांना जितकी सुदृढ बनवते तितकेच नागरिकही घटनेला सदृढ बनवतात, असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे. संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. न्यायपालिकेसमोर खटल्यांचा जलद निकाल लावण्याचं मोठं आव्हान असून न्यायप्रक्रिया सुलभ करण्याचे प्रयत्न केले जावेत, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. संविधान दिनानिमित्त काल मुंबईत संविधान सन्मान दौड आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यावेळी उपस्थित होते. मराठवाड्यातही संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जालना इथं संविधान दिनानिमित्त संविधान गौरव महारॅली काढण्यात आली. औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड इथंही संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
****
भारतीय संविधान हे सर्वसमावेशक आणि समाजाच्या प्रत्येक स्तराच्या हितांचं संरक्षण करणारं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या अडोतिसाव्या भागातून नागरिकांशी संवाद साधत होते. संविधान दिनाच्या शुभेच्छा देतानाच पंतप्रधानांनी, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य एका समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मरण केलं. काल २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्षं पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांचं स्मरण केलं. ४ डिसेंबरच्या नौसेना दिनाच्या शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या. सशस्त्र दल ध्वज दिन तसंच ईद ए मिलाद निमित्त शुभेच्छा देतानाच पंतप्रधानांनी, राष्ट्रीय मृदा दिवस, स्वच्छता तसंच क्रीडा क्षेत्रातलं दिव्यांगांचं योगदान, या विषयांवरही भाष्य केलं. नववर्षाचं सकारात्मकतेनं स्वागत करण्याचं आवाहन करताना, नागरिकांनी आपले किमान पाच प्रेरक अनुभव हॅशटॅग पॉझिटीव्ह इंडिया यासह सामाजिक माध्यमांवर सांगावेत, असंही पंतप्रधान म्हणाले.
****
दहशतवादाविरूद्धच्या लढाईत सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक असून प्रत्येक नागरिकानं जागरूक राहून सुरक्षा दलांसाठी डोळे आणि कान बनून काम केलं, तर देशाच्या सुरक्षेला कधीच धोका पोहचणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी काल मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या हल्ल्यामुळे लक्षात आलेल्या, सुरक्षा यंत्रणांमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासनानं परिणामकारक उपाय केले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
माजी मुख्यमंत्री नारायण राणें यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेस पक्षानं सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माने हे सोलापूरचे माजी आमदार असून ते आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. येत्या ७ डिसेंबर रोजी या जागेसाठी निवडणूक होणार आहे.
****
यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना काल प्रदान करण्यात आला. जेष्ठ संगीतकार उत्तमसिंग यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री विनोद तावडे, आमदार हेमंत टकले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्या परिषदेच्या निवडणुकीत संस्थाचालक, प्राचार्य आणि विद्यापीठ प्राचार्य गटाचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत २४ जागांपैकी उत्कर्ष पॅनलनं १७ जागा, विद्यापीठ विकास मंचनं ४ जागा पटकावल्या तर ३ जागांवर अपक्षानं बाजी मारली. संस्थाचालक गटात कपिल आकात, गोविंद देशमुख, भाऊसाहेब राजळे, संजय निंबाळकर हे उमेदवार विजयी झाले आहेत. प्राचार्य गटात डॉ. भारत खंदारे, डॉ. अली झाकीर अब्बास अली, डॉ.जयसिंग देशमुख, डॉ.कमलाकर कांबळे, डॉ.शिवदास शिरसाठ, डॉ. प्राप्ती देशमुख विजयी झाल्या. प्राध्यापक गटात डॉ. राम चव्हाण, डॉ. सतीश दांडगे, डॉ.स्मिता अवचार निवडून आल्या आहेत.
**प्लॅस्टीक निर्मूलनासाठी आजपासून मराठवाड्यात प्लॅस्टीक वेचा मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहिम प्रबावीपणे राबवण्याचे आदेश विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी काल प्रशासनाला दिले आहेत.
****
बीड इथं काल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पेन्शन परिषद आणि राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या २० व्या द्वैवार्षिक अधिवेशनाचा समारोप झाला. राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणातून मोदी सरकारवर टिका केली. हमाल मापाडींना पेन्शन लागू करण्यासह त्यांच्या इतर मागण्या मान्य होण्यासाठी येत्या जानेवारी पर्यंत मुदत दिली जाईल असं सांगून त्यांनी न्याय हक्काची लढाई जिंकायची असेल तर एकजूट कायम ठेवण्याचं आवाहन केलं. यावेळी एकूण आठ ठराव मांडण्यात आले ते सर्वानुमते पारित झाले.
***
जालना जिल्ह्यात सुमारे अडीच लाख हेक्टरवरचं कपाशी पीक बोंड अळीमुळे बाधित झालं आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घनसावंगी, परतूर आणि मंठा तालुक्यात बोंडअळीने प्रभावित झालेल्या क्षेत्राची पहाणी केली असता, कपाशी बोंडाच्या २० पैकी २० नमुन्यामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. या पार्श्वभूमीवर बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यासह बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांकडून तक्रार अर्ज भरून घ्यावेत. तसंच कृषी विभागाच्या समित्यांनी बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून कृषी आयुक्तालयाला अहवाल पाठवावा, अशा सूचना लोणीकर यांनी केल्या.
****
आशियाई मॅरेथॉन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गोपी थोनाकलनं सुवर्णपदक जिंकलं आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. चीनमधल्या डोंगुआन इथे काल झालेल्या या स्पर्धेत गोपीनं दोन तास पंधरा मिनिटं आणि अट्ठेचाळीस सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत सुवर्णपदक जिंकलं.
****
हाँगकाँग खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधुला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात चिन तैपाईच्या ताई झू यिंगनं सिंधूचा २१-१८, २१-१८ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.
****
कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक तसंच रोहित शर्मा, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं नागपूर कसोटीत तिसऱ्या दिवशी सहा बाद ६१० धावांवर डाव घोषीत केला. चेतेश्वर पुजारा १४३ तर विराट कोहली २१३ धावांवर बाद झाले. रोहित शर्मा १०२ धावांवर नाबाद राहिला. कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेच्या एक बाद एकवीस धावा झाल्या होत्या. सामन्यात भारत ३८४ धावांनी आघाडीवर आहे.
****
जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातल्या काळेगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विना दप्तर शाळा हा उपक्रम काल राबवण्यात आला. याअंतर्गत विद्यार्थ्यांना एका प्रगतीशील शेतकऱ्याच्या शेतात नेण्यात आलं. यावेळी शेतीच्या विविध प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये महिन्याच्या शेवटच्या शनिवारी दप्तराविना शाळा उपक्रम राबवला जातो.
***
खुलताबाद इथल्या जरजरी बक्ष उरूसानिमित्त आज औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाचा बाह्य रूग्ण विभाग बंद राहणार आहे, असं वैद्यकीय अधीक्षकांनी कळवलं आहे.
****

No comments: