Saturday, 25 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.11.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 November 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २५नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

वकिलांनी गरीबांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त आयोजित दोन दिवसीय संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यावेळी उपस्थित होते. न्यायव्यवस्थेत मानवी संसाधनांची श्रेणी सुधारणं ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा होणं आणि देशात न्याय देण्याच्या प्रणालीला मजबूत बनवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचं संरक्षण करणं हे न्यायपालिकेचं मुख्य कर्तव्य असल्याचं सरन्यायाधीश मिश्रा यावेळी म्हणाले.

****

भारत हे एका खुल्या, सुरक्षित, व्यापक, लोकतांत्रिक आणि प्रभावी अशा सायबर स्पेस निर्माणासाठी प्रतिबद्ध असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत सायबर स्पेसबाबत आयोजित एका जागतिक परिषदेच्या निरोप समारंभात बोलत होत्या. भारताचा डिजिटल कार्यक्रम हा पायाभूत सुविधा, सुशासन आणि डिजिटल सशक्तीकरण या तीन बाबींवर आधारित असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

****

भारतानं इजिप्तमधल्या उत्तर सिनाईमध्ये एका मशिदीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्यात २३५ लोकांचा मृत्यू झाला. या दु:खाच्या क्षणी भारत इजिप्तच्या सोबत असल्याचं भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. तसंच या हल्ल्यानं दहशतवादाचा सामना करण्यासाठी जागतिक व्यूहरचनेची गरज असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

वस्तू आणि सेवा कर अर्थात जी एस टीमध्ये १२ आणि १८ टक्के कररचना एकत्र केल्यास भविष्यात कराचे दर कमी होतील, असं मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे. ते काल हैदराबादमध्ये आय सी एफ ए आयच्या उच्च शिक्षण संस्थेमध्ये एका व्याख्यानात बोलते होते. एक जुलैपासून सुरू झालेली जी एस टी व्यवस्था येत्या सहा ते नऊ महिन्यांमध्ये पूर्णपणे स्थीर होईल, असंही ते म्हणाले.

****

कुख्यात दहशतवादी जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईदनं केलेल्या गुन्हेगारी कारवायांसाठी त्याला अटक करून त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं अमेरिकेनं पाकिस्तानला सांगितलं आहे. हाफीज हा २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असून पाकिस्ताननं त्याला नुकतंच नजरकैदेतून मुक्त केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकनं पाकिस्तानकडे ही मागणी केली. हाफीजची नजरकैदेतून मुक्तता हा अमेरिकेसाठी मोठा चिंतेचा विषय असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते हिदर नऊवर्ट यांनी म्हटलं आहे.

****

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड इथं प्रितीसंगमावर चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं. यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणाहून राज्यव्यापी शेतकरी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. 

****

राज्यात दरवर्षी अनेक पंचतारांकित रुग्णालयांमध्ये परदेशातून सुमारे ५० हजार विदेशी रुग्ण उपचारासाठी येतात, त्यामुळे मेडिकल टुरिझम हे सर्व विदेशी रुग्णांना सहज, सोपे आणि किफायतशीर होण्याच्या दृष्टीनं राज्याच्या आरोग्य विभागानं प्रयत्न सुरु केले आहेत. राज्याचा तसंच देशाचा नावलौकिक वाढवण्याच्या दृष्टीनं परदेशातून महाराष्ट्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असं आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी त्यांनी मुंबईत एका बैठकीत सांगितलं. उपचाराच्या नावाखाली कोणत्याही परदेशी रुग्णाची लूट किंवा उपचारामध्ये हेळसांड होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं ते म्हणाले.

****

पोलंड इथं झालेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रितू फोगाटनं रौप्य पदक पटकावलं. महिलांच्या ४८ किलो वजनी गटातल्या अंतिम सामन्यात रितूला तुर्कीच्या कुस्तीपटूकडून पराभव पत्करावा लागला.

****

गुवाहाटी मध्ये सुरु असलेल्या महिला युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत आज भारताच्या तीन मुष्टियोद्धा विविध वजनी गटात आपले उपांत्य फेरीचे सामने खेळणार आहेत. उद्या या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. ४५ ते ४८ किलो वजनी गटात भारताच्या नितुचा सामना चीनच्या युवान नी सोबत, ५८ किलो वजनी गटात साक्षीचा सामना जपानच्या की सेना येरे सोबत, तर ८१ किलो वजनी गटात अनुपमाचा सामना रशियाच्या प्रतिस्पर्धीशी होणार आहे. यापूर्वी काल ज्योती, अंकुशीता बोरो आणि शशी चोपडा यांनी अंतिम फेरीत प्रवेश करून रौप्य पदक निश्चित केलं.

*****

No comments: