Friday, 24 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.11.2017 11.00AM

आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२४ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा रस्त्यावर लोंगे गाव इथं स्लीपर कोच लक्झरी बसनं अचानक पेट घेतला, यामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. आज पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बस मधल्या बाकी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं तीन मजली इमारत कोसळून सात जण जखमी झाले. आज सकाळी ही दुर्घटना घडली. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती असून, बचावकार्य सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारतीय स्टेट बँक फक्त एका ॲप च्या माध्यमातून सगळ्या बँकिंग सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एक व्यापक डिजिटल प्रणाली सुरु करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज नवी दिल्ली इथं या प्रणालीचा शुभारंभ करणार आहेत. यू ओनली नीड वन या नावानं तयार करण्यात आलेल्या या प्रणालीच्या माध्यमातून बँकेच्या सर्व शाखांच्या सेवांची माहिती मिळणार आहे. एसबीआय लाईफ, एसबीआय जनरल, एसबीआय म्यूचुअल फंड, एसबीआय कॅप्स आणि एसबीआय कार्डस् या सेवा एकाच ॲपवर उपलब्ध होणार आहेत. 
****
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदची मुक्तता केल्यानं पाकिस्तानचं खरं रुप पुन्हा एकदा उघड झाल्याचं भारतानं म्हटलं आहे. अनेक निष्पापांचे बळी घेणाऱ्या मुंबईवरच्या २६/११ हल्ल्याचा हाफिज हा प्रमुख सूत्रधारच नव्हे तर त्या पाठीमागची प्रेरणाही होता असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं. हाफिजविषयीची जागतिक जबाबदारी पाकिस्ताननं पार पाडली पाहिजे अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
****
राज्यातले गड, किल्ले स्वच्छतेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. जागतिक वारसा सप्ताह कालावधीत गडकोटांवर स्वच्छता अभियानात सहभागी संस्थांना तावडे यांच्या हस्ते काल मुंबईत सन्मानित करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. आपला प्राचीन वारसा जतन करण्याचं काम केवळ राज्य सरकारचं नसून यामध्ये लोकसहभागही आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी आज मतदान होत आहे. प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, आणि विद्यापरिषद गटासाठी चार जिल्ह्यात १८ मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजता मतदानाला सुरूवात झाली.
*******

No comments: