Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
*******
डिजिटल तंत्रज्ञान एक सक्षम माध्यम म्हणून उदयास आलं असून, त्याची व्यवसाय आणि
अर्थव्यवस्था वाढवण्यास मदत होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली इथं आज
सायबर स्पेसवरील जागतिक परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. डिजिटल
तंत्रज्ञानामध्ये सातत्यानं होत
असलेल्या परिवर्तनामुळे संपूर्ण जगात मोठा बदल झाला असल्याचं ते म्हणाले. कृषी उत्पन्न
वाढवण्यासाठीही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, असंही पंतप्रधानांनी नमूद
केलं. देशातली जनता मोठ्या प्रमाणात रोखरहित व्यवहारांकडे वळली असून, तंत्रज्ञानाचा
हा मोठा उपयोग असल्याचं ते म्हणाले. दिव्यांगांना सायबर स्पेसचा वापर करता यावा
यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, सायबर स्पेस नाविन्यपूर्ण
क्षेत्राचा मुख्य भाग असल्याचं सांगितलं. सायबर स्पेस सुरक्षित ठेवण्यासाठी भारत
कटीबद्ध असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यावेळी
म्हणाले.
****
प्रसार भारती महामंडळाचा आज विसावा वर्धापन दिन आहे. या दोन दशकात आकाशवाणी आणि
दूरदर्शनची अनेक पटीनं प्रगती झाली असल्याचं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी
शशी शेखर वेंपती यांनी म्हटलं आहे. आता आधुनिकीकरण आणि डिजिटल युगासाठी सज्ज होण्यास
प्रसार भारतीनं प्राधान्य दिल्याचं ते म्हणाले.
****
कोणत्याही साहित्याला चित्रपटाच्या रुपात दाखवताना लेखकाच्या मूळ भावनेला जसंच्या
तसं दाखवणं शक्य नसल्याचं कवी, लेखक आणि गीतकार प्रसून जोशी यांनी म्हटलं आहे. गोव्यातल्या
पणजी इथं सुरु असलेल्या ४८व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज आयोजित एका
चर्चासत्रात ते बोलत होते. लेखक स्वत:च्या कल्पनेला शब्दात मांडत असतो, मात्र तीच कल्पना
चित्रपटात साकार करण्यासाठी मूळ भावना कायम राखणं कठीण जात असल्याचं ते म्हणाले.
****
महिलांकरता शहरं सुरक्षित बनवण्याच्या सेफ सिटी या व्यापक योजनेचा आराखडा
निश्चित करण्याच्या प्रक्रियेला केंद्र सरकारनं सुरूवात केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता,
चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरू, लखनौ आणि हैदराबाद या आठ शहरांमधे ही योजना अमलात आणली
जाईल. नवी दिल्ली इथं केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि नागरी प्रशासनानं केलेल्या उपाययोजनांच्या प्रगतीचा व्यापक आढावा घेण्यात
आला.
****
सरकार संसदेचं हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबरपासून घेण्याचा विचार करत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचा दुसरा
टप्पा १४ डिसेंबरला पूर्ण होत आहे, त्यानंतर अधिवेशनास सुरूवात होईल. १५ डिसेंबर
ते ५ जानेवारी या दरम्यान अधिवेशन चालण्याची शक्यता असल्याचं अधिकृत सूत्रांनी
सांगितलं. हिवाळी अधिवेशनाच्या तारखा विधानसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये येऊ नयेत
आणि ते नियमित चालावं, असंच अधिवेशनाचं
वेळापत्रक ठरवलं असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं.
****
भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हाँगकाँग सुपर सिरीज बँडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व
फेरीत पोहोचली आहे. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या आज झालेल्या सामन्यात सिंधूनं
जपानच्या अशा ओहरीचा पराभव केला. तर सायना नेहवालचा दुसऱ्या फेरीतला सामना आज चीनच्या
शेन युफेईशी होणार आहे. पुरुष एकेरीत एच एस प्रणॉय दुसऱ्या फेरीत आज जपानच्या कुझुमसा
ककाईशी लढणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २६ तारखेला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ३८वा
भाग आहे. आकाशवाणी आणि
दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
मुंबईतल्या रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांवर होणारी कारवाई आणि महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेकडून केल्या जाणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ मुंबईतल्या फेरीवाल्यांच्या
संघटना एकवटल्या असून, फेरीवाला एकजूट संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. या संघर्ष
समितीच्या वतीनं येत्या २९ नोव्हेंबरला आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणयात येणार आहे.
आझाद हॉकर्स युनियनचे दयाशंकर सिंह यांनी मुंबई इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
****
ए आय बी ए महिला युवा जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या महिलांनी
सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. महिला मुष्टीयुद्धपटुंनी स्पर्धेच्या दुसऱ्या
दिवशी गुवाहाटी इथं आणखी पाच पदकांची निश्चिती केली आहे.
*******
No comments:
Post a Comment