आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२९ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या
प्रकरणातल्या तिन्ही दोषी आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाचा निर्णय
जनतेनं शांतपणे स्वीकारावा,
त्यावर कोणीही राजकारण करू नये, असं आवाहन विशेष
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं. दरम्यान, हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयाच्या परिसरात
मोठी गर्दी झाल्याचं, आमच्या अहमदनगरच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात एका सैनिकाकडून शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या
वृत्ताच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि लातूरचे जिल्हा मॅजिस्ट्रेट, यांना
नोटिस जारी करून चार आठवड्यात याबाबतचा अहवाल देण्यास सांगितलं आहे. माध्यमांमधून आलेल्या याबाबतच्या वृत्ताची दखल घेत आयोगानं हे निर्देश दिले.
सैनिकाविरुद्ध पोलिसात तक्रार केल्यानं या मुलीला शाळेतून काढून टाकल्याचं,
तसंच स्थानिक पोलिसांनी ही तक्रार दाखल करण्यासाठी पीडितेच्या कुटुंबियांकडून
पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याचंही या वृत्तात म्हटलं होतं.
*****
बँकांचं कर्ज बुडवणाऱ्या कुठल्याही कंपन्यांचं कर्ज माफ केलं नसल्याचं अर्थमंत्री
अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. अशा बारा बड्या कंपन्यांकडून कर्जाची वसुली
सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सरकारच्या, सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या पुनर्भांडवलीकरणाच्या निर्णयामुळे,
बुडित खात्यांच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या बँकांना आर्थिक बळ मिळेल,
असंही जेटली यांनी नमूद केलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ताज्या कसोटी मानांकनात भारताचा फलंदाज
चेतेश्वर पुजारा दुस-या तर कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या नागपूर इथे झालेल्या कसोटीत शतक केल्यामुळे पुजाराला आणि
याच कसोटीत द्विशतक केल्यानं कोहलीला हे स्थान मिळालं आहे.
****
No comments:
Post a Comment