Friday, 24 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.11.2017 06.50AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ सकाळी .५० मि.
*******
  • येत्या महिनाभरात राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्लॅस्टीक बाटलीचा वापर बंद करणार- पर्यावरण मंत्री रामदास कदम
  • धनादेश पुस्तिका रद्द करण्याचा किंवा परत घेण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण
  • अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी, सांगलीचे पोलिस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची बदली
आणि
  • हाँगकाँग सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत
****
राज्यात पाडव्यापासून प्लॅस्टीकच्या वापरावर पूर्ण बंदी करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर येत्या महिनाभरात राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्लॅस्टीक बाटलीचा वापर बंद करण्यात येणार असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं. औरंगाबाद इथं प्लॅस्टीक बंदी धोरणांच्या आणि संभाव्य कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना काल ते बोलत होते. जनजागृतीच्या माध्यमातून राज्यात प्लॅस्टीक बंदी धोरणाची प्रभावीपणे अंमलबाजावणी करण्याचं आवाहन कदम यांनी यावेळी केलं. प्लास्टीक ला कोणता पर्याय देता येतो, आणि प्लास्टीकबंदी कायद्याची अंमलबजावणी कशी करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी प्लास्टीकबंदी असणाऱ्या राज्यांमध्ये तज्ञांची पथकं पाठवण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
देशांतर्गत बाजारपेठेत कांदा उपलब्ध व्हावा यासाठी कांद्याचं किमान निर्यात मूल्य प्रति टन साडेआठशे डॉलर्स ठरवण्यात आलं आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली आहे.  १२ हजार टन कांदा खरेदी करण्याचे निर्देश नाफेडला देण्यात आले होते. तसंच २ हजार टन कांदा आयातही करण्यात येणार आहे.
****
बँकेची धनादेश पुस्तिका - चेक बुक रद्द करण्याचा किंवा परत घेण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं अर्थ मंत्रालयानं काल स्पष्ट केलं. केंद्र सरकार डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी भविष्य काळात बँकेची धनादेश पुस्तिका रद्द करण्याची शक्यता असल्याचं प्रसार माध्यमांमध्ये प्रसारीत झालं होतं, या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे.
****
शेतकरी कर्जमाफी तसंच शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी  नागपूर इथं हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत दिली. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून त्यामुळेच हा मोर्चा काढण्यात येणार असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या २२ हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांसाठी एक लाख सहा हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या दोन वर्षांच्या काळात राज्यात एकूण ३८ हजार ५०० किलो मीटर रस्त्यांची कामं पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे. काल लातूर इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. रस्त्यांची कामं दर्जेदार होतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. उस्मानाबाद इथंही काल पाटील यांनी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केलं.
****
तीन आणि पाच हजार रुपये भरून शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होता येईल, असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल जाहीर केलं. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत घेता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना वीज देयकाची दुरुस्ती करावयाची आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक वीज वाहिनीनिहाय वीज देयक दुरुस्ती शिबीराचं आयोजन एक डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत महावितरणतर्फे करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, औरंगाबाद, लातूर, नांदेड, आणि जळगाव जिल्ह्यातल्या एक लाख ६५ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत या चार जिल्ह्यात शेतकऱ्यांनी ६७ कोटी २४ लाख रूपयांच्या वीज देयकांचा भरणा केला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी केलं आहे.
****
अनिकेत कोथळे या तरूणाच्या पोलिस कोठडीतल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर, सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि शहर उपअधीक्षक दिपाली काळे यांची बदली करण्यात आली आहे. शिंदे यांची नागपूरला राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशकपदी तर काळे यांची सोलापूर इथं बदली करण्यात आली आहे. गेल्या सहा नोव्हेंबरला सांगली पोलिसांनी अटक केलेल्या अनिकेतचा मारहाणीमुळं त्याच रात्री पोलिस कोठडीत मृत्यु झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचे प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जालना तालुक्यातल्या कडवंची, नंदापूर, पानशेन्द्रा, नाव्हा आणि थार या गावांमध्ये ८०० शेततळी असून, जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे नागपूर-मुंबई समृधी महमार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या इथल्या जमिनीला बागायती दर लागू करावा, अशी मागणी जालना इथल्या शेतकरी हक्क आणि बचाव कृती समितीनं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. समितीच्या पदधिकाऱ्यांनी खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन त्यांना सादर केलं. जामवाडी इथं प्रस्तावित नवनगरसाठी बाजार भावाप्रमाणे प्रति चौरस मीटर दर लागू करावा आणि ज्या शेतकऱ्यांची फारच थोड़ी ज़मीन शिल्लक राहत आहे, ती सुद्धा शासनानं खरेदी करावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
****
 नांदेड जिल्ह्यातल्या माहूर पंचायत समितीचे सभापती मारोतराव रेकुलवार यांच्याविरुद्ध काल झालेल्या विशेष सभेत अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला. चार विरुद्ध तीन मतांनी हा प्रस्ताव मंजूर झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे यांनी हा अविश्वास ठराव दाखल केला होता. रेकुलवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य  आहेत.
***
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी आज मतदान होत आहे. प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, आणि विद्यापरिषद गटासाठी चार जिल्ह्यात १८ मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजता मतदानाला सुरूवात होणार आहे.
****
हाँगकाँग सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधूनं महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे, मात्र सायना नेहवालचा चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव झाला. सिंधूनं जपानच्या अया ओहोरीला २१-१४,२१-१७ असं पराभूत केलं. पुरूष एकेरीत एच.एस. प्रणयचाही पराभव झाला आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान चालू असलेल्या तीन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा कसोटी सामना आजपासून नागपूर इथं सुरु होत आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. कोलकाता इथं झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.
****
नांदेड- हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी तालुक्यातल्या पार्डीमोड इथं दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही ट्रकमधले चालक आणि क्लिनर जखमी झाले. काल पहाटे हा अपघात झाला.
तर दुसरीकडे हिंगोली शहरातल्या संत पोलीस कवायत मैदानाजवळ काल सकाळी एसटी बसची धडक लागून झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण नगरपालिकेला शासनाच्या वैशिष्ठ्यपूर्ण योजनेतून  पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी दिली आहे. या निधीतून नगरपालिका प्रशासन विकास आराखड्यातल्या प्रस्तावाची कामं प्राधान्यानं करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रूग्णालयाच्या राज्यस्तरीय कर्करोग संस्थेला यंत्रसामुग्री खरेदीसाठी एक कोटी तेहतीस लाख रूपयांच्या निधीला काल मान्यता देण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला आहे.
****
तलावाचा मत्स्यव्यवसाय ठेका आदेश आणि त्यापोटी भरणा केलेल्या धनादेश रकमेच्या पावत्या देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथला मत्स्य व्यवसाय अधिकारी बबन तुंबारे याला काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली.
***
वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांवर लहान वयात वाचन संस्कार केले. पाहिजेत, असं प्रतिपादन माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केलं आहे. नांदेड इथं आयोजित ग्रंथोत्सव २०१७ च्या समारोप समारंभ प्रसंगी काल ते बोलत होते.
*******

No comments: