Sunday, 26 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.11.2017 06.50AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक 26 नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** राज्यातल्या मोठ्या शिक्षण संस्थांना माध्यमिक शालांत परीक्षांसाठी स्वायत्तता देण्याचा राज्य सरकारचा विचार
** कर्जमाफीचे सहा हजार ५०० कोटी रुपये १५ लाख ४२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर भरल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
** संविधान दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन
** हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूचा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश
आणि
** नागपूर कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात दोन बाद २६२ धावा
****
आता सविस्तर बातम्या
****
राज्यातल्या मोठ्या शिक्षण संस्थांना माध्यमिक शालांत परीक्षांसाठी स्वायत्तता देण्याचा विचार सरकार करत असल्याचं, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. काल नाशिक इथं, शताब्दी वर्ष पूर्ण करणाऱ्या शिक्षण संस्थांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. शिक्षकांच्या पदांसाठी मध्यवर्ती भरती प्रक्रिया राबवताना शिक्षण संस्थांना देखील मुलाखत घेण्याचे माफक अधिकार देण्यात येतील, असं सांगताना तावडे यांनी, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. राज्यात लवकरच १०० आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात येणार असून, पुढच्या वर्षी नंदूरबार इथं पहिली शाळा सुरू करण्यात येईल, अशी माहिती तावडे यांनी दिली.
दरम्यान, नाशिक इथं बालभारती सुवर्ण महोत्सवाचा काल तावडे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. बालभारतीच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार तर निवृत्त कर्मचाऱ्यांना एक महिन्याचं निवृत्तीवेतन आणि एक हजार रूपये वाढ देण्यात येईल, अशी घोषणा तावडे यांनी यावेळी केली.
****
इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या लोककलाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या गुणांमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. या नुसार आता चित्रकलेसाठी २५ गुणांऐवजी १५ गुण दिले जाणार आहेत. त्याचबरोबर अतिरिक्त गुण मिळवणाऱ्यांसांठी इयत्ता अकरावीच्या प्रवेशात २ टक्क्के जागा राखीव ठेवण्याचा नियमही शासनानं रद्द केला आहे. लोककलासाठी ५ आणि १० गुण देण्यात येणार आहेत. हा निर्णय येत्या २०१८ च्या शालांत परीक्षेपासून लागू होणार आहे
***
राज्यातल्या १५ लाख ४२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर कर्जमाफीचे सहा हजार ५०० कोटी रुपये भरले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोल्हापूर इथं एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. यापुढे १० लाख शेतकऱ्यांची यादी करुन अशाच पध्दतीनं कर्जमाफीचं काम येत्या १० ते १५ दिवसात पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली कर्जमाफी ‘आधार पत्रा’च्या माध्यमातून पारदर्शीपणे करण्यावर भर दिला असल्याचंही ते म्हणाले.
****
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ मध्ये आजच्याच दिवशी लष्कर-ए -तोयबाच्या १० पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत विविध ठिकाणी बाँबस्फोट केले होते. या बॉंबस्फोटात १८ पोलिस अधिकारी, दोन राष्ट्रीय सुरक्षा जवान यांच्यासह १६४ जणांचा मृत्यु झाला होता. दरम्यान, आज मुंबईत या हल्ल्यानिमित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून मुंबई पोलिसांनी मरीन लाईन्स इथं एका अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्फोटात मरण पावलेल्यांना आदरांजली वाहणार आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल मुंबईत ठिकठिकाणी भेटी देऊन, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबियांची पाटील यांनी काल भेट घेऊन संवाद साधला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३८ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
संविधान दिन आज साजरा होत आहे. देशातल्या सर्व विद्यापीठांनी हा दिवस साजरा करावा असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत. आयोगान या संदर्भात विद्यापीठांना पत्र लिहिलं असून संविधानासंदर्भात विविध कार्यक्रम घेण्यास सूचित केलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं बालरक्षकांच्या माध्यामातून साडेतीन हजार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेलं कार्य, इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी असल्याचं प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केलं आहे. जालना काल इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बालरक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सहविचार सभेत ते बोलत होते. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ई लर्निंग शिक्षण पद्धतीवर भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, दोन दिवसांच्या जालना दौऱ्यावर असलेले नंदकुमार यांनी काल सकाळी जालना - सिंदखेडराजा मार्गावर रस्ते कामासाठी स्थलांतरित झालेल्या जळगाव इथल्या मजूर कुटुंबांची भेट घेऊन संवाद साधला.
****
यशवंतराव हे दृष्ट्ये राजकिय नेते, कुशल प्रशासक त्या सोबतच चिंतनशील साहित्यीक होते असं प्रतिपादन प्रसिद्ध समीक्षक आणि ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी केलं आहे. काल अंबाजोगाई इथं 33 व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. . मराठी आत्मचरित्रांना यशवंतरावांचा संदर्भ घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. असं सांगून शब्दांची ताकद यशवंतरावांनी देशाच्या विकासासाठी वापरली असं काळे यांनी पुढं नमूद केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ.सुधीर गव्हाणे हे होते.
****
दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड पूर्णा दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्ती कामासाठी परवा २८ तारखेपासून येत्या सहा डिसेंबरपर्यंत दररोज अडीच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजून ५० मिनिटांपासून दुपारी दोन वाजून वीस मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल, यामुळे नांदेड औरंगाबाद गाडी येत्या एक डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे, तर काचीगुडा मनमाड एक्सप्रेससह काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. ३० नोव्हेंबर आणि चार डिसेंबर रोजी मात्र सर्व गाड्या नियमित धावतील.
दरम्यान, हैदराबाद विभागात घेण्यात येणाऱ्या ब्लॉक मुळे नांदेड मेडचेल पॅसेंजर आजपासून येत्या एक डिसेंबरपर्यंत निझामाबाद ते मेडचेल दरम्यान रद्द करण्यात आली असून, ही गाडी नांदेड ते निझामाबाद दरम्यानच धावेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूनं हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हाँगकाँगमध्ये काल झालेल्या उपांत्य फेरीत सिंधूनं थायलंडच्या रतचानोक इंतानोनचा २१-१७, २१-१७ नं पराभव केला. हाँगकाँग सुपर सिरिजच्या फायनलमध्ये धडक मारण्याचं सिंधूचं हे सलगचं दुसरं वर्ष आहे. आज होणाऱ्या अंतिम फेरीत सिंधूसमोर चीन तैपईच्या ताई त्झू-यिंग हिचं आव्हान आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान नागपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या काल दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या शतकी खेळीच्या बळावर दोन बाद २६२ धावा झाल्या. विजयनं १२८ धावा केल्या. पुजारा १२१ आणि विराट कोहली ५४ धावांवर खेळत आहेत. पहिल्या डावात भारत १०७ धावांनी आघाडीवर आहे.
****
आकाशवाणीनं घेतलेल्या संगीत स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, शास्त्रीय ख्याल गायनात मुंबईच्या प्राजक्ता मराठे यांनी प्रथम तर, औरंगाबादच्या सावनी गोगटे यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. उपशास्त्रीय गायनात परभणीच्या सरस्वती बोरगावकर यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. नागपूरचे अथर्व भालेराव, मोनिका भोयर, मुंबईचे ओंकार सोनपेठकर, अद्वैत काशीकर, वैदेही मेकडे, धारिणी वीर राघवन, आदित्य गणेश यांनीही विविध प्रकारात यश संपादित केलं आहे. समूहगान प्रकारात रत्नागिरीच्या काश्मिरा सावंत आणि समूहानं पहिला क्रमांक पटकावला आहे.
****
औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्या परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, विद्यापीठात सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरूवात होईल.
****
अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट म्हणून राज्य शासन एक हजार रुपये देणार आहे. या संबधीचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.
****
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचं औचित्य साधून, परभणी इथं आजपासून तीन दिवस महाखादी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उदघाटन होईल.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातल्या ४९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा तालुका प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. २०१२ ते २०१७ या कालावधीत या आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन संवाद साधण्याचं गेल्या काम १५ नोव्हेंबरपासून हाती घेण्यात आलं होतं.
****

No comments: