Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 November 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत राज्याच्या निधीतून खरेदी
केलेल्या तुरीपासून डाळ तयार करुन ती स्वस्त धान्य दुकानातून विक्री करण्यास आज झालेल्या
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणासाठी
राबवण्यात येणाऱ्या महावितरण कंपनीच्या पायाभूत आराखडा - दोन या योजनेस मार्च २०१९
पर्यंत मुदतवाढ देण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
राज्यातल्या यंत्रमाग उद्योगाला चालना देण्यासाठी साध्या
यंत्रमागधारकांनी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरात पाच
टक्के सवलत देण्यास, देशव्यापी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राज्यात कार्यान्वित
करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
केंद्र आणि राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती किंवा फ्री-शिप
योजनेंतर्गत २०१६-१७ पर्यंत शैक्षणिक संस्था-महाविद्यालयांना द्यावयाच्या रकमेपैकी
६० टक्के रक्कम संबंधितांना ऑफलाईन देण्यास, तसंच २०१७-१८ मधल्या पहिल्या सत्राच्या
५० टक्के देय असलेल्या शिक्षण आणि परीक्षा शुल्काच्या ६० टक्के रक्कम महाविद्यालयांना
आणि निर्वाहभत्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्याचा
निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
****
मुंबई वगळता राज्यातल्या अकृषी विद्यापीठांनी
सादर केलेल्या बृहत आराखड्यांच्या अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीनं
दिलेल्या अहवालानुसार पाच विद्यापीठांच्या बृहत आराखड्यांना
अंतिम मंजुरी देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुंबईत
आज महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. औरंगाबादचं
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पुण्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ, मुंबई
विद्यापीठ, गडचिरोलीचं गोंडवाना विद्यापीठ, कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ या विद्यापीठांनी
मांडलेल्या बृहत आराखड्यांमध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था, अभ्यासक्रम, विद्याशाखा, विषय यांचा समावेश आहे.
****
सरकार संसदेचं हिवाळी अधिवेशन टाळत
असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं केला आहे. ज्या मुद्यांवर विरोधी पक्षांना संसदेत चर्चा
करायची आहे, सरकार त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. काही राज्यांच्या
विधानसभा निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन टाळल्या जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
२०११ साली तत्कालीन युपीए सरकारनंही संसदेचं हिवाळी अधिवेशन घेतलं नसल्याचा अर्थमंत्री
अरुण जेटली यांनी केलेला आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी फेटाळून लावला आहे.
****
शौर्य पुरस्कार मिळालेल्या जवानांच्या
विधवा पत्नींना सरकारकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी दिरासोबत विवाह करण्याची अट संरक्षण
मंत्रालयानं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयानं यासंदर्भात आज एक निवेदन
जारी केलं. शौर्य पुरस्कार प्राप्त जवानांना आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला
शेवटपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
२६ तारखेला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३८वा भाग आहे. नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या २३ नोव्हेंबरपर्यंत एक आठ
शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निःशुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही
ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲपवर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात
आलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या
हदगाव इथल्या मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहातल्या गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजार
रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज रंगेहाथ पकडलं. विद्यार्थ्यांचं भोजन पुरवठा देयक मंजूर करण्यासाठी
त्यांनी ही लाच मागितली होती.
****
प्रवाशांच्या सोयीसाठी
दक्षिण मध्य रेल्वेनं नगरसोल ते तिरुपती या विशेष रेल्वे गाडीच्या २६ फेऱ्या वाढवण्याचा
निर्णय घेतला आहे. ही गाडी दर शुक्रवारी तिरुपतीहून निघते आणि दर शनिवारी नगरसोलहून
निघते. फेब्रुवारीपर्यंत या गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद शहरात नगर रोडवरच्या ए
एस क्लबजवळ कंटेनरनं दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरच्या महिलेचा जागीच
मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले. आज दुपारी हा अपघात झाला. कंटेनरचं चाक
खड्ड्यात गेल्यानं त्याची दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या
टेंभुर्णी इथं उसाचा ट्रक अंगावर पलटल्यानं वृद्ध दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. देवळालीजवळ
आज दुपारी हा अपघात झाला. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचं गावकऱ्यांचं
म्हणणं आहे.
****
No comments:
Post a Comment