आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२५ नोव्हेंबर २०१७ सकाळी
११.०० वाजता
****
विमुद्रीकरणामुळे अर्थव्यवस्थेत
देयक पद्धतीत बदल झाला असून, रोख व्यवहारांऐवजी डिजिटल व्यवहारांचं प्रमाण वाढत असल्याचं
भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. विमुद्रीकरणाचा आंतरबँक देयक आणि समायोजन प्रक्रियेवर
महत्वपूर्ण परिणाम झाल्याचं बँकेनं मुंबईत जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. विमुद्रीकरणानंतर
धनादेशांची संख्या आणि त्यांच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही या अहवालात
म्हटलं आहे.
****
राज्यातल्या विद्यापीठांना
विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी राज्य शासनाकडून तसंच
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान - रुसाअंतर्गत निधी मंजूर होतो. या निधीतून संबंधित विद्यापीठांना
आवश्यक ते बांधकाम करण्यासाठी परवानगीची आवश्यकता असून त्यासाठी उच्च आणि
तंत्रशिक्षण विभागानं विशेष नियमावली तयार करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण
मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. मुंबईत रुसा कौन्सिलच्या आढावा बैठकीत ते
बोलत होते. या बैठकीत रुसामार्फत राबवण्यात येणारे उपक्रम, योजना, तसंच आतापर्यंतच्या कामांचा आढावा
घेण्यात आला.
****
औरंगाबाद जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या
अध्यक्षपदी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीच्या
सदस्यांमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
महापौर, तसंच आमदार, आदींचा समावेश आहे.
खैरे यांच्या अध्यक्षतेखाली
काल औरंगाबाद इथं जिल्ह्यातल्या रस्ते कामांची आढावा बैठक घेण्यात आली.
****
औरंगाबाद इथल्या
महात्मा गांधी मिशन संस्थेच्या महागामीतर्फे आयोजित
‘ऑरा औरंगाबाद’ नृत्यशृंखलेच्या पाचव्या सत्रात आज ओडीसी नृत्याचं सादरीकरण करण्यात
येणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सिडको एन ६ मधल्या महागामीच्या
शारंगदेव भवन इथं हा कार्यक्रम होणार आहे. या नृत्यशृंखलेत औरंगाबादच्या
वारशावर विविध दृष्टिक्षेपांतून नृत्य वारसा प्रस्तुत केला जाणार आहे.
*****
No comments:
Post a Comment