आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२१ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या
हंदवाडा परिसरात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत तीन
दहशतवादी ठार झाले. आज सकाळी या भागात जवानांनी शोधमोहीम सुरु केल्यानंतर
ही चकमक सुरु झाली. मारले गेलेले तिन्ही
दहशतवादी लष्कर - ए - तय्यबा या दहशतवादी
संघटनेचे आल्याचं एका पोलिस अधिकाऱ्यांनं
सांगितलं. चकमक अजुनही सुरु असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी
इथल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं तिन्ही आरोपींना दोषी
ठरवल्यानंतर आज शिक्षेवर युक्तीवाद केला जाणार आहे. गेल्या शनिवारी न्यायालयानं या आरोपींना दोषी ठरवल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा
सुनावण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. आज आणि उद्या युक्तीवाद
झाल्यांनतर शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
****
इंटरनेटवर खेळल्या जाणाऱ्या ब्लू व्हेल
सारख्या खेळांबाबतच्या धोक्यांबद्दल शालेय विद्यार्थ्यांना जागरुक करावं असे निर्देश
मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. यासंदर्भात
योग्य ती पावलं उचलण्याच्या सूचना न्यायालयानं सर्व राज्य सचिवांना दिल्या आहेत.
या खेळाच्या दुष्परिणामाबाबत जागरुकतेसंदर्भात उच्च न्यायालयाच्या एका
वकीलानं याचिका दाखल केली होती.
****
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे
देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी
जीवनगौरव पुरस्कार बाबा पार्सेकर यांना, तर संगीताचार्य अण्णासाहेब
किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार निर्मला गोगटे यांना काल मुंबईत समारंभपूर्वक
प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यावेळी
उपस्थित होते. आजच्या युवा पिढीपर्यंत संगीत नाटकं पोहचवण्याची
आवश्यकता असून, संगीत नाटकांचं
पुनरुज्जीवन करुन त्यांना पुन्हा एकदा चांगलं वैभव प्राप्त करुन देऊ असं तावडे यावेळी
म्हणाले.
****
आपला इतिहास आणि भविष्य उज्वल करण्यासाठी
ग्रंथ वाचनाशिवाय पर्याय नाही, ग्रंथामुळे आपण अधिक प्रगल्भ
होऊ शकतो यासाठी ग्रंथवाचन मोलाचं ठरतं असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव
यांनी केलं आहे. परभणी इथं आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी
काल ते बोलत होते. माणूस घडण्यासाठी ग्रंथ हेच मोठी भूमिका बजावू
शकतात असं ते यावेळी म्हणाले.
*******
No comments:
Post a Comment