Tuesday, 28 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.11.2017 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारनं पंधराव्या वित्त आयोगाची स्थापना केली असून, माजी प्रशासकीय आधिकारी तसंच माजी खासदार एन. के. सिंग या आयोगाचे अध्यक्ष असतील. एक एप्रिल २०२० पासून पुढच्या पाच वर्षासाठी हा आयोग केंद्रीय महसुलातून राज्यांना हस्तांतरित करण्याच्या निधीबद्दल शिफारशी करेल, असं आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी सांगितलं. माजी आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास आणि जॉर्ज टाऊन विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अनुप सिंग या आयोगाचे सभासद तर अरविंद मेहता या आयोगाचे सचिव असतील.
****
ऑक्टोबर महिन्यात वस्तू आणि सेवाकर करापोटी ८३ हजार तीनशे सेहेचाळीस कोटी रुपये महसूल जमा झाला असल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. ५० लाखांहून अधिक करविवरण पत्रं दाखल करण्यात आली असून, राज्यांकडे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करापोटी ८७ हजार कोटी रूपये जमा झाले आहेत. त्याचप्रमाणे जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी दहा हजार आठशे कोटी रूपये तसंच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांसाठी १३ हजार सहाशे पंचाण्णव कोटी रुपये भरपाई पोटी सर्व राज्यांना देण्यात आले असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
संजय लीला भंसाळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपट परदेशात प्रदर्शित न करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची गाणी तसंच प्रोमोला भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळ - सेन्सॉर बोर्डाची मान्यता मिळवण्यासंदर्भात न्यायालयात खोट्या बाबी सादर केल्या, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. सेन्सॉर बोर्डानं अद्याप चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. याआधी न्यायालयानं चित्रपटातून काही दृश्य वगळण्याची विनंतीही मान्य केली नव्हती.
****
गुजरात केडरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी राकेश अस्थाना यांना केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयचे विशेष संचालक म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेनं ही याचिका दाखल केली होती. एका कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागानं मारलेल्या छाप्यात हस्तगत केलेल्या एका डायरीत अस्थाना यांचं नाव समोर आल्यानं त्यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं या याचिकेत म्हटलं होतं. मात्र अस्थाना यांच्या नियुक्तीमध्ये कुठल्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचं सांगत, न्यायालयाने अस्थाना यांच्या नियुक्तीचा निर्णय योग्य ठरवला.
****
व्यवसाय - उद्योग जगतातल्या उदयोन्मुख क्षेत्रांना चालना देण्यासाठी २०१८ च्या सुरवातीलाच नवं औद्योगिक धोरण आणणार असल्याची घोषणा वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. एका वृत्त समूहाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या धोरणासंबंधीचा मसुदा मंत्रालयानं तयार केला असून, १९९१ च्या औद्योगिक धोरणात आमूलाग्र बदल केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
सागरी किनारक्षेत्राच्या व्यवस्थापनाविषयी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आराखडा तयार करुन येत्या ३० एप्रिलपर्यंत सादर करावा असे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायधिकरणानं दिले आहेत. हा आराखडा केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाला सादर करायचा आहे. यात कसूर झाल्यास संबंधित जबाबदार आधिकाऱ्याच्या पगारातून पाच लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात येईल असं न्यायाधिकरणाचे अध्यक्ष स्वतंत्र कुमार यांनी सांगितलं आहे.
****
सफाई कामगारांचे प्रश्न सोडवण्यात दिरंगाई झाल्यास कडक कारवाईचा इशारा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिला आहे. मुंबई इथं अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू होणं आवश्यक असून, वेळोवेळी बैठका घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे निर्देश देण्यात आल्याचं बडोले यांनी सांगितलं.
****
रेल्वे विभागानं उत्तर प्रदेशात २४ नोव्हेंबर रोजी वास्को द गामा एक्सप्रेस रेल्वेचे १३ डबे रुळावरुन घसरल्या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. माणिकपूर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या अपघातात तीन जणांना मृत्यू झाला होतं. रुळाला तडे गेल्यानं हा अपघात झाल्याचं तपासात समोर आलं आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड पूर्णा दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्ती कामासाठी आजपासून येत्या सहा डिसेंबरपर्यंत दररोज अडीच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजून ५० मिनिटांपासून दुपारी दोन वाजून वीस मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल, यामुळे नांदेड औरंगाबाद गाडी येत्या एक डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे, तर काचीगुडा मनमाड एक्सप्रेससह काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. ३० नोव्हेंबर आणि चार डिसेंबर रोजी मात्र सर्व गाड्या नियमित धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****

No comments: