आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२७ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
*****
महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी आज नवी दिल्ली इथं स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या महिलांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उदघाटन करणार आहेत. राष्ट्रीय जनसहकार्य संस्थेच्या माध्यमातून या महिला लोकप्रतिनिधींना सक्षम करणं, आणि त्यातून बालविकासाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी क्षमता बांधणीचा उपक्रम राबवला जातो. महिलांचा शासकीय क्रिया – प्रक्रियांमधला परिणामकारक सहभाग वाढावा यासाठी महिलांचं सक्षमीकरण करणं आणि त्यासाठी क्षमता बांधणीचा उपक्रम राबवणं महत्त्वाचं असल्याचं अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. या क्षमता बांधणीच्या कार्यक्रमातून प्रत्येक जिल्ह्यातून ५० अशा जवळपास २० हजार लोकप्रतिनिधींना प्रशिक्षित केलं जाणार आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात काल सायंकाळी नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक पोलिसाला वीरमरण आलं, तर दोन पोलिस गंभीर जखमी झाले. काल संध्याकाळी नक्षलशोध अभियानादरम्यान हा प्रकार घडला. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात नक्षलवादी हल्ल्याच्या घटनेत तीन नागरिक आणि दोन पोलिस हुतात्मा झाले आहेत.
****
पुणे बंगळुरु महामार्गावर वाळवा तालुक्यातल्या येल्लुर इथं खासगी आराम बस आणि टेम्पो मध्ये झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
राज्यातल्या हुतात्मा स्मारकांची लवकरच दुरुस्ती केली जाणार असून, या स्मारकांमध्ये ग्रंथालयांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं सिंधुदुर्ग ग्रंथोत्सवाचं उद्घाटन करतांना बोलत होते. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्या टप्प्याटप्प्यानं पूर्ण करू अशी ग्वाही केसरकर यांनी यावेळी दिली.
****
खुलताबाद इथल्या हजरत जरजरी जर बक्ष ऊर्सनिमित्त आज औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय – घाटीचा बाह्य रूग्ण विभाग बंद राहणार आहे, असं वैद्यकीय अधीक्षकांनी कळवलं आहे.
*****
प्लास्टीक निर्मूलनासाठी आजपासून मराठवाड्यात प्लास्टीक वेचा मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे आदेश विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment