Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
*******
अहमदनगर जिल्ह्यातल्या
कोपर्डी इथल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं तिन्ही आरोपींना
दोषी ठरवल्यानंतर आज शिक्षेवर युक्तीवाद सुरु झाला आहे. आरोपी नितीन भैलुमे यानं आपण
निर्दोष असून, या गुन्ह्याशी कसलाही संबंध नसल्याचं न्यायालयात सांगितलं. आरोपी जितेंद्र
शिंदे याच्या वकीलानंही आरोपीला कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं
सांगितलं आहे. गेल्या शनिवारी न्यायालयानं या आरोपींना दोषी ठरवल्यानंतर त्यांना फाशीची
शिक्षा सुनावण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. आज आणि उद्या युक्तीवाद झाल्यांनतर
शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
****
गोव्यात पणजी इथं सुरु असलेल्या ४८व्या
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज डियन पॅनोरमा या बहुचर्चित आणि लोकप्रिय
सत्राचं उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या हस्ते होणार आहे. यात विविध भागांमधले
निवडक २६ चित्रपट आणि १६ कथाबाह्य चित्रपट दाखवले जाणार आहेत. बलुत हा मराठी चित्रपटही
या सत्रात दाखवला जाणार आहे.
****
हेग इथल्या आंतराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर
भारताचे दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. या निवडणुकीतून ब्रिटननं माघार घेतली. आज सकाळी
न्यूयॉर्क मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात महासभा आणि सुरक्षा परिषदेमध्ये
एकाच वेळी मतदान झालं. भंडारी यांना महासभेत १९३ पैकी १८३ तर सुरक्षा परिषदेतून १५ मतं मिळाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी
ट्विटरवरुन भंडारी या निवडणुकीत जिंकल्याचं सांगत त्यांचं अभिनंदन केलं.
****
वस्तू आणि सेवा कराचा कमी करण्यात
आलेल्या दराचे फायदे उद्योजकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवावेत असं आवाहन केंद्र
सरकारनं केलं आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पाठवलेल्या पत्रात
केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्ष वनजा सरना यांनी, सर्व उत्पादकांनी कमाल विक्री किंमती कमी करून ग्राहकांना सुधारित दरानुसार
उत्पादनांची विक्री करावी असं सांगितलं आहे. सुधारित किंमतींचा व्यावसायिकांनी व्यापक प्रचार
करावा असंही सरना यांनी म्हटलं आहे.
****
येत्या मार्चअखेर पर्यंत प्रधानमंत्री
आवास योजनेअंतर्गत देशात ग्रामीण भागातल्या गरिबांसाठी ५० लाखांपेक्षा जास्त घरांचं
बांधकाम केलं जाणार आहे. गावांमध्ये सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारची ही
महत्वाकांक्षी योजना असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत
ग्रामीण भागातल्या एक कोटी नवीन घरांच्या निर्मितीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत
लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. यापैकी ५१ लाख घरे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करावी
लागतील, असं ग्रामीण विकास मंत्रालयानं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. गरीबांना सुरक्षित
घराबरोबर शौचालये, स्वयंपाकाच्या गॅसची आणि वीज जोडणी, पिण्याचं पाणी इत्यादी सुविधाही
मिळणार असून, या योजनेच्या सामाजिक परिवर्तनाबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली
असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या वीमा कंपन्याना
सुचीबद्व करुन तसंच निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून केंद्र सरकारनं ५२ हजार ५०० कोटी
रुपये उभे केले असल्याचं गुंवतणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव
नीरज गुप्ता यांनी सांगीतलं आहे. सरकारनं व्यापार विनीमय निधीच्या माध्यमातून १४ हजार
५०० कोटी उभारले, तर इतर विनीमय व्यापार निधीसाठी ३२ हजार कोटी रुपयांच्या बोली लावल्या
गेल्या, त्यातली एक तृतीयांश रक्कम परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवली असल्याचं
त्यांनी सांगीतलं. यावर्षी निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ७२ हजार ५०० कोटी रुपये उभारण्याचं
केंद्र सरकारचं उद्दीष्ट आहे.
****
नांदेड-लिंबगाव-चुडावा-पूर्णा दरम्यान
रेल्वे रुळाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाकरता येत्या २५ नोव्हेंबर ते तीन डिसेंबर
दरम्यान आठ दिवसांचा लाईन ब्लॉक दोन टप्यात घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे
गाड्या अंशतः रद्द करण्यात येत आहेत, तर काही उशिरा धावणार आहेत. या कालावधी दरम्यान
३० नोव्हेंबरला कोणताच ब्लॉक घेण्यात येणार नाही.
दरम्यान, मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे
पूलाचं काम सुरु असल्यामुळे आज जालना - शिर्डी - जालना ही रेल्वे नागरसोल-शिर्डी दरम्यान
रद्द करण्यात येत आहे. ही गाडी आज जालना-नागरसोल-जालना अशी धावणार असल्याचं दक्षिण
मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
हाँगकाँग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा
आजपासून हाँगकाँगमधल्या काऊलून इथं सुरु होत आहे. भारताकडून या स्पर्धेत पी व्ही सिंधू,
सायना नेहवाल, एच एस प्रणय, बी साई प्रणित, पी कश्यप हे खेळाडू सहभागी होणार आहेत.
पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि बी सुमित रेड्डी, तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि
एन सिक्की रेड्डी सहभागी झाले आहेत. के श्रीकांतनं दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार
घेतली आहे.
*******
No comments:
Post a Comment