Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
कोणत्याही देशाच्या
विकासासाठी शिक्षणाचा प्रचार आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं
आहे. ते आज नवी दिल्ली इथं आज आंतरराष्ट्रीय आंबेडकर कॉन्क्लेव्ह मध्ये बोलत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही देशात शिक्षणाला चालना देण्यासाठी महत्वाचं कार्य
केल्याचं ते म्हणाले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधल्या नागरिकांच्या समस्या
जाणून घेतल्या पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
****
सरकारच्या विविध
कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक संलंग्न करण्याची मुदत येत्या ३१
मार्चपर्यंत वाढवण्याचे संकेत केंद्र सरकारनं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयासमोर या
संदर्भात अनेक याचिका प्रलंबित आहेत. आधार संलंग्न करण्याच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती
देण्याची मागणी या याचिकांमधून करण्यात आली आहे. सध्या आधार संलग्न करण्याची मुदत ३१
डिसेंबर असून, मोबाईल फोन ला आधार जोडण्याची मुदत सहा फेब्रुवारी आहे.
****
१२ वर्षे आणि त्याहून
कमी वयाच्या मुलींवर बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपींना मृत्यूदंडाची
शिक्षा देण्याची तरतूद असलेल्या प्रस्तावाला मध्यप्रदेश सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्य
विधानसभेच्या आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार आहे.
त्यानंतर ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. सामुहिक बलात्कार प्रकरणातल्या
दोषींसाठी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासंदर्भातही मध्यप्रदेश सरकारनं ठराव मंजूर केला
आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी उद्या हैदराबाद मेट्रो रेल्वेचा शुभारंभ करणार आहेत. मियापूर स्थानकावर उद्या
दुपारी हा कार्यक्रम होणार असून, पंतप्रधान आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर
राव मियापूर ते कुकटपल्ली असा मेट्रोनं प्रवास करणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान
आज गुजरात दौऱ्यावर असून, आज भुज, जसदान, धारी कामरेज याठिकाणी त्यांच्या प्रचार सभांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
गुजरात विधानसभा
निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं ३४ उमेदवारांची
यादी आज जारी केली. गांधीनगर, मणीनगर, तसंच साबरतमी विधानसभा मतदारसंघातल्या
उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. या यादीबरोबरच भाजपानं सर्व १८२ जागांसाठी आपले उमेदवार
जाहीर केले आहेत.
****
जम्मू काश्मीरमधल्या
वैष्णोदेवी मंदिरापर्यंत जाणारा बॅटरी कार मार्ग आजपासून बंद करण्यात आला आहे. श्री
माता वैष्णोदेवी विश्वस्त मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिंतेंद्र कुमार सिंह यांनी
ही माहिती दिली. वैष्णोदेवी भवनपासून भैरव घाटीपर्यंत रोप वे बनवण्याचं काम सुरु असल्यामुळे
बॅटरी कारचा मार्गही येत्या एक डिसेंबर पर्यंत बंद ठेवणार असल्याचं ते म्हणाले.
****
गोव्यात पणजी इथं
सुरू असलेल्या ४८व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज इंडियन पॅनोरामा विभागात
योगेश सोमण दिग्दर्शित माझं भिरभिरं हा मराठी सिनेमा दाखवला जाणार आहे.
दरम्यान, काल
या महोत्सवात मास्टर क्लासमध्ये प्रसिद्ध निर्माते शेखर कपूर यांचं व्याख्यान झालं. अभिव्यक्ती
स्वातंत्र्यालाही मर्यादा असल्याचं, कपूर म्हणाले.
****
जागतिक पॅरा बॅडमिंटन
अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण पदकांसह एकूण दहा पदकं जिंकली आहेत. दक्षिण
कोरियातल्या उल्सन इथं काल झालेल्या सामन्यांमध्ये महिला एकेरीत स्टँडिंग लोअरच्या
आणि महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत पारुल परमारनं दोन सुवर्ण पदकं पटकावली. पुरुष
एकेरीच्या स्टँडिंग लोअर चार गटात तरुण ढिल्लननं तर, स्टँडिंग
लोअर तीन गटात मनोज सरकारनं रौप्य पदक जिंकलं. याशिवाय
भारतानं सहा कांस्य पदकंही जिंकली आहेत.
****
पंकज अडवाणीनं जागतिक
स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दोहा इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत अडवाणीनं काल ऑस्ट्रियाच्या
फ्लोरीअन न्यूबचा सात - दोन असा पराभव केला. सुवर्ण
पदकासाठी अडवाणीचा सामना आज इराणच्या आमीर सारखोसोबत होणार आहे.
****
गुवाहाटी इथं झालेल्या जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय संघानं पाच सुवर्ण
पदकं पटकावली. ४८ किलो वजनी गटात नीतू, ५१ किलो वजनी गटात ज्योती गुलिया, ५४ किलो वजनी
गटात साक्षी चौधरी आणि ५७ किलो वजनी गटात शशी चोप्रा यांनी सुवर्ण पदकं जिंकली. यासोबतच
भारतीय संघानं या स्पर्धेत दोन कांस्य पदकंही पटकावली आहेत.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा
नागपूर कसोटी सामना भारतानं दोनशे एकोणचाळीस धावा आणि एका डावानं जिंकला आहे. भारतानं
काल तिसऱ्या दिवशी आपला पहिला डाव ६१० धावांवर डाव घोषीत केला होता, या आव्हानाचा पाठलाग
करताना, श्रीलंकेचा संघ आज १६६ धावांवर सर्वबाद झाला. रविचंद्रन अश्विननं चार, तर इशांत
शर्मा, रविंद्र जडेजा आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. मालिकेतला पुढचा
सामना दोन डिसेंबरपासून दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानावर होणार आहे.
****
No comments:
Post a Comment