Friday, 24 November 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 24.11.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin,Aurangabad

Date-24 November 2017

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यात प्लास्टिक बंदीला प्रोत्साहन देणाऱ्या गावांसाठी खास पुरस्काराची योजना जाहीर करण्यात येईल आणि ग्रामपंचायतींना पाच लाख रुपयांचा विभागीय स्तरावर पुरस्कार देण्यात येईल, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं आहे. ते आज नाशिक इथं प्रदूषण नियंत्रण विभागाच्या बैठकीत बोलत होते. प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी कठोर कायदा करणार असल्याचा, त्यांनी पुनरुच्चार केला.

****

भारतीय संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्यासाठी आणि संविधानात सांगितलेल्या नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांप्रती जागरुकता निार्मण करण्यासाठी संविधान दिनाचं औचित्य साधून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं डिजिटल साक्षरता अभियान सुरु केलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. दरवर्षी २६ नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करण्यात येतो.

****

आमदारकी रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं, राज्याचे पशूसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद खंडपीठानं खोतकर यांची निवडणूक रद्दबातल असल्याचा निर्णय सुनावला, या संदर्भात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी खंडपीठात याचिका दाखल करून, खोतकर यांनी मुदत संपल्यावर नामनिर्देशन पत्र भरल्याचा आरोप केला होता. दरम्यान, न्यायालयानं आपल्या या निर्णयाला तीस दिवसांची स्थगिती दिली आहे.

****

हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी निलंबित केलं आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास दिलेली आणि मुदत ठेवीच्या रुपात असलेली रक्कम तहसील प्रशासन देत नसल्यानं, या शेतकऱ्यांच्या मुलानंही आत्महत्या केल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी घडली होती. यात दप्तरदिरंगाई केल्याच्या तक्रारीनंतर भापकर यांनी निलंबनाची कारवाई केली.

****

डॉक्टरांनी रुग्णांना ब्रॅण्डेड औषध लिहून देताना औषधाचं जेनेरिक नावही लिहीणं बंधनकारक करण्यात आलं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या संकेतस्थळावर याबाबत सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी औषधाचं जेनेरिक नावं वाचण्यास योग्य आणि मोठ्या अक्षरात नमूद करणं आवश्यक असल्याचं महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक डॉ. दिलीप वांगे यांनी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यात राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाअंतर्गत बालकामगार विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहागड, घनसावंगी, टेंभुर्णी, भोकरदन, राजुर आणि जालना शहरात सर्वेक्षण करण्यात आलं. या बालकांकरता त्यांच्या कामाच्याच ठिकाणी शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

****

राज्यात शौचालय बांधकामात नांदेड जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून, गेल्या सात महिन्यात नांदेड जिल्ह्यात एक लाख २४ हजार शौचालयं बांधण्यात आली असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितलं. अर्धापूर, मुदखेड, माहूर, धर्माबाद, हिमायतनगर, नांदेड आणि भोकर हे सात तालुके उघड्यावर शौचापासून मुक्त झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नांदेड -हिंगोली राष्र्टीय महामार्गावर आखाडा बाळापूर नजिक मालवाहू ट्रकनं ऑटोला धडक देऊन झालेल्या अपघातात ऑटोचालकाचा मृत्यू झाला. आज सकाळी हा अपघात झाला. ट्रक चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

****

हिंगोली - कनेरगाव रस्त्यावर पारोळा पाटी जवळ एस.टी.बस आणि दुचाकीत झालेल्या अपघातात माजी सैनीक अधीकारी तथा माजी पंचायत समिती सदस्याचा मृत्यू झाला. खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड इथं उद्यापासून दोन दिवसीय महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या विसाव्या द्वैवार्षिक राज्य अधिवेशन आणि शेतकऱ्यांसह असंघटीत कष्टकऱ्यांच्या पेन्शन परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हे अधिवेशन होणार आहे.

****

भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हाँगकाँग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत पोहोचली आहे. आज झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूनं जपानच्या अकाने यामागुचीचा २१- १२, २१- १९ असा पराभव केला.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान नागपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज पहिल्या दिवसअखेर भारताच्या आठ षटकात एक बाद ११ धावा झाल्या. तत्पूर्वी श्रीलंकेचा पहिला डाव २०५ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रविचंद्रन अश्विननं चार, रविंद्र जडेजा आणि इशांत शर्मानं प्रत्येकी तीन गडी बाद केले.

****


No comments: