आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०३ नोव्हेंबर २०१७ सकाळी
११.०० वाजता
*****
जगभरातल्या खाद्य पदार्थ उद्योगातले गुंतवणुकदार आणि उद्योजकांचा
सर्वात मोठा मेळावा - वर्ल्ड फुड इंडिया नवी दिल्ली इथं आजपासून सुरू झाला असून, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होत आहे. खाद्य पदार्थ उद्योगाचं
स्थित्यंतर घडवणं आणि भारताला गुंतवणुकीसाठी पसंतीचा देश बनवून शेतकऱ्यांचं उत्पन्न
दुप्पट करायची मोहीम यशस्वी करणं हा या मेळाव्याचा उद्देश आहे. या मेळाव्यात ३० देशांमधल्या
२०० कंपन्या आणि दोन हजार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
*****
राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज
शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या आठशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना तीन कोटी
७० लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळालेल्या
ग्रीन लिस्ट मध्ये पहिल्या टप्प्यातल्या शेतकऱ्यांची नावं प्राप्त झाली आहेत. तालुका
स्तरावरील समित्यांकडून पडताळणी झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफीची रक्कम
जमा होईल असं बँकेच्या सूत्रांनी सांगितलं.
*****
बारामती इथं आधुनिक तंत्रज्ञानाच्या
सहाय्यानं उभारण्यात येणारा देशातला पहिला भाजीपाला गुणवत्ता प्रकल्प राज्यात पथदर्शी
ठरणार असल्याचा विश्वास कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केला. बारामती मधल्या
कृषी विज्ञान केंद्रात उभारण्यात आलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राचं उद्घाटन फुंडकर
आणि नेदरलँडचे कृषीमंत्री ॲल्ड्रीक खिअरवेल्ड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत
होते. शेतकऱ्यांच्या शेती मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असून,
शेतकऱ्यांना निर्यातक्षम मालाचं उत्पादन घेण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी मदत करणार
असल्याचं त्यांनी सांगितलं.
*****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठात परवा पाच तारखेपासून पंधराव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ युवक
महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या नऊ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात
राज्यभरातल्या २० विद्यापीठांमधले जवळपास एक हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या
युवक महोत्सवात संगीत, नृत्य, साहित्य, रंगमंचीय, ललित कला अशा विविध २४ कलाप्रकारांमध्ये
विद्यार्थी कलावंत आपली कला सादर करणार आहेत.
******
No comments:
Post a Comment