Thursday, 9 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      महिला आरक्षण विधेयक अधिक बळकट करण्यासाठी १६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन

·      अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

·      होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून ग्रीन आशा हे जहाज जेएनपीएमध्ये दाखल

·      वारकरी परंपरेचं आपल्या संस्कृतीत महत्त्वाचं स्थान-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

आणि

·      जायकवाडीसह विविध धरण परिसरात पर्यटन केंद्र विकासाचा निर्णय

****

महिला आरक्षण विधेयक अधिक बळकट करण्यासाठी १६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत लेख तसंच सामाजिक माध्यमावरील एका चित्रफितीतून माहिती देतांना, विधानमंडळांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के प्रतिनिधित्व सुनिश्चित करणं, हे बळकट आणि सर्वसमावेशक लोकशाहीसाठी अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशाच्या लोकसंख्येत निम्मा वाटा असलेल्या महिलांचं राष्ट्राच्या उभारणीतलं योगदान अमूल्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. महिला जेव्हा प्रशासकीय तसंच निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या आपल्या अनुभवांतून आणि दृष्टिकोनातून प्रशासनाची गुणवत्ता वाढवतात, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

राज्यसभेचे नवनिर्वाचित सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ अजित पवार यांना आज उपराष्ट्रपती तसंच राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. संसद भवनातल्या अध्यक्षांच्या परिषद कक्षात हा शपथविधी झाला.

****

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. मात्र, निवडणुकीतून माघार घेतली असली तरी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

****

विधानसभेच्या राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात उरले आहेत. या निवडणुकीसाठी ३० जणांनी अर्ज दाखल केले होते. आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २३ जणांनी माघार घेतली.

****

पुदुचेरी, आसाम आणि केरलम विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. केरलममधल्या १४० मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान झालं. आसाममध्ये १२६ जागांसाठी ७६ टक्के तर पुदुचेरीतल्या ३० जागांवर ७२ टक्के मतदारांनी मतदान केलं.

****

भारताचं ‘ग्रीन आशा’ नावाचं एलपीजी वाहून आणणारं जहाज होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीरीत्या पार करून आज मुंबईजवळ जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या बंदरात दाखल झालं आहे. त्यात १५ हजार ४०० टन  एलपीजी साठा  आहे. इराण, विरुद्ध अमेरिका आणि इज्राएलचं युद्ध सुरु झाल्यापासून जे एन पी ए बंदरात आलेलं हे पहिलंच एलपीजीवाहू जहाज आहे. जहाज आणि जहाजावर कार्यरत सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.

****

पश्चिम आशियात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतुक मंत्रालयाने देशांतर्गत वाहतुक कंपन्यांसाठी तीन महिन्यांकरता लँडिंग आणि पार्किंग शुल्कात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी हवाई वाहतुक मंत्री राममोहन नायडू यांनी ही माहिती दिली.

****

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र - गोवा – गुजरात या विभाग ७ च्या पणजी इथं दोन दिवसीय वार्षिक परिषदेला आजपासून प्रारंभ झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या परिषदेच्या उद्घाटनपर भाषण केलं. महाराष्ट्र विधान परिषद हे ज्येष्ठांचे सभागृह म्हणून ओळखलं जात असलं तरी अलीकडच्या काळात युवा प्रतिनिधींचा वाढता सहभाग आणि संख्याबळ सक्षम लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं. विकसित भारत – २०४७ चं उद्दीष्ट साध्य करतांना विधिमंडळातील युवा सदस्यांची भूमिका आणि व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण, तटीय संपर्क यंत्रणा यासाठी क्षेत्रीय प्राधान्यक्रम या विषयांवर या परिषदेत विचारमंथन होत आहे.

****

वारकरी संप्रदाय आणि त्यांची परंपरा यांचं आपल्या संस्कृतीत महत्त्वाचं स्थान असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. शेकडो वर्षांची आक्रमणं झेलूनही वारकरी परंपरा अबाधित राहिल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले -  

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार धनंजय मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने भाविकांचीही गडावर मोठी गर्दी झाली होती.

****

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामांचं भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मुंबईत यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते आज ते बोलत होते.

****

जायकवाडी, माजलगाव, इसापूर या धरणांसह अहिल्यानगर जिल्‍ह्यातील निळवंडे आणि भंडारदरा परिसरात पर्यटन केंद्र विकसीत करुन, रोजगार निर्म‍िती करण्‍यावर भर देण्‍यात येणार आहे, जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज शिर्डी इथे माध्‍यमांशी बोलतांना ही माहिती दिली. धरण परिसरामध्‍ये असलेल्‍या जलसंपदा विभागाच्‍या जागांचा उपयोग पर्यटन विकास केंद्रासाठी केला जाणार आहे. यासाठी एक धोरण निश्चित करण्‍यात आलं असून, बहुराष्‍ट्रीय कंपन्‍या यासाठी सल्‍लागार म्‍हणून काम करणार करतील. नवीन धोरणात वॉटर स्‍पोर्ट, रिसोर्ट उभारुन पर्यटक आकर्षित होतील अशा पध्‍दतीचं नियोजन असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.

****

खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत किमान आधारभूत खरेदी योजनेत पूर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून मका खरेदीसाठी केंद्रसरकारने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यांनी खरेदी केलेला साठा पुढच्या खरेदी हंगामापूर्वी वितरीत करावा तसंच हा मका वापरायोग्य असल्याचं गुणवत्ता प्रमाणन आवश्यक आहे अशा सूचना केंद्रानं दिल्या आहेत.

****

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव हे राज्याच्या ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं अभियान असून त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी झोकून देऊन काम करावं, असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथे विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आज ते बोलत होते. या कार्यशाळेत तेरा जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसंच ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

****

बीड जिल्ह्यातल्या केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज अपघाती निधन झालं. आज सकाळी लातूर-अंबाजोगाई मार्गावरील रेणापूर फाट्याजवळ हा अपघात झाला. गिड्डे हे स्वतःच्या चारचाकीने प्रवास करत असताना, अचानक नियंत्रण सुटून वाहन उलटल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तवला आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात १४ एप्रिल पर्यंत आयोजित “सामाजिक समता सप्ताह” अंतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम, शिबीरं आणि विविध विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत. या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत तसंच भारत सरकारच्या इतर शिष्यवृत्ती योजनांद्वारे प्रत्येकी ४५ हजार रुपये धनादेशांचं वितरण करण्यात आलं.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या विविध स्थानकांवर आज "डिजिटल अवेअरनेस डे" पाळण्यात आला. रोखरहित व्यवहारांचं प्रमाण वाढवून, त्याच्या लाभांबाबत प्रवाशांना जागृत करणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अंतर्गत नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशीम, आदिलाबाद तसंच इतर स्थानकांवर जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत प्रवाशांशी संवाद साधून डिजिटल पेमेंटचे फायदे, सोय आणि सुरक्षितता यांची माहिती दिली. नांदेड रेल्वे स्थानकावर जनजागृती फेरी काढण्यात आली.

****

क्रिकेट

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...