Saturday, 11 April 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 11 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ एप्रिल २०२ सकाळी.०० वाजता

****

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवन परिसरातील प्रेरणा स्थळ इथं महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. “महात्मा फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचितांच्या उत्थानासाठी समर्पित केलं. महिलांच्या शिक्षणाच्या प्रगतीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं असून, सामाजिक सुधारणा आणि सर्वसमावेशकतेचा एक चिरस्थायी वारसा मागे ठेवला आहे.” असं मुर्मू यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज देशाच्या विविध भागांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

****

महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त २०२७ हे द्विशताब्दी वर्ष राज्यात उत्साहात साजरं करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागामार्फत ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा व्यापक कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे.आज सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं तसंच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या उपक्रमांची सुरुवात होत आहे. या निमित्तानं वर्षभर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर आधारित व्याख्यानं, वेबिनार, परिसंवाद आणि चर्चासत्र होणार आहेत तसंच स्त्री शिक्षण, सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांवरही भर दिला जाईल, शाळांमध्ये वाचनालये ज्ञानकेंद्र म्हणून विकसित केली जातील आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय रुजवण्यासाठी महात्मा फुले यांच्या कार्यावरील पुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

****

हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात आज सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. नांदेड शहरासह अर्धापूर, मुदखेड, लोहा, नायगाव तालुक्यातील अनेक गावात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच नांदेड शहर तसंच ग्रामीण भागातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. हा भूकंप ४ पूर्णांक सात रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील शिरली गावाच्या उत्तरेला होता. नागरिकांनी या काळात खबरदारी घेण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यातही आज याचवेळी ४ पूर्णांक ७ रिश्टर स्केल या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले तर यवतमाळ आणि वाशिम इथंही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

****

महिला आणि बाल विकास विभागात आठ हजार सहाशे एकोणसत्तर नियमित पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विभागाच्या कामकाजासाठी दोन हजार आठशे त्रेचाळीस पदं बाह्ययंत्रणे मार्फत भरण्यासाठीही मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका आणि १ लाख १० हजार सहाशे चौव्वेचाळीस अंगणवाडी मदतनीस, अशी एकंदर २ लाख २१ हजार ३२८ पदांना देखील मंजुरी देण्यात आली आहे.

****

दलदलीच्या भागांमध्ये गस्त घालण्यासाठी;स्वॅम्प पोलिस; हा देशातला पहिला उपक्रम रत्नागिरीत सुरू झाला आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असलेल्या या उपक्रमाचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी तालुक्यातल्या नारायणमळी इथं काल उद्घघाटन झालं. रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यांसह अनेक खाडीकिनारे, घनदाट कांदळवनं आणि दलदलीचे संवेदनशील प्रदेश आहेत, अशा चिखलाच्या, दुर्गम भागांमध्ये पारंपरिक नौका किंवा वाहनांद्वारे गस्त घालणं पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होतं; त्यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतल्या स्वॅम्प पोलिस या उपक्रमांतर्गत त्या भागात कयाक बोटींद्वारे गस्त घातली जाणार आहे.

****

येत्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. कणकवली इथं काल ते बोलत होते. मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गाचं कामही अंतिम टप्प्यात असून ते काम देखील मे अखेर पूर्ण होणार असल्याच गडकरी म्हणाले.

****

गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबे टेकडी या आदर्श गावात वाघाच्या हल्ल्यात प्रज्वल मेश्राम या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रज्वल मेश्राम हा लघुशंकेसाठी घराबाहेर निघाला त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघानं त्याच्यावर हल्ला केला. 

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 30 May 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ت...