Tuesday, 21 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 21 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

सुशासन आणि राष्ट्र निर्माणाच्या दिशेनं काम करण्याच्या संकल्पाला अजून बळकट करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज राष्ट्रीय नागरी सेवा दिवसानिमित्त पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात, राष्ट्रसेवा हाच विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज या दिनाच्या औचित्यानं नागरी सेवेत कार्यरत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या दिनाच्या औचित्यानं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली इथं नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना विकसित भारत: नागरिक-केंद्रित शासन आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत विकास' ही आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पण भावनेनं देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धा २०२५-२६ ची पारितोषिकं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

आठशे साठ रुपये करार शुल्क भरल्यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून सात लाख रुपये कर्ज मंजूर होत असल्याचा दावा, सरकारनं फेटाळला आहे. पत्र सूचना कार्यालय-पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटनं याबाबतचं पत्र बनावट असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुद्रा योजनेतून वित्तीय संस्थांना निधी देण्यात येतो आणि वित्तीय संस्थांकडून ते कर्जस्वरूपात लाभार्थ्यांना देण्यात येतं, असं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे.

****

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथल्या आधार वृद्धाश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक म्हणजे पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारा अमूल्य ठेवा असल्याचं ते म्हणाले. ज्येष्ठांची काळजी, सन्मान, सुरक्षा आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे ही केवळ जबाबदारी नसून सर्वोच्च प्राधान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. वृद्धाश्रमातल्या नागरिकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी व्यवस्थापनाला दिल्या. या प्रसंगी समाजकल्याण विभागाचे अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत कार्यरत संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

लातूरच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप नेते माजी खासदार डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचं आज सकाळी निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी लातूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वैद्यकीय सेवा आणि  शिक्षण क्षेत्रातील निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा भावनेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

****

बीड जिल्ह्यात गेवराई इथं शासकीय दस्ताचा उतारा देण्यासाठी पाच हजार रुपये लाच घेणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला जालनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहाथ अटक केली. सोपान मुसळे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

जालना इथं फळबाग योजनेअंतर्गत कामासाठी पाच हजार रुपये लाच घेणाऱ्या सहायक कृषी अघिकाऱ्यालाही लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहाथ अटक केली. राजकुमार खिल्लारे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्याच्यासोबत एका खासगी इसमासही लाच प्रकरणी अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे.

****

लातूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७५ हजार टनांहून अधिक खत साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी साठवणुकीची घाई करू नये, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केलं आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ७५ हजार १६७ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी गरजेनुसारच खत खरेदी करावी असं कृषी विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं राजीव गांधी मैदानावर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना खेळवला जाणार आहे

****

हवामान

अनेक भागात पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये नाशिक आणि अहिल्यानगरसह मराठवाड्यात लातूर, धाराशिव, जालना, परभणी, बीड, हिंगोली, या जिल्ह्यांचा समावेश आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...