Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 28 April 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
भारत-न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी
·
शिक्षण आणि रोजगारासाठी उपयुक्त महाचतुर एआय चॅटबॉटचं
लोकार्पण
·
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर
·
न्याय व्यवस्थेत तांत्रिक बदल अपरिहार्य- केंद्रीय कायदा
आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांचं प्रतिपादन
आणि
·
मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट, छत्रपती संभाजीनगर
आणि परभणीचं तापमान सलग दुसऱ्या दिवशी ४३ अंशांवर
****
भारत आणि
न्यूझीलंड दरम्यान काल दिल्लीत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. येत्या पाच
वर्षांच्या काळात द्विपक्षीय व्यापार पाच अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचं या कराराचं
उद्दिष्ट आहे. याअंतर्गत येत्या १५ वर्षात न्यूझीलंड भारतात २० अब्ज अमेरिकन डॉलरची
गुंतवणूक करेल, तसंच पाच हजार भारतीयांना न्यूझीलंडमध्ये रोजगारासाठी तात्पुरता
विसा मिळेल, त्यांना तीन वर्षांसाठी तिथे राहता येईल.
या करारामुळे
न्यूझीलंडहून भारतात आयात होणाऱ्या ५४ टक्क्यांहून अधिक वस्तू करमुक्त होतील. यामुळे
दोन्ही देशातला व्यापार दुप्पट होईल, अशी आशा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग
मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले…
बाईट - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल
****
महाचतुर
एआय चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना
कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असा विश्वास, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. कौशल्य, रोजगार,
उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या या ‘चॅटबॅाट’चं काल मुंबईत लोकार्पण
तसंच सामंजस्य करार पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. युवकांना
कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि
मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा हा चॅटबॉट म्हणजे, राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा हा देशातला पहिलाच अभिनव उपक्रम आहे.
****
राज्यातल्या
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणं सक्तीचं करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात
आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत टॅक्सी-रिक्षा चालकांच्या विविध
संघटनांसोबत बैठक घेतली, त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मराठीतून बोलण्याला
कुणाचीही हरकत नाही, मात्र यासाठी, मुदत
वाढवून देण्याची मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या निर्णयाला मुदतवाढ कधीपर्यंत
द्यायची हा निर्णय आज घेतला जाणार असल्याचं, सरनाईक यांनी सांगितलं.
कुणाचाही रोजगार बुडणार नाही, असं सांगतांना, ते म्हणाले…
बाईट - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
रिक्षा
आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयावर सरकार आजही ठाम असल्याचंही सरनाईक
यांनी स्पष्ट केलं. तसंच महाराष्ट्रात काम करायचं असेल तर मराठी यायलाच हवी याचा पुनरूच्चार
त्यांनी केला.
****
न्याय व्यवस्थेत
तांत्रिक बदल अपरिहार्य असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल
यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद आणि माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या
वतीने छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित न्यायव्यवाथेतील तांत्रिक प्रगती या विषयावरच्या
व्याख्यानात ते काल बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि डिजिटल
प्रणालींचा न्यायव्यवस्थेत वाढता वापर हा काळाचा प्रवाह असून, या बदलांना विरोध न करता त्यांचं संधींमध्ये रुपांतर करावं, असं ते म्हणाले. त्याचबरोबर न्यायनिर्णय प्रक्रियेत मानवी संवेनशीलता आणि विवेकही
आवश्यक असल्याचं मेघवाल यांनी नमूद केलं.
दरम्यान, सरस्वती भूवन
शिक्षण संस्थेत संविधान जागरण अभियानाचा समारोप काल मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत
झाला. संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छत्रपती संभाजीनगर ही
कर्मभूमी असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं ते म्हणाले. आपल्या संविधानात सांगितल्यानुसार
अधिकारापेक्षा कर्तव्य आणि बंधुभाव अधिक महत्वाचं असल्याचं मेघवाल यांनी सांगितलं.
ते म्हणाले:
बाईट - केंद्रीय
कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल
संस्थेचे
अध्यक्ष दिनेश वकील, सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, महापौर समीर
राजुरकर यावेळी उपस्थित होते.
****
आम आदमी
पक्षाच्या सात खासदारांचा भाजपमध्ये प्रवेशाचा अर्ज राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन
यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यसभेतल्या भाजपच्या खासदारांची संख्या आता ११३
झाली आहे. राघव चड्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, संदीप पाठक, विक्रमजित साहनी, स्वाती
मालिवाल आणि राजींदर गुप्ता यांनी शुक्रवारी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता.
राज्यसभेत आम आदमी पक्षाचे तीन खासदार राहिले आहेत.
****
राज्यातल्या
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी होत असल्यास त्याची चौकशी
करून कठोर कारवाईचे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले
आहेत. पुण्यातल्या आय.एल.एस. विधी महाविद्यालय प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
सदर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचं शुल्क सहा टक्के व्याजासह परत करण्याचे आदेशही
त्यांनी दिले. बेकायदेशीर शुल्क वसुलीप्रकरणी शासनानं नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या
अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण
आणि महाविद्यालयांमधल्या शुल्क निर्धारण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सरकार योग्य
उपाययोजना करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
बोगस बियाणं
ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए टेस्ट केली जाणार असून, उत्पादक कंपन्या
आणि विक्रेत्यांनी बियाणे कायदा आणि नियंत्रण आदेशांचं काटेकोर पालन करावं,
असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ते काल पुण्यात
कृषी महाविद्यालयात, बियाणे उत्पादक संस्था आणि विक्रेते यांच्या
खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेत आगामी हंगामासाठीची
पूर्वतयारी, बियाण्यांचं नियोजन, उपलब्धता
आणि वितरण यावर सविस्तर चर्चा झाली.
दरम्यान, राज्यातल्या
कृषी साहित्य विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल बंद पाळला. बियाणं बोगस
निघाल्यास कृषी विक्रेत्याला जबाबदार धरलं जातं, हा प्रकार थांबवावा
या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला. बीड शहरातल्या कृषी साहित्य विक्रेत्यांनी या बंदला
प्रतिसाद देत आपली दुकानं बंद ठेवली होती.
****
जलव्यवस्थापन
अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू
करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचं काल छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात स्वागत करण्यात आलं. त्र्यंबकेश्वर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या
चौंडी इथून ही यात्रा निघाली आहे. वैजापूर इथं आमदार रमेश बोरनारे तर गंगापूर मध्ये
आमदार प्रशांत बंब यांनी या यात्रेचं स्वागत केलं. आज ही यात्रा कन्नड, चाळीसगाव मार्गे धुळ्यात पोहोचणार आहे.
****
राज्यात
अनेक भागात सध्या उष्णतेची तीव्र लाट आहे. विदर्भात अकोला इथं काल सर्वाधिक ४६ पूर्णांक नऊ तर अमरावती इथं ४६ पूर्णांक
आठ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. तर नागपूर, चंद्रपूर,
बुलडाणा, वाशिम, वर्धा यवतमाळ
या जिल्ह्यात सरासरी ४४ अंश तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं
४३ पूर्णांक चार, परभणी ४३ पूर्णांक पाच, तर बीड इथं ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हवामान
खात्यानं आज विदर्भातल्या काही जिल्ह्यांसह मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना,
परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला यलो अलर्ट
जारी केला आहे. हिंगोली जिल्ह्यात दुपारनंतर पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त
केली आहे.
दरम्यान, उष्णतेच्या
लाटेचा प्रतिकार करण्याबाबत यंत्रणांनी जनजागृती करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या
मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आरोग्य विभागाने सर्वस्तरावरील
आरोग्य संस्थांमध्ये शीत कक्ष उभारावेत, तसंच सर्व विभागांनी
समन्वयाने संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही गौडा यांनी दिले.
पूरग्रस्त तसंच पूरप्रवण गावांमधील रस्ते आणि पुलांची तपासणी, जलशुद्धीकरण तसंच साथरोग प्रतिबंधक औषधं, अत्यावश्यक
अन्नधान्य साठा इत्यादीची व्यवस्था करावी, प्रत्येक विभागाचा
आपत्ती व्यवस्थापन आराखडा येत्या १५ मे पर्यंत पूर्ण करावा, असे
निर्देशही जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.
****
बीड जिल्ह्यात
परळी, माजलगाव, धारूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी
काल तहसील कार्यालयावर पीक विम्यासाठी आंदोलन केलं. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
सरसकट पिकविमा लवकरात लवकर देण्यात यावा, पीक विम्याचे जुने निकष
पूर्ववत करण्यात यावे, कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ
कोरा करण्यात यावा, यासह इतर मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी केल्या.
****
No comments:
Post a Comment