Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 23 April
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २३ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
राहुरी आणि बारामती विधानसभा
पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. राहुरीत सकाळी नऊ वाजेपर्यंत ६ पूर्णांक ४२ टक्के मतदान
झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शिवाजी
कर्डिले यांच्या निधनामुळे या पोटनिवडणुका होत असून, बारामतीतून
सुनेत्रा पवार तर राहुरीतून अक्षय कर्डिले हे मुख्य उमेदवार रिंगणात आहेत. प्रशासनाने
मतदानासाठी जय्यत तयारी केली असून, बारामतीतील ३ लाख ८४ हजारांहून
अधिक मतदारांसाठी ४७८ केंद्रं, तर राहुरीतील ३ लाख ३३ हजार
मतदारांसाठी ३७४ मतदान केंद्रं उभारली आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे
पार पडावी यासाठी सर्वच केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वेबकास्टिंगच्या माध्यमातून मतदानावर थेट नजर ठेवली जात आहे.
तामिळनाडू विधानसभेच्या सर्व
जागांसाठी आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे.
तामिळनाडू विधानसभेच्या सर्व २३४ मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत असून, पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यांमधल्या १५२ मतदारसंघांत एकूण
४४ हजार ३७६ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत दोन्ही राज्यांत
सुमारे १७ आणि १८ टक्के मतदान झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर
जिल्ह्यात काल रात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात
एका घाटात घडला. यामध्ये ट्रक, ट्रॅक्टर, दोन प्रवासीवाहक चारचाकी वाहनं अशा चार वाहनांची एकमेकांना जोरदार धडक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटातून खाली उतरणाऱ्या एका
ट्रकचं ब्रेक निकामी झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला.
दरम्यान, या भीषण अपघातातील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख
व्यक्त केलं आहे. समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली
असून, जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय
मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींना प्रत्येकी
५० हजार रुपये मदत दिली जाणार आहे.
****
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात असलेल्या बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी
सहा वाजून १५ मिनिटांनी उघडण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक धार्मिक विधींनंतर
हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. या प्रसंगी देशभरातून आलेले हजारो भाविक
उपस्थित होते. बद्रीनाथचे दरवाजे उघडल्यामुळे आता उत्तराखंडमधील चारही धाम भाविकांसाठी
दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत.
****
सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या
खरीप हंगामासाठी शेतकर्यांना बि- बियाणे आणि रासायनिक खतांचा तुटवडा भासू नये, यासाठी कृषी विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात
दरवर्षी सरासरी २ लाख २३ हजार ५७५ मेट्रीक टन रासायनिक खंताचा वापर होतो. यंदा कृषी
विभागाने शासनाकडे २ लाख ९५ हजार ५० मेट्रीक टनाची मागणी केली होती, त्यापैकी जवळपास २ लाख ५१ हजार ९०० मेट्रीक टन खतांची मंजूरी मिळाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करु नये, असं अवाहन कृषी
विभागाने केलं आहे.
****
हवामान
नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी वारे आणि पावसाची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काल वर्धा इथं सर्वाधिक ४४ पूर्णांक २ अंश सेल्सिअस
तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली. दरम्यान, जालना जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या
पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून, नागरिकांच्या
आरोग्य सुरक्षेसाठी जिल्ह्यातल्या ५५ शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सज्ज करण्यात
आले आहेत.
****
दक्षिण अफ्रिकेच्या जोहान्सबर्ग
इथं सुरु असलेल्या भारत आणि दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघातल्या टी-२० मालिकेतल्या
काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने भारताचा ९
गडी राखून पराभव केला. भारताने विजयासाठी दिलेल्या १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग
करताना, दक्षिण आफ्रिकेने १६ षटकं आणि ३ चेंडूंमध्ये केवळ एक
गडी गमावून १९३ धावा पूर्ण केल्या. या पराभवामुळे पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत
आता ०-३ असा पिछाडीवर पडला आहे.
****
No comments:
Post a Comment