Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05 April 2026
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ एप्रिल २०२६ दुपारी १.०० वा.
****
थायलंडच्या बँकॉकमध्ये झालेल्या
अपंगांसाठीच्या जागतिक धनुर्विद्या मालिकेमध्ये भारताची अठरा वर्षीय तिरंदाज पायल नाग
हिनं, ‘कंपाउंड
महिला’ गटाचं सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे. दोन्ही हात,
दोन्ही पाय नसतानाही अचाट जिद्दीच्या जोरावर सुवर्णपदक जिंकणारी ती जगातील
पहिलीच पॅरा तिरंदाज ठरली आहे. तर, स्वाती चौधरी आणि आदिल मोहम्मद
नझीर अन्सारी या महिलांच्या जोडीनं ‘डब्ल्यु वन मिक्स्ड टीम’
प्रकारात चमकदार कामगिरी करत रौप्य पदक आपल्या नावावर केलं. या स्पर्धेत
भारतानं सात सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कास्य पदकांसह १६ पदकं
जिंकली आहेत.
****
लोकसभेसह राज्यांच्या विधानसभांमध्ये
महिलांच्या ३३ टक्के आरक्षणासंदर्भातील चर्चेसाठी येत्या १६ ते १८ एप्रिल दरम्यान चर्चा
होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. केरळच्या तिरुवल्ला इथं
काल आयोजित प्रचार सभेत त्यांनी ही माहिती दिली. २०२३ मध्ये मंजूर कायद्यास येत्या
२०२९ मध्ये लागू करण्यासाठी संसदेचं सध्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सत्र तीन दिवसांसाठी
वाढवण्यात आलं असल्याचं मोदी म्हणाले. महिला सशक्तीकरणासाठी नारी शक्ति वंदन कायद्यातही
सुधारणा केली जाईल, असं
ते म्हणाले. तसंच, लोकसंख्या घटल्यानं काही राज्यांतील लोकसभेच्या
जागा कमी झाल्याच्या
अफवेबाबत बोलतांना, मोदी यांनी केरल, तमिळनाडू,
कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा
और तेलंगणात लोकसभेच्या जागांची संख्या कमी झालेली नसल्याचं नमूद केलं.
****
नाशिकमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय
संत समितीच्या राष्ट्रीय कार्य समितीच्या बैठकीचा आज समारोप होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. नाशिकमधील पंचवटी येथील स्वामीनारायण सभागृहामध्ये
काल कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीचे उद्घाटन केले. आगामी कुंभमेळा यशस्वी
करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तसेच कुंभमेळ्या संदर्भात अपप्रचार करणाऱ्यांना
तसेच अनुचित चर्चांना पूर्णविराम द्यावा, असे आवाहन यावेळी कुंभमेळा मंत्री महाजन यांनी
केले. तर कुंभमेळ्याच्या निमित्ताने गोदावरी शुद्धीकरणाला प्राधान्य द्यावे,
असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. यावेळी
राष्ट्रीय कार्य समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्र आनंद महाराज उपस्थित होते.
****
मराठी भाषा भवनाप्रमाणे लवकरच मालवणी
भाषा भवन उभारणार असल्याची घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ इथं
केली. मालवणी नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांचा जन्मदिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा
केला जातो. या मालवणी भाषा दिनाचं औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं रिल्स
मालवणी या संस्थेच्या वतीने शनिवारी रात्री मालवणी पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात
आलं होत, त्यावेळी
मंत्री नितेश राणे बोलत होते.
****
नंदूरबार जिल्ह्यात अंगणवाडी पूरक
आहार योजनेतील कथित गैरव्यहार प्रकरणी दोन शासकीय कर्मच्याऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर
गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रनाळे एकात्मिक बाल विकास प्रकल्पा अंतर्गत काम करणारा
लिपिक प्रशांत भामरे आणि जिल्हा महिला बाल कल्याण विभागातील अन्य लिपिक दीपक शिंदे
या दोघांचा यात समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी
चौकशीद्वारे या दोघांवर कारवाई केली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र
माहूर गड इथल्या श्री दत्त शिखर संस्थानच्या गादीचे महंत परमपूज्य मधुसूदन भारती गुरू
अच्युत भारती - मालक महाराज यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी तीन वाजता धार्मिक विधींनुसार
अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संत, महंत, तसंच विविध क्षेत्रातील
मान्यवर यावेळी उपस्थित असणार आहेत. भारती यांचं काल देहावसान
झालं ते ९५ वर्षांचे होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी भारती यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. भारती यांच्या जाण्यामुळे अखंड दत्तभक्ती-धर्म
संवर्धन-समाजसेवा आणि परंपरेचा एक दीपस्तंभ हरवल्याचं नमूद करुन श्रद्धांजली अर्पण
केली आहे.
****
आगामी २०४७ मधला विकसित भारत घडवण्यासाठी
देशाला अनुशासनासाठी प्रयत्न करावे लागतील. मन, शरीर आणि आत्मा यांच्या संतुलनातूनच हे शक्य
असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केलं
आहे. आज नवी दिल्ली इथं आयोजित विश्व ध्यान संमेलनात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन
केलं. सामाजिक आव्हानं आणि व्यसनी पदार्थांच्या दुरूपयोगाशी सामना करण्यासाठी ध्यान
हा सोपा उपाय असून या ध्यान संमेलनाच्या आयोजनातून जगभरात शांतिपूर्ण सह-अस्तित्वाचा
संदेश पोहोचेल, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी बोलतांना व्यक्त
केला.
****
क्रिकेटच्या कसोटी प्रकारात भारताचं
स्थान अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं भारतीय
क्रिकेट नियामक मंडळ-बी.सी.सी.आय.तर्फे सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण
यांच्या नेतृत्वाखाली एक योजना तयार करण्यात आली आहे. याद्वारे युवा क्रिकेटपटूंवर
लक्ष केंद्रित करून कसोटी संघात राखीव क्रिकेटपटूंची ताकद वाढवण्यासाठी मदत करणार आहे.
सध्याच्या आयपीएल -२०२६ स्पर्धेनंतर लगेचच यावर काम सुरू होईल. वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे, समीर रिझवी, कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर यांसारखे
युवा क्रिकेटपटू निवड प्रक्रियेत असतील.
****
No comments:
Post a Comment