Friday, 17 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 17 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यघटनेत एकशे सहावी दुरुस्ती करणारा, नारी शक्ती वंदन अधिनियम, आजपासून अंमलात आला आहे. संसदेने हा अधिनियम २०२३ मध्ये मंजूर केला होता. या कायद्यात लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभेतील एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

दरम्यान, अद्याप अंमलात न आलेल्या काही जुन्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियमसंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं. ते आज संसद परिसरात माध्यमांशी बोलत होते. विरोधकांनी या संदर्भात राजकारण करु नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे.

****

लोकसभेत नव्याने दाखल नारीशक्ती वंदना विधेयक, सीमांकन विधेयक, २०२६ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयकांवरील चर्चेला आज पुन्हा सुरुवात झाली. लोकसभा, तसंच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं ही उद्दीष्ट असणाऱ्या या तीनही विधेयकांवर आज दुपारनंतर मतदान होण्याची शक्यता आहे.

****

नारी शक्तीहेच एका सशक्त भारताचे वैशिष्ट्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधानांनी नारी शक्तीची ताकद आणि योगदान अधोरेखित करणारं एक संस्क़ृत सुभाषित उधृत केलं. देशातील माता, भगिनी आणि कन्या आज आपल्या अढळ निश्चयाने, निष्ठेने आणि सेवाभावाने प्रत्येक क्षेत्रात भारताची प्रतिष्ठा वाढवत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या या संदेशात म्हटलं आहे.

****

संयुक्त जनता दलाचे नेते हरिवंश नारायण सिंह यांची राज्यसभेच्या उपसभापतीपदी बिनवविरोध निवड झाली. राज्यसभेतील सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी हरिवंश यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, तो सदनाने मंजूर केला. या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिवंश यांचं अभिनंदन केलं. हरिवंश यांचा प्रदीर्घ अनुभव आज सभागृहात पूर्णपणे सिद्ध झाला, त्यांच्या नेतृत्वाखाली सभागृह अधिक प्रभावी झाल्याचं सर्वांनी पाहिलं, या शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. हरिवंश यांची सलग तिसऱ्या वेळेस या पदावर निवड झाली आहे.

राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही हरिवंश यांचं अभिनंदन केलं. हे पद भूषवणारे ते पहिलेच नामनिर्देशित सदस्य असल्याचं, खरगे यांनी नमूद केलं. नवनिर्वाचित उपसभापती विरोधी पक्षांच्या हिताची काळजी घेतील आणि विरोधकांना सभागृहात पुरेसा वेळ देतील, अशी अपेक्षा खरगे यांनी व्यक्त केली. लोकसभेचं उपाध्यक्ष पद २०१९ पासून रिक्त असल्याकडेही खरगे यांनी लक्ष वेधलं.

****

माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राधाकृष्णन यांनी आपलं जीवन ज्ञानसाधना आणि युवा प्रतिभेला मार्गदर्शन करण्यासाठी समर्पित केलं. त्यांचा चिरस्थायी वारसा प्रत्येकाला आपल्या जीवनात ज्ञान, सचोटी आणि करुणा या मूल्यांचे जतन करण्याची प्रेरणा देईल, असं उपराष्ट्रपतींनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

कंपनी अधिनियम २०१४ च्या पुनरावलोकनासाठी शासनाने हितधारक आणि इतर इच्छुक पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत. संक्षिप्त स्पष्टीकरणांसह सूचना औद्योगिक मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ई-सल्लामसलत मॉड्यूलद्वारे ९ मे पर्यंत सादर करता येतील असं मंत्रालयाने सांगितलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला आणि बाल विकास विभागानं गेल्या १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ६१ बालविवाह रोखले आहेत. यापैकी पाच विवाहांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. तर दोन अल्पवयीन मुलींना संरक्षण आणि आश्रय देण्यात आला आहे. उर्वरित विवाहांप्रकरणी पालकांकडून लेखी शपथपत्र घेण्यात आलं.

दरम्यान, येत्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता विवाह होतांना आढळल्यास बाल संरक्षण कक्षाच्या १०९८ या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचं आवाहन विभागानं केलं आहे.

धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनीही, बालविवाह आढळल्यास तात्काळ गुन्हा नोंदवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पोलीस विभाग, बाल संरक्षण समिती आणि जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

****

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात काल एका वाघाने नागरिकांच्या जमावावर हल्ला केला. देवरी परिसरात वाघाने एका म्हशीचा बळी घेतला होता, तर दुसरी म्हैस जखमी झाली होती. शेतशिवारालगत पशूधन विकास अधिकारी आणि पथकाकडून पाहणी सुरू असतांनाच, या वाघाने हल्ला केल्याने, मोठी खळबळ उडाली. सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे सर्वजण थोडक्यात बचावल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

राज्यात पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 17 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...