Wednesday, 8 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल केला नसून, तो पाच पूर्णांक २५ टक्के इतका कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. २०२६-२७ या वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाची वाढ सहा पूर्णांक नऊ टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. मागील आर्थिक वर्षात ही वाढ सात पूर्णांक सहा टक्के होती. नजीकच्या काळात अन्नधान्याच्या किमतींबाबतची स्थिती समाधानकारक राहील, असंही त्यांनी सांगितलं. भारतीय अर्थव्यवस्था सध्याच्या भू–राजकीय परिस्थितीत इतर अनेक अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मजबूत स्थितीत असल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं.

****

प्रधानमंत्री मुद्रा योजनेला आज ११ वर्ष पूर्ण झाली. आठ एप्रिल २०१५ रोजी सुरू झालेली ही योजना संपूर्ण भारतातील सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणारी ठरली आहे. तारणमुक्त कर्ज सुविधा उपलब्ध करून देत, औपचारिक कर्जप्रवाहाचा विस्तार करण्यात या योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या ११ वर्षांत या योजनेमुळे महिला, युवक, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय घटकांतले उद्योजक तसंच पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्यांना मोठं बळ मिळालं आहे.

युवकांमध्ये स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी मुद्रा योजना फायदेशीर ठरली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नागरीकांना जेव्हा योग्य संधी मिळते तेव्हा ते स्वावलंबी होऊन राष्ट्राच्या प्रगतीत विशेष योगदान देऊ शकतात, हे या योजनेच्या यशामुळे अधोरेखित झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार नाही, असं खाद्यान्न सचिव संजीव चोप्रा यांनी सांगितलं. देशांतर्गत साखरेच्या किमतीमध्ये फारशी वाढ झालेली नाही, पण साखरेच्या किमान विक्री किमतीत वाढ करण्याच्या उद्योजकांच्या मागणीवर सरकार विचार असल्याचं ते म्हणाले. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे साखरेच्या किमती जगभरात वाढल्या असल्याचा फायदा भारतीय निर्यातदारांना होऊ शकेल, आणि निर्यात करूनही देशात साखरेचा साठा शिल्लक राहिल्यास त्याचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करता येईल असं त्यांनी सांगितलं.

****

राज्यात उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे आणि भाजीपाल्याची निर्यात वाढवण्याचे निर्देश, पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. मुंबईत कृषी पणन मंडळाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आंबा निर्यात करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून, यासाठी अतिरिक्त उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

****

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनर्स आणि संशोधनासह ऑनर्स असे दोन पर्याय राज्य सरकारनं उपलब्ध करुन दिले आहेत. याची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षांपासून केली जाणार आहे. तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना ऑनर्स किंवा संशोधनासह ऑनर्स हा पर्याय निवडावा लागेल.

****

राज्यात खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने अमृत परिवार सर्वेक्षण मोहिमेला आजपासून प्रारंभ होत आहे. सर्व जिल्ह्यात २५ एप्रिलपर्यंत हे सर्वेक्षण केलं जाणार आहे. या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या अमृत संस्थेच्या प्रतिनिधींना माहिती देऊन सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आला आहे.

****

यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी काल या पुरस्काराची घोषणा केली. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८४व्या स्मृतिदिनी हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत ३० उमेदवारांनी ४२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सात अर्ज छाननीत बाद झाले. या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि उर्वरित अपक्ष मिळून २३ उमेदवार रिंगणात आहेत.

****

लातूर जिल्ह्यात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दर थेट चार ते सहा रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. यंदाच्या हंगामातला हा सर्वात नीचांकी दर असल्याचं व्यापारी आणि शेतकर्यांनी सांगितलं.

****

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने परभणीत काल धरणे आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातले २०० हून अधिक पत्रकार यावेळी उपस्थित होते. पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ ची कठोर अमलबजावणी करा, पत्रकारांवर हल्ला करणं आणि धमकावण्याचे प्रकार थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

लातूर जिल्ह्यात २०२५-२६ च्या हंगामासाठी हरभरा खरेदीच्या शेतकरी नोंदणी प्रक्रियेला येत्या १५ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासनानं हा निर्णय घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 08 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...