Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 April 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०३ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती
श्री शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. राज्यासह देशभरात त्यांचं पुण्यस्मरण आणि श्रद्घांजली
अर्पण करण्यात येत आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरील आपल्या
श्रद्धाजंली संदेशात, शिवाजी महाराज भारतीय
गौरवाचे अमर प्रतिक आणि राष्ट्रीय सन्मानचे संरक्षक होते असं नमूद केलं आहे. धर्म आणि
संस्कृतीच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी जनतेला एकजुट करत स्वराज्याची स्थापना केल्याचं
शहा म्हणाले.
****
ख्रीस्ती धर्मियांसाठी पवित्र असा
दिवस ‘गुड फ्राय डे’ आज देशासह जगभरात साजरा केला जात आहे. प्रभु येशु यांच्या बलिदानाचं
स्मरण आज केलं जातं. त्यांच्या बलिदानानंतर आध्यात्मिक मुक्तीच्या अनुषंगानं उपवास
आणि प्रायश्चित्त तसंच ठिकठिकाणच्या चर्चमध्ये आज प्रार्थना केली जात आहे. ख्रीस्तींसाठी
सध्याच्या पवित्र अशा सप्ताहातील ईस्टर संडेपूर्वीचा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो.
****
पश्चिम आशियातील सध्याच्या संकटपूर्ण
परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडिया आणि एअर इंडिया
एक्सप्रेस आज ३२ विशेष, अनियोजित विमानसेवा चालवणार
आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांना सुरक्षितपणे आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात
आला आहे. यामध्ये प्रामुख्याने संयुक्त अरब अमिरातीसाठी १८ विमानांचा समावेश असून, ही विमानं दुबई, अबू धाबी, शारजा, मस्कत आणि जेद्दाह यांसारख्या प्रमुख
शहरांना जोडतील. या विशेष मोहिमेमुळे आखाती देशांत अडकलेल्या भारतीय प्रवाशांना मोठा
दिलासा मिळणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एलपीजी
गॅस चोरीचं रॅकेट उध्वस्त करण्यात आलं असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. शिधावाटप नियंत्रक आणि राज्यस्तरीय
दक्षता पथकानं काल गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात ही कारवाई केली. हिंदुस्थान
पेट्रोलियम कंपनीच्या एलपीजी टँकरचं सील तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीनं गॅसची चोरी
सुरू असताना पथकानं धाड टाकली, या कारवाईत एकूण ३५ हजार
२२० किलो एलपीजी असलेले दोन टँकर तसंच व्यावसायिक आणि घरगुती वापराचे एकूण २६ सिलिंडर्स
असा सुमारे एक कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुमारे अडीच हजार
कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल, एवढ्या गॅसचा काळाबाजार
या ठिकाणी सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
रायगड जिल्ह्यातील मुंबई - गोवा महामार्गावर
नागोठणे नजीक सुकेळी खिंडीत एका खाजगी बसला मध्यरात्रीनंतर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत
दोन जण ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर नागोठेणेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बस मुंबईहून गोव्याकडे जात असताना
एका वळणावर हा अपघात झाला.
****
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व
समाधान शिबिरांतर्गत जालना जिल्ह्यात महसूल विभागानं नागरिकांना एकूण १३ हजार ६९५ महसूलविषयक
सेवा प्रदान केल्या. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या
आठही तालुक्यांत एप्रिल आणि मे महिन्यातही मंडळनिहाय शिबीरं घेण्यात येत असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा
लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी
केलं आहे.
****
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लातूर
जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी आणि दोन
जणांना काल लाच घेताना रंगेहाथ पकडलं. एका गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि तपासात मदत
करण्यासाठी या सर्वांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती. संशयित आरोपी पोलिस हवालदार
राहुल नागरगोजे याला पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी याच्या वतीनं ४५ हजार रुपये लाच घेताना पंचांसमक्ष पकडण्यात आलं. त्यांच्याविरुद्ध
उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
****
अकोला जिल्ह्यातील विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक भूसंपादनासाठी धावपट्टी लगत असलेल्या
शिवर गावात भूसंपादन विभागाच्या पथकानं प्रत्यक्ष पाहणी सुरू केली. पथकानं शिवर गावातील
ढोणे कॉलनी, शरद सरोवर परिसर तसेच विमानतळाच्या
आवारभिंतीलगत असलेल्या मोकळ्या प्लॉट्स, शेतीजमिनी आणि निवासी घरांची सविस्तर पाहणी केली. २०१९
मध्ये तयार करण्यात आलेल्या वाढीव धावपट्टीच्या आराखड्यानुसार ही तपासणी करण्यात आल्याचं
सूत्रांनी संगितलं. या पाहणीच्या आधारे सविस्तर अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार
असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
आगामी अठ्ठेचाळीस तासांत मराठवाड्यासह
विदर्भ- मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली
आहे. तर, कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह
सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे.
****
पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, आणि गडचिरोली जिल्ह्यात काल सोसाट्याचा
वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. या अवकळी पावसानं शेती पिकांचं विशेषत: कांदा
- द्राक्ष पिकांसह आंबा आणि गव्हाचही मोठं नुकसान झालं आहे.
****
लातूर जिल्ह्यातही अवकाळी पावसानं
जोरदार हजेरी लावली, वादळी वारा आणि गारपिटीमुळे
मोठं नुकसान झालं. रेणापूर तालुक्यातील गरसोळी शिवारात वीज पडून आणि पावसाच्या तडाख्यामुळे
शेतकरी शिवाजी राठोड यांच्या ४०० कोंबड्या दगावल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या
गारपिटीमुळं पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
****
No comments:
Post a Comment