Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 April
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०२ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. राज्यसभेत आज
आंध्र प्रदेश पुनर्रचना दुरुस्ती विधेयक २०२६ विचारार्थ मांडण्याची शक्यता आहे. हे विधेयक
काल लोकसभेत मंजूर झालं. अधिवेशन काळात वित्त विधेयक आणि विनियोग विधेयक २०२६ मंजूर
करण्यात आलं.
****
पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काही
महत्त्वाच्या पेट्रोकेमिकल्स उत्पादनांवर येत्या ३० जून पर्यंत संपूर्ण सीमा शुल्क
माफ करण्याचा घेतला निर्णय. या निर्णयामुळे पेट्रोकेमिकल क्षेत्रावर अवलंबून
असलेले प्लास्टिक निर्मिती, पॅकेजिंग, वस्त्रोद्योग, औषधनिर्माण, रसायने, वाहनउद्योगासाठी लागणारे घटक आणि इतर उत्पादनांची
निर्मिती करणाऱ्या क्षेत्रांना मोठा दिलासा मिळाला आहे.
****
दरम्यान, पश्चिम
आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल
उच्चस्तरीय बैठकीत, सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम कमी करण्यासाठी विविध मंत्रालयांना
आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत खतांची उपलब्धता, इंधन पुरवठा आणि जीवनावश्यक वस्तूंचा आढावा
घेण्यात आला. एलपीजी-एलएनजी पुरवठा सुरळीत ठेवणं, अत्यावश्यक वस्तूंच्या
किमती नियंत्रणात ठेवणं, साठेबाजी आणि काळा बाजाराविरोधात कठोर कारवाई यावर यात भर देण्यात आला. ऊर्जा क्षेत्रात गॅस-आधारित वीज प्रकल्प, कोळशाचा साठा वाढवणं आणि वीज उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी
उपाययोजना यासह कृषी, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातल्या
आव्हानांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
****
देशातल्या १९ राज्यातल्या जवळपास सव्वा नऊ कोटी शेतकरी ओळखपत्रे तयार झाली
असल्याची माहिती, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. विविध राज्यांच्या
कृषी मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत खतांचा साठा आणि काळाबाजार
याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी दिले. विशिष्ठ पिकांच्या खरेदीसाठी
राज्यांना देण्यात आलेल्या मंजुरीविषयी बोलताना, शेतमालाची खरेदी वाजवी सरासरी गुणवत्ता
निकष पूर्ण करणाऱ्या उत्पादनांपुरतीच मर्यादित असावी, असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
हनुमान जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. ठिकठिकाणच्या हनुमान
मंदिरांमध्ये सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हनुमान जयंतीनिमित्त
सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. शौर्य, समर्पण आणि सेवेचं प्रतीक असलेल्या भगवान श्रीरामांचे परम
भक्त, भगवान बजरंगबली यांच्याकडे, सर्व देशवासियांची संकटे दूर करून त्यांना सुख, शांती आणि
समृद्धी प्रदान करावी, अशी प्रार्थना करत असल्याचं
अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथल्या भद्रा मारुती मंदिरात
हनुमान जन्म सोहळ्यासह अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत.
****
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतल्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी
दुरुस्ती करण्यासासाठी ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती
दिली. अवकाळी पाऊस, गारपीट आणि लाभार्थी महिलांच्या मागणीमुळे
हा निर्णय घेण्यात आला असून, अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि
कोणाचीही गैरसोय होऊ नये, हा याचा उद्देश
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या पाच रेल्वे स्थानकांवर
भाविकांच्या आगमनाची तसंच प्रस्थानाची सोय करण्यात आली आहे. या रेल्वे स्थानकांची
काल कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी
पाहणी केली. प्लॅटफॉर्मची क्षमता वाढवणं,
प्रवेश आगमन आणि निर्गमन व्यवस्था वेगवेगळ्या
ठेवणं, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, दिशादर्शक फलक, आणि रेल्वे स्थानकावरून होणाऱ्या रस्ते वाहतुकीशी
समन्वय या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
****
बीड इथं आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत
राबवण्यात येत असलेल्या ‘संपूर्णता अभियान दोन’ चा सखोल आढावा काल जिल्हाधिकारी
विवेक जॉन्सन यांनी घेतला. यावेळी आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी आणि पायाभूत सुविधा या प्रमुख क्षेत्रांतल्या प्रगतीचा आढावा
घेताना संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
****
सर्व शासकीय, निमशासकीय आणि
खाजगी आस्थापनांनी कार्यरत मनुष्यबळाची माहिती
दर्शवणारे त्रैमासिक ईआर-1 विवरणपत्र लातूर जिल्ह्यातल्या सर्व आस्थापनांना ३० एप्रिल पूर्वी ऑनलाईन सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. संबंधित
आस्थापनांनी विलंब न करता विवरणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या अंतिम यादीचं मतदारांशी मॅपिंग
करण्यासाठी बीड तालुक्यातल्या ४५७ भागात येत्या चार आणि पाच तारखेला विशेष शिबिरांचं
आयोजन करण्यात आलं आहे. नागरीकांनी मतदान केंद्रावर जाऊन योग्य माहिती पुरवून आपली
नावं मॅप करून घ्यावीत, असं आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कविता
जाधव यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment