Tuesday, 28 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता

****

येत्या काळात देशाच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, या पार्श्वभूमीवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सज्जता अधिक दृढ करावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. सर्व रुग्णालये आणि आरोग्य सुविधांमध्ये उष्माघात व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवणं, पूर्व सूचना प्रणाली सक्षम करणं आणि उष्माघाताच्या घटनांची नोंद संबंधित पोर्टलवर ठेवणं आवश्यक असल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. अति उष्णतेचा आरोग्यावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी तसंच उष्णतेशी संबंधित आजार आणि मृत्यू रोखण्यासाठी तातडीचं नियोजन आणि समन्वित कृती अत्यंत महत्त्वाची असल्यावर सचिवांनी भर दिला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिक्कीमच्या ५० व्या स्थापना दिनाच्या समारोप समारंभात सहभागी झाले. सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या विविध विकासप्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं.

दरम्यान, पंतप्रधान आजपासून उत्तर प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. वाराणसी इथं महिला संमेलनाला ते उपस्थित राहतील, यावेळी सहा हजार ३५० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल. काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन पंतप्रधान दर्शन आणि पूजा करतील. बनारस–पुणे आणि अयोध्या–मुंबई या दोन नव्या अमृत भारत एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

****

लडाखचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे लडाखमध्ये आता दोनऐवजी एकूण सात जिल्हे असतील. केंद्रशासित प्रदेशात नुब्रा, शाम, चांगथांग, झंस्कार आणि द्रास या नव्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. उपराज्यपालांनी याला ऐतिहासिक पाऊल म्हटलं असून, यामुळे जनतेची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आणि विकसित लडाखच्या दृष्टीकोनाला बळ मिळेल, असं त्यांनी सांगितलं.

****

देशात खतांच्या उपलब्धतमध्ये कोणतीही अडचण नाही, मागणीपेक्षा पुरवठा सातत्याने अधिक असल्याचं सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. खते विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी पश्चिम आशियातल्या घडामोडींची माहिती देण्यासाठी आयोजित आंतर-मंत्रालयीन बैठकीत ही माहिती दिली. देशात युरियाची आवश्यकता १८ लाख मेट्रिक टन इतकी असून, उपलब्धता ७१ लाख मेट्रिक टन इतकी होती तर डीएपीची आवश्यकता जवळपास सहा लाख मेट्रिक टन इतकी असताना उपलब्धता २२ लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त होती, असंही त्यांनी सांगितलं.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशानं, तसंच, चौंडी गावाचा विकास करण्याच्या दृष्टीनं विकासकामं हाती घेण्यात आली आहेत. चौंडीमध्ये दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत या संदर्भातल्या बैठकीत दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी ६८१ कोटींची तरतूद करण्यात आली असून, या प्रकल्पाअंतर्गत अहिल्यादेवींचा भव्य पुतळा, सुशोभित उद्यान, नदीकाठाचा विकास, आधुनिक संग्रहालय, ओपन एअर थिएटर आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहेत.

****

राज्यातल्या मोठ्या गृहनिर्माण संकुलातील सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि गृहनिर्माण संकुलातील कचरा विलगीकरण यांचं ऑडिट केलं जात असून, दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिली. पुण्यात प्लास्टिक रिसायकलिंग शो इंडिया आणि भारत रिसायकलिंग शो यांच्या वतीनं रिसायकलिंग व्हिजन सिरीज २०२६ ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या निमित्तानं झालेल्या पत्रकार परिषदेत कदम यांनी एमपीसीबीची प्रदूषण नियंत्रणाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

****

लातूर शहरात गोवंश संरक्षणाचा संदेश देण्यासाठी काल भव्य दिंडी काढण्यात आली. विविध सामाजिक, धार्मिक संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या या दिंडीच्या माध्यमातून गोवंश संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले मराठी विभागप्रमुख तथा भाषा संकुल संचालक प्राध्यापक डॉ. पृथ्वीराज तौर यांना 'फ्रेंडस ऑफ नवासा' हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. नॅशनल रायटर्स असोसिएशन ऑफ साऊथ आफ्रिका या शिखर साहित्य संस्थेच्यावतीनं हा पुरस्कार देण्यात येतो.

****

डेन्मार्कमध्ये हॉर्सेन्स इथं सुरू असलेल्या थॉमस-उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियाचा ५-०नं पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेत अ गटातल्या देशांमध्ये भारत आणि चीन अव्वल स्थानावर असून, उद्या त्यांच्यात लढत होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 28 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...